
>> कर्नल अभय बा. पटवर्धन
1971 चे हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध आणि त्यात पाकिस्तानचा केलेला दारुण पराभव हे स्वतंत्र हिंदुस्थानच्या इतिहासातील सोनेरी पान आहे. यासाठी हिंदुस्थानी सैनिकांचा महापराक्रम, सैनिकी अधिकाऱयांचे अभूतपूर्व रणकौशल्य, तत्कालीन राज्यकर्त्यांचे धाडस आणि यशस्वी मुत्सद्दीपणा तर कारणीभूत होताच, पण त्यासोबतच तत्कालीन सोव्हिएत युनियन म्हणजेच आताच्या रशियाने केलेली राजनैतिक आणि सामरिक मदतदेखील मोलाची ठरली. अमेरिका आणि ब्रिटनने हिंदुस्थानी सैन्यावर आक्रमण करण्याचा घाट घातला होता, मात्र या कारस्थानांना काटशह देण्यासाठी रशियाने कसे राजकीय तसेच सागरी डावपेच टाकले याची माहिती खूप कमी लोकांना आहे. 16 डिसेंबर 2018 रोजी या युद्धातील 48 वा विजयदिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने तिसऱया हिंदुस्थान-पाक युद्धाच्या सारिपाटावरील रशियन कुरघोडीचा घेतलेला वेध.
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत कारगीलसह चार युद्धे झाली. त्या प्रत्येकात पाकिस्तानला माती खावी लागली. या सर्व युद्धांपैकी सर्वांत महत्त्वाचे आणि हिंदुस्थानची सामरिक ताकद वाढवणारे युद्ध होते ते 1971 चे. बांगलादेश मुक्तिसंग्राम म्हणूनही ते ओळखले जाते. हिंदुस्थानच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या उत्कृष्ट राजकीय आणि सामरिक मुत्सद्देगिरीचे तसेच हिंदुस्थानी सैन्याच्या शौर्याचे प्रतीक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते, मात्र हिंदुस्थानचा पराभव व्हावा म्हणून या युद्धाच्या सारिपाटावर ऐनवेळी अमेरिका आणि ब्रिटन हे दोन्ही दिग्गज देश चाली खेळत होते. त्याचवेळी त्या काळातील हिंदुस्थानचा जवळचा मित्र असलेला तत्कालीन सोव्हिएत युनियन हिंदुस्थानच्या बाजूने अमेरिका-ब्रिटनच्या चालींवर कुरघोडी करणाऱया खेळी करीत होता. सोव्हिएत युनियन त्यावेळी हिंदुस्थानच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिला हे आता त्यासंदर्भातील जी गोपनीय कागदपत्रे उघड झाली आहेत त्यावरूनही स्पष्टपणे दिसून येत आहे. या कागदपत्रांचा अभ्यास केला तर हिंदुस्थान-पाकिस्तान या दोन देशांबरोबरच अमेरिका, ब्रिटन आणि रशिया यांच्यातील शह-काटशहाचा थरार समोर येतो.
हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध ज्यावेळी शेवटच्या टप्प्यात होते त्याचवेळी अमेरिकेने त्यांचे आण्विक विमानवाहू जहाज हिंद महासागरावाटे बंगालच्या खाडीकडे रवाना केले होते. हिंदुस्थानची विजयी वाटचाल रोखणे हाच त्यामागे हेतू होता. अमेरिका आणि फ्रान्स यांनी बंगालच्या खाडीमार्गे हिंदुस्थानच्या पूर्व किनाऱयावर धडक मारायची, पूर्व पाकिस्तानमध्ये (आजचा बांगलादेश) हिंदुस्थानी सैन्याच्या कात्रीत सापडलेल्या पाकिस्तानी सैनिकांचा बचाव करायचा आणि ब्रिटनच्या लढाऊ जहाजांनी अरबी समुद्रामार्गे हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱयावर ‘समन्वयी हल्ला’ (कोऑर्डिनेटेड ऍटॅक) करायचा अशी एकंदर सामरिक योजना त्यावेळी आखण्यात आली होती. युद्धाच्या भाषेत याला चिमटी हल्ला (पिन्सर ऍटॅक) म्हणतात. मात्र त्याला त्यावेळी हिंदुस्थानचा दोस्त असलेल्या सोव्हिएत युनियनने प्रतियोजनेद्वारे काटशह दिला. 13 डिसेंबर 1971 रोजी सोव्हिएत युनियनने तत्कालीन अॅडमिरल व्लादिमीर कुग्लाकोव्ह यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या दहाव्या पॅसिफिक ऑपरेटिव्ह बॅटल ग्रुपला तडक बंगालच्या खाडीकडे रवाना केले. अमेरिका व ब्रिटनच्या जोडीला हिंदुस्थानच्या उत्तर सीमेवर चीनने सामरिक हालचाली (मिलिटरी मॅन्युव्हर्स) करून हिंदुस्थानवर दबाव टाकावा असे आवाहन अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी केले होते. जॉर्डन, तुर्की आणि फ्रान्स पाकिस्तानला लढाऊ विमानांचा पुरवठा करीत होते. अरब अमिरातीने दहा अमेरिकन एफ-16 विमाने पाकिस्तानला दिली. इंडोनेशियाने तीन लढाऊ बोटी दिल्या. त्याशिवाय अमेरिका, ब्रिटन आणि चीन यांचा लष्करी आणि नैतिक पाठिंबाही पाकिस्तानलाच होता.
