लेख – म्युकरमायकोसिस आणि प्रतिबंधात्मक उपाय

>> डॉ. घनश्याम मर्दा

म्युकरमायकोसिस एका माणसापासून दुसऱयाला संसर्ग करत नाही. त्यामुळे ते सर्वांना होईल आणि तो सर्वांना घातक ठरेल, अशी भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही. पण या आजाराची तीक्र गती, वेगवान प्रसार आणि अधिक असलेले घातकतेचे प्रमाण यामुळे हा आजार झालेल्यांना तातडीची वैद्यकीय मदत लागते. ज्यांना म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसत असतील तर त्यांनी लगेचच डॉक्टर आणि रुग्णालयाशी संपर्क साधून तातडीने उपचार घ्यावेत. वेळ घालवू नये.

गेले काही दिवस कोरोनाबाधित किंवा कोरोनामुक्त लोकांमध्ये उद्भवणाऱया म्युकरमायकोसिस नावाच्या आजारावर सर्वत्र चर्चा चालू असून त्याच्या असणाऱया घातक परिणाम व त्यातून होणारे मृत्यू यामुळे थोडे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. म्युकरमायकोसिस हा आजार एक बुरशीजन्य (फंगस/मोल्ड) आजार असून तो झायगोमयसेटेस (zygomycetes) बुरशी वर्गातील म्युकोरॅसिए (mucoraceae) कुळातील काही (प्रामुख्याने पाच) प्रजातींपासून होणारा फार लोकांमध्ये न सापडणारा दुर्मिळ आजार आहे. हा आजार एका माणसापासून दुसऱयाला संसर्ग करत नाही. त्यामुळे ते सर्वांना होईल आणि तो सर्वांना घातक ठरेल, अशी भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही. पण या आजाराची तीक्र गती, वेगवान प्रसार आणि अधिक असलेले घातकतेचे प्रमाण यामुळे हा आजार झालेल्यांना तातडीची वैद्यकीय मदत लागते.

हा आजार होण्यासाठी विशिष्ट परिस्थिती आवश्यक असते कारण बहुतांश बुरशी किंवा फंगस हे दमट वातावरणात किंवा दूषित व संसर्गित माती व पाणी यामध्ये घर करतातच, तशाच ही बुरशीपण आहे जेव्हा मनुष्य आजार किंवा इतर कारणांनी दुर्बल असतो आणि व्याधीक्षमत्व कमी करणाऱया औषधाचे सेवन करत असतो (इंमुनोकॉप्रोमाइज्ड) आणि दमट परिसर/ वातावरण/ हवामानात असतो, क्वचित प्रसंगी दूषित पाणी त्याच्या श्वसनसंस्थेत किंवा जखमांमध्ये जाते. अशा रुग्णांमध्ये रक्तवाहिन्या प्रभावित होऊन रक्ताचा सुरळीत पुरवठा नसतो. त्यामुळे पेशींमध्ये मोडतोड (डेब्रिज) होऊन जैव/ सेंद्रिय पदार्थ कुजण्याची प्रक्रिया सुरू होते आणि या बुरशीला आकर्षित करते त्यावेळी या बुरशीचा संसर्ग होण्याची परिस्थिती निर्माण होते तसेच स्वतंत्रपणे सेंद्रिय किंवा जैविक पदार्थांच्या कुजण्याच्या किंवा सडण्याच्या प्रक्रियेमध्ये ही बुरशी नक्की येते. उदा. मनुष्य किंवा प्राण्यांना होणाऱया नैसर्गिक आपत्तीतील जखमा, तीक्ष्ण टोचणे आदी.

या आजाराची जोखीम पुढील व्यक्तींना किंवा परिस्थिती जास्त असते. डायबेटीस, कॅन्सर, अवयव बदल (ट्रान्सप्लांट), स्टिरॉइड किंवा इम्म्युनो सप्रेसंट औषधांचा वापर, इंजेक्शन ड्रगचा वापर, शरीरात लोहाचे अतिप्रमाण असणे, शस्त्र्ाक्रिया/ भाजणे/ आघात यामुळे त्वचेवरील जखमा, अकाली जन्म किंवा जन्मतः वजन कमी असणे याशिवाय स्टेम सेल इम्प्लांट आणि पांढऱया पेशींचे प्रमाण कमी असणे (नुट्रोपिनिया) यामध्येही या रोगाची जास्त जोखीम असते.

