मनातला पाऊस  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> महेंद्र पाटील

पाऊस येतो, सृष्टी सारी भिजवून जातो. पाऊस येतो, जुन्या आठवणी घेऊन येतो… यंदा पुन्हा तोच हवाहवासा वाटणारा पाऊस आला, मनाला  गारवा देऊन गेला. या पावसाने काय नाही दिलं मनाला? सुखाची  चाहूल, दुःखी जाणिवा, विरहाची व्याकुळता, गोड क्षणांची वाट पाहणं तर कधी बेधुंद जगायला शिकवलं या पावसाने…  

एका उजाड माळरानावर तो एकटाच येऊन बसायचा. एकटक मावळतीच्या निवांत क्षितिजाकडे पाहायचा. तिथे समोरच एक कौलारू घर होतं आणि त्या घराला एक खिडकी होती. कधी बंद तर कधी खुली. एकदा त्याची नजर सहज त्या खिडकीकडे गेली. त्या खिडकीतून दोन डोळे त्याला पाहत होते. ती निरागस नजर त्याच्या मनाचा वेध घेऊ पाहत होती. तोही तिच्याकडे एकटक पाहू लागला आणि डोळ्यांचं बोलणं सुरू झालं. कधी कधी खूप शांतता असायची, पण त्याच्या मनात मात्र वादळ सुरू असायचं कायम.

 कोण असेल हा? का येत असेल इथे? माझ्यासाठी की खरंच पावसाची वाट पाहत असेल? जशी मी पाहते? हे प्रश्न तिच्या मनात गर्दी करायचे. असेच काही प्रश्न याच्याही मनात जमा होऊ लागले. तो रोज यायचा, तिथेच बसायचा. कधी क्षितिजाकडे तर कधी तिच्याकडे एकटक पाहायचा. त्याला वाटायचं, कधीतरी ही घराबाहेर येईल, येऊन चार शब्द बोलेल. तिलाही वाटायचं, कधीतरी खाली जाऊन पहावं. त्याच्या शेजारी बसून त्याच्या मनात काय आहे हे विचारावं, त्याचं मन जाणून घ्यावं.

 ग्रीष्म ऋतू सरताना पावसाच्या थेंबासाठी जशी जमीन आसुसलेली असायची तसंच त्याचं मनसुद्धा. म्हणून तो वेडय़ासारखी पावसाची वाट पाहायचा. आकाशात मेघ दाटून येतील आणि घनघोर पाऊस सुरू होईल या आशेवर तो जगायचा. एकदा असाच तो पावसाची वाट पाहत असताना पाऊस आला आणि त्याला चिंब भिजवून गेला. तो नखशिखांत भिजला त्या पावसात आणि त्याला पाहून ती खिडकीतून  दूर झाली आणी घराबाहेर आली. त्याच्या समोर उभी राहून तीसुद्धा चिंब भिजू लागली. ती अबोल असली तरी तिचं मन खूप काही बोलत होतं. तिच्या डोळ्यांत ते जाणवत होतं आणि त्याचं मन तिला पाहून आनंदी झालं. या क्षणापासून त्यांची गोष्ट सुरू झाली. त्यांचा ऋतू सुरू झाला… आणि तो पावसाळा दोघांनी पुरेपूर अनुभवला. एक नव नातं निर्माण करून हा पाऊस पुन्हा माघारी परतला.

पुन्हा ऋतुपा,  पुन्हा वैशाख वणवा, पुन्हा तेच मन, पुन्हा तोच रस्ता, पुन्हा तेच माळरान,  पुन्हा तो त्याच घरासमोर  आला… पुन्हा एकदा पावसाची वाट पाहू लागला. येत्या पावसात या गोड नात्याची गोष्ट अजून फुलावी, बहरावी असं त्याला वाटत होतं, पण यंदा पाऊस यायचं नाव घेत नव्हता. त्या घराची खिडकीसुद्धा बंद! बरीच वाट पाहिली त्याने. ना पाऊस सुरू झाला, ना ती समोर आली. तो खूप बेचैन होऊन आकाशाकडे पाहू लागला. हळूहळू ढग गोळा होऊ लागले. त्याचा चेहरा खुलला. वादळ सुरू झालं आणि ते तिच्या खिडकीच्या  बंद  दारावर जाऊन जणू तिला साद घालू  लागलं. त्याच्या मनातलं वादळसुद्धा असंच होतं. बेफाम, बेलगाम… वादळाच्या तडाख्याने खिडकी उघडली आणि ती पुन्हा समोर त्या खिडकीत आली. तेच निरागस रूप, तोच  चेहरा, तोच मनातला अबोला आणि डोळ्यातसुद्धा…. त्याला काहीच कळत नव्हतं काय होतंय ते.

तो स्वत:ची पुन्हा ओळख करून देऊ पाहत होता तिला, पण ती पाषाणासारखी स्तब्ध. आकाशातले ढग परतू लागले. तिच्या डोळ्यातून दोन थेंब अलगद ओघळत तिच्या गालावरून खाली निसटले. तिने पटकन हाताची ओंजळ करून त्यांना झेलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या मंगळसूत्राच्या वाटय़ा तिच्या ओंजळीत विसावल्या आणि त्यावर तिचे अश्रू पडले. तो उठून उभा राहिला आणि काही वेळ तिच्याकडे एकटक पाहू लागला. त्याचा कंठ दाटून आला आणि तो हताश होऊन खाली बसला. आकाशातल्या परतणाऱ्या ढगांकडे पाहून त्यांना थांबवू लागला आणि म्हणाला, “ढगांनो परतू नका रे आता… बरसून जा जरासे…  नखशिखांत भिजवून  मला.. माझे अश्रू लपवून जा आता…” तो व्याकूळ होऊन डोळ्यातून पावसासारखा  बरसू लागला आणि तीसुद्धा!

थोडय़ा वेळात प्रचंड पाऊस बरसून गेला… आणि आता सारं काही शांत निरामय झालं. निसरडय़ा वाटेवरून कोणीतरी निघून गेलं. तो गेल्यावर असं का झालं? तो यायच्या आधीची हुरहुर होती की मनाचा भास? असे प्रश्न मनात उभे राहिले. तो उत्तर देऊन गेला. तिच्या मनातला पाऊस आणि त्याच्या मनातला पाऊस, एकाच वेळी त्याच्या मनात बरसून गेला. कोण होता तो? सारे प्रहर, सारे ऋतू  मनात जपणारा, अनुभवणारा एक वेडा कवी… त्या दोघांच्याही मनातला पाऊस स्वतच अनुभवून निघून गेला. पुढच्या वळणावर कुणाच्या तरी मनाला जपायला…

[email protected]