न्यू हॉलीवूड – हिंसेची उकल

>> अक्षय शेलार, [email protected]

 ‘टॅक्सी ड्रायव्हर हा चित्रपट युद्धोत्तर अमेरिकेच्या पोकळ झालेल्या नागरी जीवनाचा, नैतिक अधपतनाचा आणि हिंसेकडे झुकणाऱ्या संस्कृतीचा आरसा आहे. हा फक्त एका काळाचा दस्तऐवज नाही, तर सतत नवा अर्थ उलगडणारा चित्रपट आहे, जो चिरंतन विचार करायला लावणारं तत्त्वज्ञान समोर मांडतो.

1970 च्या दशकातील न्यू हॉलीवूडमध्ये कुठला चित्रपट अमेरिकन समाजाची मानसिक आणि राजकीय अस्वस्थता सर्वात तीव्रपणे प्रकट करतो, तर तो आहे ‘टॅक्सी ड्रायव्हर’. मार्टिन स्कॉर्सेसी दिग्दर्शित आणि पॉल श्रेडर लिखित हा चित्रपट केवळ एका टॅक्सी ड्रायव्हरच्या वैयक्तिक प्रवासाची कथा नाही, तर तो युद्धोत्तर अमेरिकेच्या पोकळ झालेल्या नागरी जीवनाचा, नैतिक अधपतनाचा आणि हिंसेकडे झुकणाऱ्या संस्कृतीचा आरसा आहे.

नायक ट्रव्हिस बिकल (रॉबर्ट डी नीरो) हा व्हिएतनाम युद्धातून परतलेला सैनिक आहे, पण परतल्यावर त्याला कुठलाच आधार सापडत नाही. न्यूयॉर्क शहरातील घाण, अंधार, गुन्हेगारी त्याच्या नजरेत सतत टोचत राहते. “Someday a real rain will come and wash all the scum off the streets,“ हे त्याचं वाक्य त्याच्या आतल्या निराशा आणि हिंस्र कल्पनांचं द्योतक आहे. ट्रव्हिस भवतालाचं निरीक्षण करतो, पण कुणाशीही नीट संवाद साधू शकत नाही. समाजाच्या तळाशी जगणारा हा माणूस हळूहळू वास्तवापासून दूर जातो.

चित्रपटाचं विशेषत्व म्हणजे, त्याचं शहरी वातावरण. स्कॉर्सेसीने न्यूयॉर्कला एका पात्रासारखं वापरलं आहे. निऑन लाईट्स, घाणेरडय़ा गल्ल्या, वेश्या व्यवसाय आणि गुन्हेगारीचं दलदलीचं रूप. हा शहराचा अंधारच ट्रव्हिसच्या मानसिक अंधाराला पोसतो. त्याचा टॅक्सीचा प्रवास म्हणजे समाजाच्या पोकळ झालेल्या केंद्रातून केलेला प्रवास.

रॉबर्ट डी नीरोचा अभिनय हा चित्रपटाचा गाभा आहे. त्याने ट्रव्हिसच्या भूमिकेत उजागर केलेली भावनिक खोली आणि शारीर अभिनय अजूनही प्रचंड इन्फ्लुएन्शियल आहे. त्याचं शरीर, त्याच्या हालचाली, त्याच्या नजरेतील वेडेपणा हे सर्व घटक प्रेक्षकाला अस्वस्थ करतात.

चित्रपटाची गती संथ आहे, पण त्यामुळेच त्यातील दडपण सतत वाढत राहतं. शेवटी जेव्हा ट्रव्हिस आपलं शस्त्रसज्जीकरण करतो आणि आयरिसला (जोडी फॉस्टर) वाचवण्यासाठी हिंसक मार्ग निवडतो तेव्हा तो शेवट प्रेक्षकाला हादरवतो. त्या हिंसाचारात कुठलाही रोमँटिसिझम नाही. तो खूप रॉ, रक्तरंजित आणि धक्कादायक आहे, पण विरोधाभास असा की, अँटिहीरो असलेल्या या पात्राला (सिनेमातला) समाज ‘हीरो’ म्हणून गौरवतो. त्यामुळे हा चित्रपट हिंसा आणि नायकत्व यातील गुंतागुंतीला अधिकच टोकदार बनवतो.

‘टॅक्सी ड्रायव्हर’चा राजकीय आणि सांस्कृतिक संदर्भही तितकाच महत्त्वाचा आहे. व्हिएतनाम युद्ध, निक्सन युग, शहरी दंगली या सगळ्यामुळे अमेरिकन समाजाला स्वतच्या नैतिक मूल्यांवर प्रश्न पडले होते. ट्रव्हिस बिकल ही केवळ काल्पनिक व्यक्तिरेखा नाही, तर त्या काळातील लाखो विस्थापित तरुणांचा चेहरा आहे. त्यामुळेच हा चित्रपट एका व्यक्तीच्या मानसिक पडझडीपलीकडे जाऊन संपूर्ण समाजाच्या असुरक्षिततेचं प्रतीक ठरतो.

