मुद्दा – 11वी प्रवेश परीक्षा खरंच आवश्यक आहे?

>> डाॅ. गणेश अग्निहोत्री

नुकताच महाराष्ट्र राज्यातील शालान्त परीक्षेचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित निकाल जाहीर झाला. दहावीच्या मुलांचे मूल्यमापन करताना शिक्षकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. न भूतो न भविष्यति अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर पालक, विद्यार्थी, प्रशासन शासन आणि एकूण समाजातील सर्वच घटक वेठीस धरले गेले. शालान्त परीक्षेचा मागील काही वर्षांचा 90 टक्के आणि त्यापेक्षा जास्त निकाल लक्षात घेता व या वर्षी कोरोनामुळे उद्भवलेल्या आणीबाणी प्रसंगामुळे आणि रीतसर परीक्षा न घेतल्याने मूल्यमापन पद्धतीत सर्वसमावेशक प्रक्रिया पार पाडण्यास शिक्षक, शासन यंत्रणांनी मेहनत केली. निकाल अपेक्षित होता त्याप्रमाणेच लागला. एरवी 90टक्केपेक्षा अधिक मुले उत्तीर्ण होतातच़ फक्त यावेळी 99 टक्केपेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थी रीतसर परीक्षा उत्तीर्ण झाला असता तरी थोड्याफार फरकाने त्याला तेवढेच गुण पडले असते, जेवढे आता पडले. वर्षभर दहावीचा विद्यार्थी ऑनलाइन-ऑफलाइनच्या गोंंधळामुळे प्रचंड तणावाखाली होता. जे विद्यार्थी सक्षम आर्थिक स्थितीमुळे ऑनलाइन शिक्षण घेऊ शकले त्यांच्यावर कदाचित कोरोनाचा दृश्य परिणाम झाला नाही पण मोलमजुरी, शेतकरी आणि कुटिरोद्योग करणारी पालक मंडळी आपल्या पाल्यास शाळेची तयारी असूनही सक्षम शिक्षण देऊ शकली नाही. परिणाम आपल्याला सर्वांना माहीतच आहे. या निकालातील सर्व शाळांना अभिप्रेत मूल्यमापन प्रक्रिया पार पडताना अनेक कठीण प्रसंगांतून जावे लागले आणि शेवटी ही प्रक्रिया सुखद पार पडली. प्रस्तुत मूल्यमापन करताना मागील परीक्षांचे मूल्यमापन आणि अंतर्गत परीक्षा गुण यांचा समावेश होता, म्हणजे एका अर्थाने हे मूल्यमापन योग्य झाले असे समजण्यास हरकत नाही. मग इयत्ता अकरावीसाठी पुन्हा प्रवेश परीक्षा घेऊन काय साध्य होईल? बरे, प्रवेश परीक्षा घेण्यासाठी तिसऱ्या लाटेच्या तोंडावरचा मुहूर्त आलाय. डब्ल्यूएचओ, केंद्र सरकार आणि संपूर्ण शासन यंत्रणा व प्रसारमाध्यमे संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल आवर्जून लिहीत आहेत आणि सावध करत आहेत. याउपरही तिसरी लाट लहान मुले आणि वृद्धांना जास्त धोका आहे असे सांगते. मग ही प्रवेश परीक्षा अशा काळात घेण्याचा अट्टहास का? बरं, ती ऑनलाइन होत आहे. एखाद्या ऑनलाइन परीक्षा घेणाNया एजन्सीला ही परीक्षा घेण्यास शासन सांगू शकते किंवा महाविद्यालय स्तरावरून अथवा शाळेच्या स्तरावरून सुद्धा घेण्यास सांगू शकते. ऑनलाइन असो की ऑफलाइन, पुन्हा प्रवेश परीक्षा म्हणजे शालान्त परीक्षेतील मूल्यमापन खोटे आहे किंवा खरे नाही असे म्हणण्यास वाव आहे. बरं, फक्त विज्ञान किंवा अभियांत्रिकी शाखेला प्रवेश परीक्षा आणि कला, वाणिज्य या विषयांवर काय निर्णय घ्यायला हवा याबद्दल कोणीच बोलत नाही. आपण असा अर्थ घ्यायला हरकत नाही की, फक्त विज्ञान आणि अभियांत्रिकी विषयांना हुशार मुलांची आवश्यकता असते आणि कला, वाणिज्य शाखेत अशा प्रकारची प्रवेश परीक्षा नको असे कुठलाही तज्ज्ञ म्हणू शकत नाही.
म्हणून यानिमित्त शासनास अशी विनंती आहे की, कोरोनाच्या तिसNया लाटेच्या पाश्र्वभूमीवर ही परीक्षा रद्द करावी.

अशी प्रवेश परीक्षा वैज्ञानिक दृष्टीने आवश्यक आहे काय याबद्दल नक्की कोणीच अधिकृत दावा करू शकत नाही.
पुन्हा अशी प्रवेश परीक्षा म्हणजे पालकांना आर्थिक भुर्दंड. आणि महत्त्वाचे म्हणजे, शालान्त परीक्षेत मिळालेले गुण निरर्थक. एवढ्या सर्व गुंतागुंतीच्या आणि किचकट मूल्यमापन करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीवर्गावर पुन्हा प्रवेश परीक्षा म्हणजे टांगती तलवार आहे..

याकरिता ही प्रवेश परीक्षा रद्द करून अकरावी प्रवेशासंदर्भात सध्या असलेली नियमावली तत्काळ लागू करावी. जिथे केंद्रीय पद्धतीने प्रवेश आहेत तिथे आणि स्थानिक पातळीवरील प्रवेश प्रक्रिया लवकरात पार पाडून हे शैक्षणिक वर्ष वेळेत चालू होईल याविषयी सूचना द्याव्यात.

आपली प्रतिक्रिया द्या