प्रतिबंधात्मक उपायांचा विचार करताना प्रथमतः आजाराचे मूळ असणाऱया विशिष्ट परिस्थितीचे आकलन करून ती कशी टाळता येईल हे पाहणे महत्त्वाचे आहे. यामध्ये वेगवेगळय़ा वैद्यकशास्त्र्ााचा व प्रणालींचा उपयोग करून घेणे आवश्यक आहे. यामध्ये आजार झाल्यानंतर तातडीचे उपाय हे अर्वाचीन वैद्यकशास्त्र्ाानुसार केले जातात. त्यामुळे वर वर्णन केलेली लक्षणे कोरोनाबाधित किंवा कोरोनामुक्त रुग्णांमध्ये आढळय़ास त्वरित डॉक्टर किंवा रुग्णालयाशी संपर्क साधून तातडीचे उपचार सुरू करावेत. प्रतिबंधात्मक उपायामध्ये आयुर्वेद योग, होमिओपॅथी आदी इतर शास्त्र्ाांचाही उपयोग केला पाहिजे.
आयुर्वेदावर आधारित प्रतिबंधात्मक आणि आजार होऊन गेल्यानंतरच्या काही उपद्रवात मदत होणाऱया उपायांचे विश्लेषण करत आहे. आयुर्वेदामध्ये जरी या नवीन आजारांचे वर्णन नसले तरी त्यासाठी कारणीभूत ठरणारी पार्श्वभूमी वर्णिलेली आहे. ती कारणे टाळून किंवा त्या कारणांचा प्रतिकार करून या आजाराच्या प्रतिबंधाच्या दिशेने वाटचाल करता येईल. त्यासाठी आयुर्वेदामध्ये मुळात दमटपणा किंवा दूषित पाणी, माती, हवा यामुळे होणाऱया परिणामांचा सविस्तर विचार आणि त्यातून नाक, डोळे यावर परिणाम होऊन निर्माण होणाऱया तक्रारी याचे वर्णन केले आहे. त्यामुळे जे लोक या आजाराच्या उच्च जोखीम गटातील (हाय रिस्क) आहेत त्यांना या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी मदत म्हणून आयुर्वेदातील काही उपायांचा उपयोग होऊ शकतो.

जे रुग्ण विलगीकरणात असतील किंवा कोरोनामुक्त होऊन घरी आले असतील किंवा उच्च जोखीम गटातील रुग्ण उदा. डायबेटीस. त्यांनी नाक, घसा, डोळे आणि तोंडातील दमटपणा, चिकटपणा नियंत्रणात ठेवण्यासाठी – गंडूष (गुळण्या), कवल (चूळ भरणे) – मीठ आणि गरम पाणी, लवंगतेल आणि गरम पाणी दिवसातून 2-3 वेळा. नस् – दोन्ही नाकपुडय़ांत मीठयुक्त कमी करणाऱया औषधाचे तेल 2-4 थेंब सोडावे. त्यानंतर काही वेळाने नाक शिंकरून साफ करावे. आग होत असल्यासच तूप सोडावे. ओवा व वेखंड यांची पुरचुंडी करून हुंगावी किंवा धुरी घ्यावी. शहाजिऱयाची पावडर किंवा दालचिनी, तमालपत्र, वेलची व नागकेशर यांची पावडर हुंगल्यास नाक मोकळे वाटते. औषधी त्रिफळा, तूप किंवा वचादी तेल याचाही वापर करता येतो. धूम्रपान ः ओवा किंवा मसाल्याच्या पदार्थांची धुरी नाकावाटे आत ओढून तोंडावाटे सोडावी. तूप, तेल आणि सातू यांची धुरी उपयोगी पडते. अंजन ः डोळय़ांमध्ये अंजन घालावे किंवा त्रिफलांजनसारखे ड्रॉप्स सोडावे दिवसांतून 2-3 वेळेस. अभ्यंगस्नान ः रोज अंगाला व विशेषतः चेहरा, कपाळ आदी भागास तेल लावून चोळावे आणि गरम पाण्याने आंघोळ करावी.