मात्र, ‘टॅक्सी ड्रायव्हर’भोवतीचे वादही तितकेच ठळक आहेत. हिंसाचाराचं सूक्ष्म रोमँटिसिझेशन, किशोरवयीन मुलीची भूमिका या बाबी सतत चर्चेत राहिल्या. विशेष म्हणजे, चित्रपटाने नंतर वास्तवात हिंसाचाराला प्रेरणा दिली असा आरोपही झाला (जॉन हिन्क्ली ज्युनियरने राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगनवर हल्ला करताना हा चित्रपट उद्धृत केला होता). हे दाखवतं की, ‘टॅक्सी ड्रायव्हर’चा प्रभाव केवळ कलात्मक नव्हता, तर सामाजिकदृष्टय़ाही धोकादायक पातळीवर पोहोचला.

‘टॅक्सी ड्रायव्हर’ हा चित्रपट न्यू हॉलीवूडमधील एक टोकाचा टप्पा ठरतो. इथे प्रेक्षकाला परिपूर्ण नायक, परिपूर्ण नैतिकता किंवा आश्वासक शेवट मिळत नाही. त्याऐवजी त्याला एका मानसिकदृष्टय़ा अस्थिर, पण भयावह रीतीने खऱ्या वाटणाऱ्या व्यक्तिरेखेशी तोंड द्यावं लागतं हीच या चित्रपटाची खरी ताकद आहे.

मार्टिन स्कॉर्सेसी आणि पॉल श्रेडर यांच्या कामाचा हा पहिला मोठा टप्पा होता. श्रेडरच्या स्वतच्या आयुष्याचं सावट ट्रव्हिस बिकलमध्ये स्पष्ट दिसतं ते म्हणजे धार्मिक पार्श्वभूमी, दारिद्रय़, आत्मघाती प्रवृत्ती, लैंगिक अस्वस्थता. स्कॉर्सेसीने या लेखनाला आपल्या दृश्य भाषेने इतकं प्रभावी रूप दिलं की, हा चित्रपट त्यांच्या कारकीर्दीचा शाश्वत पाया ठरला. त्याच्या नंतरच्या चित्रपटांमध्येही हेच प्रश्न वेगवेगळ्या रूपांत परत येतात.

‘टॅक्सी ड्रायव्हर’चा वारसा आजच्या अनेक चित्रपटांमध्ये जाणवतो. टॉड फिलिप्सच्या ‘जोकर’मध्ये (2019) आर्थर फ्लेक हा ट्रव्हिसचाच आधुनिक अवतार भासतो. एकाकीपणा, समाजाकडून नाकारलेपण आणि शेवटी हिंसक उद्रेक. ब्रेट ईस्टन एलिसचा ‘अमेरिकन सायको’ (2000) असो किंवा निकोलस विंडिंग रेफ्नचा ‘ड्राइव्ह’ (2011) असो, या सर्व कलाकृतींमध्ये स्कॉर्सेसीच्या या चित्रपटाची छाया दिसते. त्याचा प्रभाव इतका प्रचंड आहे की, अमेरिकन शहरी एकाकीपणा दाखवणाऱ्या सिनेमा-भाषेला तो कायमस्वरूपी बदलून टाकतो.

न्यू हॉलीवूडच्या संदर्भात ‘टॅक्सी ड्रायव्हर’ एक निर्णायक टप्पा आहे. याआधीचे ‘बॉनी अँड क्लाइड’ (1967) किंवा ‘इझी रायडर’ (1969) हे तरुणाईच्या बंडखोरीचे, सांस्कृतिक अस्वस्थतेचे प्रतीक होते, पण ‘टॅक्सी ड्रायव्हर’ त्या अस्वस्थतेचं अधिक गडद, मानसिक चित्र उभं करतो. तो केवळ ‘सिस्टमविरोधी बंड’ नाही तर ‘आत्मविध्वंसकता’ समर्पकपणे दाखवतो. त्यामुळे न्यू हॉलीवूडच्या तत्त्वज्ञानाला त्याने अधिकच खोलवर नेलं.

‘टॅक्सी ड्रायव्हर’ हा फक्त एका काळाचा दस्तऐवज नाही; तो सतत पाहिला जाणारा, सतत नवा अर्थ उलगडणारा चित्रपट आहे. शहराचा अंधार, मनाचा अंधार आणि हिंसेचं मोहक, पण धोकादायक आकर्षण हे सगळं एकत्र आणून तो चिरंतन विचार करायला लावणारं तत्त्वज्ञान समोर मांडतो.