हिंदुस्थानविरोधात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर जागतिक हालचाली अमेरिका आणि ब्रिटनच्या पुढाकाराने होत असताना तत्कालीन सोव्हिएत युनियन आपल्या मदतीला धावून येणे अपेक्षितच होते. हिंदुस्थानी उपखंडाच्या सामरिक आणि राजकीय पटलावर निर्माण झालेले हे चित्र बदलण्यासाठी रशियाने जो हातभार लावला तो मोलाचा ठरला. अमेरिकेच्या विनंतीनंतरही त्यावेळी चीनने पाकिस्तानच्या बाजूने कुठलीही लष्करी अथवा सामरिक हालचाल केली नाही. त्याचे कारणही रशियाच होता. चीनने जर काही आगळीक केली तर रशिया चीनच्या सिकियांग क्षेत्रात चढाई करून रशियन वायुसेनेला हिंदुस्थानच्या मदतीला पाठवील अशी तंबी रशियाने चीनला दिली होती. वास्तविक हिंदुस्थानविरुद्ध आघाडी उघडल्यावर रशियाने काही कारवाई केली तर आपण रशियावर अणुबॉम्ब टाकायलाही मागेपुढे पाहणार नाही या शब्दांत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी चीनला आश्वस्त केले होते. तरीही चीनचे तत्कालीन सत्ताधारी माओ त्से तुंग आणि चाऊ एन लाय यांनी ते धाडस केले नाही. कारण आधीच त्यांना देशांतर्गत कल्चरल रिव्होल्युशनमुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेने ग्रासले होते. त्यामुळे हिंदुस्थानविरुद्ध दुसरे युद्ध छेडण्यात त्यांना स्वारस्य नव्हते. चीनच्या मते पाकिस्तान असाही पूर्व पाकिस्तानला वाचविण्यात असमर्थ होता.
रशियाने त्यावेळी आपल्याला सामरिक आणि इतर सहाय्य तर केलेच, मात्र 1971 च्या जुलैमध्ये झालेल्या ‘हिंदुस्थान-रशिया मैत्री करारा’ला जागून संयुक्त राष्ट्रांतही हिंदुस्थानच्या बचावासाठी सतत आपल्या व्हेटोचा अधिक वापर केला. रशियन संरक्षण तज्ञ व्लादिस्लॉव्ह एम. झुबोक यांच्या ‘ए फेल्ड एम्पायर’ या पुस्तकानुसार ‘1971 च्या डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या मॉस्को शिखर परिषदेची सांगड अमेरिकेने हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धाशी घातली आणि रशियाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पूर्व पाकिस्तानप्रमाणे हिंदुस्थान पश्चिम पाकिस्तानचाही घास घेणार नाही याची खात्री रशिया देऊ शकेल का, असा सवाल निक्सन-किसिंजर द्वयीने रशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ब्रेझनेव्ह यांना केला होता. त्यावर संतापलेल्या ब्रेझनेव्ह यांनी मॉस्को शिखर परिषदच उधळून लावण्याची धमकी दिली होती. ज्या पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानात अमानुष नरसंहार आणि स्त्र्ााr अत्याचार करून उलटपक्षी हिंदुस्थानवरच आक्रमण केले त्या देशाला अमेरिका पाठिंबा कशी देऊ शकते, असा साधा सरळ प्रश्न ब्रेझनेव्ह यांनी उपस्थित केला. एवढेच नव्हे तर अमेरिकेचा रवय्या हाच राहणार असेल तर हिंदुस्थानला मी अणुबॉम्बची पूर्ण गोपनीय माहिती द्यायला तयार आहे असेही ब्रेझनेव्ह म्हणाले. 1971 च्या या युद्ध प्रसंगात अमेरिकेने दाखवलेल्या अमानवी दृष्टिकोनाचा निषेध नंतर अनेक वर्षे तिरस्कारयुक्त भाषेत करीत असत.