आहारातील उपाय

शरीरातील ओलावा आणि दमटपणा कमी करण्यासाठी कडू, तुरट व तिखट चवींचा उपयोग होतो. त्यामुळे या चवीच्या पदार्थांचा वापर आणि अतिस्निग्ध, चिकट असलेले गोड, अतिआंबट पदार्थ टाळावेत. ताज्या, कच्च्या भाज्या, फळभाज्या, सलाड यामध्ये माती किंवा पाण्याचा संपर्क असतो आणि जर वातावरण दमट, पावसाळी, खराब असेल तर यांचा वापर करू नये किंवा गरम पाण्यात उकळून, शिजवून घ्याव्यात.

संध्याकाळच्या जेवणात भाकरी, पोळी आणि भात दोन्ही न खाता एकच धान्य खावे. फक्त भात खाणार असाल तर तो जिरे, ओवा आदी घालून घ्यावा.

सकाळचे जेवण 12 वाजण्याच्या आत आणि संध्याकाळचे जेवण 7 वाजण्याच्या सुमारास घ्यावे. इतर वेळेस पोषक द्रव पदार्थ घ्यावे. शिळे अन्न, शिळे पदार्थ शक्यतो टाळावेत.

लवंगयुक्त पाणी, वरील मसाल्यांचा चहा, तुळसी, आल्याचा रस, लिंबूपाणी आदी गोष्टी उपयोगी पडतात. पथ्य – जुने सातू, साळीचा तांदूळ, जव आदी धान्ये, हुलगे, मूग आदी डाळी, वांगी, सुरण, पडवळ, शेवग्याच्या शेंगा, कारले, कोवळा मुळा, कोथिंबीर, हिरवे केळे आदी भाज्या, लसूण, सुंठ, मिरे पिंपळी, ओवा शेंदेलोण आदी मसाल्याचे पदार्थ गरम पाणी, दही, कोरफड, मध या पदार्थांचा खाण्यात आवर्जून वापर करावा.

विहारातील उपाय

खोलीमधील किंवा घरातील दमटपणा, कोंदटपणा कमी करण्यासाठी खिडक्या उघडय़ा ठेवाव्या. खेळती हवा ठेवावी. शक्यतो एअरकंडिशनर वापरू नये. अंगावरील जखमा असताना जैव, सेंद्रीय पदार्थांचा संपर्क टाळावा.

समजा ऑक्सिजनसह घरी आला असाल तर मास्क दोन्ही बाजूंनी स्वच्छ ठेवणे व ऑक्सिजन यंत्रात शुद्ध पाण्याचा वापर करणे, त्याच्या नळय़ा स्वच्छ ठेवणे आदी रुग्णालयीन संपर्क कारणांची काळजी घ्यावी.

 दिवसा झोपू नये, लवकर झोपावे, सकाळी लवकर उठावे. शरीरातील घाम आदी स्वच्छ करावेत.
 प्राणायाम, पोटाची योगासने, हलका व्यायाम नियमितपणे करावा. कापूर, ओवा हुंगणे. धूप व सूर्यप्रकाश घ्यावा.

वरील विवेचन हे प्रतिबंधात्मक किंवा ज्यांना या बुरशीचा आजार होऊन संसर्ग थांबला आहे आणि काही उपद्रव झाला आहे त्यांच्यासाठी आहे. ज्यांना म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसत असतील तर त्यांनी लगेचच डॉक्टर आणि रुग्णालयाशी संपर्क साधून तातडीने उपचार घ्यावेत. वेळ घालवू नये.

आपली प्रतिक्रिया द्या