मुद्दा – 15 डब्यांची डहाणू लोकल आणि रेल्वेच्या सबबी

<<< दयानंद पाटील >>>

डहाणू लोकल 16 एप्रिल 2013 ला सुरू होऊन आता 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. ही लोकल सुरू होण्यापूर्वीच 15 डब्यांची डहाणू-दादर लोकल सुरू करण्याबाबत 2008-09 साली पश्चिम रेल्वे अधिकारी वर्गात चर्चा करण्यात आली होती अशा त्या वेळी वर्तमानपत्रांत बातम्या लागल्या होत्या, परंतु ते शक्य झाले नाही.

आज डहाणू विभागात अनेक उद्योगधंदे वाढले असून प्रवासी संख्या खूपच वाढली आहे. लोकलमध्ये गर्दी वाढली असून मुंबईला जाणाऱ्या लोकलमध्ये सफाळे, वैतरणा स्थानकांत तर प्रवाशांना चढणे शक्य होत नाही. सफाळे स्थानकातून प्रवास करणारे काही प्रवासी आधीच्या केळवे रोड स्थानकात जाऊन गाडी पकडत असल्याचे दिसून येते आहे, तर वाढलेल्या गर्दीमुळे प्रवाशांमध्ये हाणामारीचे प्रकार वाढत चालले आहेत. प्रवासी दरवाजातून लोंबकळत प्रवास करत आहेत. अशा प्रकारे अपघाताचे प्रमाणही वाढत चालले आहे. अशा परिस्थितीत डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविणे आणि डहाणू लोकलच्या काही फेऱ्या 15 डब्यांच्या करण्यात याव्यात अशा मागण्यांना जोर वाढत आहे.

या सर्व गोष्टीचे गांभीर्य ओळखून डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने पश्चिम रेल्वेच्या डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर (DRM) आणि जनरल मॅनेजर (GM) यांना निवेदन देऊन डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविणे आणि डहाणू लोकलच्या काही फेऱ्या 15 डब्यांच्या करण्याची विनंती केली आहे.

तथापि डहाणू लोकलच्या काही फेऱ्या 15 डब्यांच्या करण्यासंदर्भात पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी सफाळे, उमरोळी आणि डहाणू येथील प्लॅटफॉर्म लांबीचे कारण देत सध्या हे शक्य नसल्याचे म्हटले आहे, परंतु सफाळे येथील फाटक बंद केल्याने सफाळे येथील प्लॅटफॉर्म विस्तारीकरण पूर्ण झाले आहे, तर उमरोळी येथील प्लॅटफॉर्मची लांबी 270 मीटरवरून 330 मीटर म्हणजे तीन डबे मावतील असा लांब विस्तार करणे आवश्यक असून ते करणे रेल्वेस नक्कीच शक्य असून हे फक्त एका महिन्याचे काम आहे आणि ते साध्य करायला हवे. राहिला प्रश्न डहाणू स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या लांबीचा. तर जर डहाणू स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर-3 वर 20 डब्यांची डहाणू मेमू (पूर्ण 20 डबे प्लॅटफॉर्मवर मावतात) उभी राहू शकते, तर 15 डब्यांची लोकल का शक्य नाही? तसेच सुरुवातीच्या काळात 2009 साली विरार येथून सुरू झालेल्या 15 डब्यांच्या लोकल कालांतराने नालासोपारा, नायगाव येथे प्लॅटफॉर्मची लांबी कमी असल्याने दोन वेळा थांबवल्या जात असत. त्याचप्रमाणे एक-दोन फेऱ्या उमरोळीचा प्लॅटफॉर्म पूर्ण लांबीचा बांधून पूर्ण होत नाही तोपर्यंत काही दिवस या स्थानकात दोन वेळा थांबा देऊन डहाणू लोकलच्या काही फेऱ्या 15 डब्यांच्या सुरू करता येऊ शकतात.

सिग्नलची अडचण पश्चिम रेल्वे मांडत असेल तर 20 डब्यांच्या मेमू आणि 22 डब्यांच्या शटल/पॅसेंजर यांना ज्या सिग्नल प्रणालीचा वापर केला जात आहे तिचाच या 15 डब्यांच्या डहाणू लोकलसाठी वापर केली गेली तर तशी फारशी अडचण नसावी.

अपेक्षा आहे, येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात सादर केल्या जाणाऱ्या नवीन वेळापत्रकात डहाणू लोकलच्या काही फेऱ्या वाढविणे आणि 15 डब्यांच्या लोकलसंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनसुद्धा प्रवाशांच्या सोयीसुविधांच्या दृष्टीने नेहमीप्रमाणे रेल्वे प्रशासनाला डहाणू विभागाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करण्यास भाग पाडले जाईल असा विश्वास आहे.