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निक्सन आणि सुरक्षा सल्लागार किसिंजर या दुकलीला हिंदुस्थानच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मुत्सद्देगिरीमुळे घाम फुटला होता. या दोघांच्या हिंदुस्थानविरोधी कारवाई आणि हालचाली यांची बारीकसारीक माहिती इंदिरा गांधींपर्यंत येत होती. अमेरिकेच्या या सर्व हालचालींची खबर सोव्हिएत युनियनच्या गुप्तचर खात्यालाही मिळत होती. त्यामुळे सोव्हिएत युनियनदेखील सावध झाले होते. हिंदुस्थानसाठी आणि हिंदुस्थानी राज्यकर्त्यांसाठी हा प्रसंग सत्त्वपरीक्षेचा आणि न डगमगण्याचा होता. हिंदुस्थानने गोंधळून न जाता पाकिस्तानला उखडून तर टाकलेच, मात्र त्याचवेळी अमेरिका, ब्रिटन यांच्या हालचालींना वेसण घालण्यासाठी सोव्हिएत युनियनकडे मदतीची अपेक्षा केली. सोव्हिएत युनियननेही त्याला लगतेच सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यानुसार सामरिक तसेच लष्करी हालचाली केल्या. त्या एवढय़ा तातडीने आणि खुबीने केल्या की त्या ठिकाणी आलेल्या ब्रिटनच्या बॅटल ग्रुपला काहीही न करता चुपचाप मादागास्करकडे प्रयाण करावे लागले, तर अमेरिकन नौदल आरमाराला बंगालच्या खाडीत साधा चंचूप्रवेशही करता आला नाही.
सोव्हिएत युनियनच्या या समुद्री हालचाली व डावपेचांमुळे अमेरिका-ब्रिटन द्वयीविरुद्ध हिंदुस्थानचा समोरासमोर होणारा संघर्ष टळला. अमेरिकेने तीन मरीन बटालियन्स जय्यत तयार ठेवल्या होत्या. पूर्व पाकिस्तानात आगेकूच करणाऱया हिंदुस्थान सैन्यावर बम्बार्डिंग करण्याची अनुमतीही हवाई दलाला दिली होती. त्याचवेळी लाहोरवर धडक मारणाऱया हिंदुस्थानी सैन्याला लक्ष्य करण्याचे आदेश ब्रिटनने त्यांच्या आरमाराला दिले होते. या परिस्थितीतही आणि अमेरिका-ब्रिटनचे हे डावपेच दुर्दैवाने यशस्वी झाले तर त्याचे किती भयंकर परिणाम हिंदुस्थानला भोगावे लागतील याची पूर्ण कल्पना असूनही हिंदुस्थानच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी न डगमगता बांगलादेश मुक्तीचे ध्येय साध्य केलेच.
1971 चे हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध हे स्वतंत्र हिंदुस्थानच्या इतिहासातील एक सोनेरी पान म्हणावे लागेल. पुढे फिल्ड मार्शल झालेले हिंदुस्थानी लष्कराचे तत्कालीन जनरल सॅम माणेकशा यांच्या नेतृत्वात आपल्या संरक्षण दलांनी ‘ऑपरेशन कॅक्टस लिली’ला यशस्वी मूर्तरूप दिले. पाकिस्तानला आपण दोन आठवडय़ांच्या घनघोर युद्धानंतर सपशेल गुडघे टेकायला लावले. तब्बल एक लाखाच्या घरात पाकिस्तानी सैनिक शरण आले. तोपर्यंत दुसऱया महायुद्धात स्टालीनग्राडमध्ये जर्मन सैन्याने रशियन आर्मीसमोर पत्करलेली शरणागती जगातील सर्वांत मोठी मानली जात होती. यावरूनही 1971 च्या आपल्या विजयाचे मोल लक्षात येते. अर्थात यासाठी हिंदुस्थानी सैनिकांचा महापराक्रम, सैनिकी अधिकाऱयांचे अभूतपूर्व रणकौशल्य, तत्कालीन राज्यकर्त्यांचे धाडस आणि यशस्वी मुत्सद्दीपणा तर कारणीभूत होताच, शिवाय त्यासोबत जागतिक पटलावर हिंदुस्थानला सोव्हिएत युनियनने दिलेली राजनैतिक आणि सामरिक मदतही मोलाची ठरली हे विसरता येणार नाही. या हिंदुस्थान-पाकिस्तानमधील तिसऱया युद्धाच्या सारिपाटावर सोव्हिएत युनियनने अमेरिकेवर जी निर्णायक कुरघोडी केली तिची नोंद इतिहासात कायम राहील.
1971च्या हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धप्रसंगी हिंदुस्थानच्या विरोधात आणि पाकिस्तानच्या समर्थनासाठी अमेरिका कसे डावपेच खेळत होती याविषयी न्यूझीलंडस्थित पत्रकार राकेश कृष्णन सिंह यांनी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि त्यांचे सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर यांच्यातील टेलिफोनिक वार्तालापाचा हवाला देऊन भाष्य केले आहे. अमेरिकन राज्यकर्त्यांचा हिंदुस्थानद्वेष आणि पाकिस्तानप्रेम याचा हा पुरावाच म्हणता येईल.
अ) त्यावेळी हिंदुस्थानला दुष्काळाने ग्रासले होते. मे 1971 मध्ये बांगलादेशची गनिमी सेना म्हटल्या जाणाऱया मुक्तिवाहिनीला हिंदुस्थानने मदत करण्यास सुरुवात केली होती. यावर रिचर्ड निक्सन किसिंजर यांना म्हणाले, ‘दोज इंडियन्स रियली नीड ए बंबू’. किसिंजर यांनी ‘यस, दे आर बास्टर्डस्’ या शब्दांत उत्तर दिले. निक्सन पुढे म्हणाले, ‘दे आर फेसिंग ए मास फेमिन, बट दे आर नॉट गोइंग टू गेट फुड फ्रॉम अस. लेट द गॉडम्ड इंडियन्स फाइट ए वॉर’.
ब) 3 डिसेंबर 1971 च्या रात्री पाकिस्तानने हिंदुस्थानच्या नऊ विमानतळांवर हल्ला केला. त्याचवेळी हिंदुस्थानने युद्धाची घोषणा केली. त्याच्या दुसऱया दिवशी सकाळी वॉशिंग्टन डीसीमध्ये निक्सन यांनी किसिंजर यांच्याकडे अशी विचारणा केली की, ‘सो पाकिस्तान इज गिव्हिंग ट्रबल देअर?’ किसिंजर म्हणाले, ‘इफ दे लूज हाफ ऑफ देअर कंट्री विदाऊट फायटिंग, दे विल बी डिस्ट्रॉईड. दे मे ऑलसो बी डिस्ट्रॉईड धीस वे टू. बट दे विल गो डाऊन फायटिंग.’ निक्सन म्हणाले, ‘पाकिस्तानी थिंग मेक्स युवर हार्ट सिंक. फॉर देम टू बी डन सो बाय इंडियन्स ऍण्ड आफ्टर वुई हॅव वॉर्नड् द बिच. (इंदिरा गांधी) टेल देम दॅट व्हेन इंडिया टॉक्स अबाऊट वेस्ट पाकिस्तान ऍटॅकिंग देम, इटस् लाईक रशिया क्लेमिंग टु बी ऍटॅक्ड बाय फिनलंड.’
क) युद्ध सुरू झाल्यावर एका आठवडय़ातच हिंदुस्थानी हल्ल्यांमुळे पाकिस्तानचे सैन्य जेरीस आले होते. अशा वेळी 10 डिसेंबर 1971 रोजी सकाळी किसिंजरशी बोलताना रिचर्ड निक्सन म्हणतात, ‘अवर डिझायर इज टू सेव्ह पाकिस्तान. सो कीप दोज एअरक्राफ्ट कॅरियर्स मुव्हिंग नाऊ. ऑलसो कुड यू टेल द चायनीज दॅट इट वुड बी व्हेरी हेल्पफूल इफ दे कुड मुव्ह सम फोर्सेस ऑर थ्रिटन टू मुव्ह फोर्सेस.’
ड) युद्ध संपत असताना निक्सन यांनी किसिंजरना सांगितले, ‘वुई हॅव टू गो फॉर रिहॅबिलिटेशन ऑफ पाकिस्तान. आय वॉण्ट टू हेल्प पाकिस्तान फॉर वॉर डॅमेज इन कराची ऍण्ड इन अदर एरियाज.’ किसिंजर यांनी मान डोलावली. निक्सन पुढे म्हणाले, ‘आय डोण्ट वॉण्ट इंडियन्स टु बी हॅपी. स्टार्ट ए पब्लिक रिलेशन प्रोग्राम टू पीस ऑन द इंडियन्स. दे हॅव पिस्ड ऑन अस ऑन व्हिएतनाम फॉर फाईव्ह इयर्स. गेट अ व्हाईट पेपर आऊट.’
त्या काळात हिंदुस्थानविरुद्ध उभ्या राहिलेल्या शत्रूंची संख्या किती मोठी होती हे निक्सन-किसिंजर यांच्यातील वरील दूरध्वनी संभाषणावरून लक्षात येते. हे संपूर्ण संभाषण अमेरिकेच्या डिक्लासिफाईड वेबसाइटमधील ‘डॉक्युमेंट 172’मध्ये वाचायला मिळते.





























































