
>> अरुण जोशी
उत्तर हिंदुस्थानी गायकी महाराष्ट्रात रुजवण्याचं श्रेय मुख्यत्वे पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडे जातं. रागदारीवर आधारित असलेलं प्राचीन हिंदुस्थानी संगीत शिकण्यासाठी अनेक गायक उत्तर हिंदुस्थानात जात असत. ग्वाल्हेर, आग्रा, किराणा, पतियाळा अशी अनेक गान-घराणी तिथे प्रसिद्ध होती. महाराष्ट्रात या कलेला आधी संस्थानिकांकडून राजाश्रय आणि नंतर लोकाश्रय मिळू लागल्यावर इथल्या जनसामान्यांना या संगीताची ओढ निर्माण झाली. शास्त्रीय संगीत सर्वत्र पोचवण्याचं कार्य पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्यासारख्या संगीत तपस्वींच्या अथक प्रयत्नांतून शक्य झालं. नंतरच्या काळात रागदारीवर आधारित संगीत-नाटकं येऊ लागली. या उपशास्त्रीय गाण्यांना आणि त्या काळातल्या दिग्गज गायकांना मानसन्मान प्राप्त झाला. शिवाय केवळ शास्त्रीय संगीताच्या मैफलीसुद्धा हिंदुस्थानभर होऊ लागल्या. रेल्वेसारखे प्रवासाचे साधन उपलब्ध झाल्याने एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात शास्त्रीय संगीत बहरलं आणि मराठी रसिकांची या संगीताविषयीची जाण वाढली. त्यातूनच देशातले अनेक गायक (गायिका) महाराष्ट्रात स्थायिक झाले. उस्ताद अब्दुल करीम खां त्यापैकीच.
त्यांचा जन्म 1972 मध्ये उत्तर प्रदेशातल्या किराना येथे झाला. त्यांच्या घराण्याचं नावही तेच. उस्तादांचे पूर्वज गुलामअली आणि गुलाममौला यांच्यापासून ही परंपरा पिढी दर पिढी चालत आली. अब्दुल करीम यांचे वडील कालेखां हे गुलाम अलींचे नातू. अब्दुल करीम खां यांचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण वडील आणि काकांकडे झालं. गाण्याबरोबरच बालवयात ते सारंगी उत्तम वाजवत. वीणा, सतार, तबला या वाद्यांवरही त्यांचं प्रभुत्व होतं, मात्र रहमतखां यांच्या प्रभावामुळे त्यांनी कंठसंगीत हेच आपलं ध्येय ठरवलं. तरुण वयात या गोड गळय़ाच्या गायकाला बडोद्याच्या महाराजांच्या दरबारात कला सादर करण्याची संधी मिळाली आणि महाराज त्यांच्या गाण्याने प्रभावित झाले. अब्दुल करीम खां तेथे दरबारी गायक झाले. कालांतराने मुंबईला आल्यावर उस्ताद अब्दुल करीम खां मराठी संस्कृतीशी एकरूप झाले आणि इथेच राहिले. त्याच काळात जयपूरहून आलेले उस्ताद अल्लादिया खांसुद्धा महाराष्ट्रातच स्थायिक झाले होते. कोल्हापूरचा राजदरबार अशा गुणी कलावंतांचा मोठा आधार होता. उस्ताद अब्दुल करीम खां यांनी महाराष्ट्रात अनेक मोठे कलावंत घडवले. बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी, गणपराव गुरव, रोशनआरा बेगम, विश्वनाथबुवा जाधव, सुरेशबाबू माने आणि पंडित भीमसेन जोशी यांचे गुरू रामचंद्र कुंदगोळकर ऊर्फ सवाई गंधर्व एवढी तेजस्वी गायकांची मांदियाळी उस्ताद अब्दुल करीम खां यांच्याकडे संगीत साधना करून तयार झाली.
1913 मध्ये खांसाहेबांनी पुणे येथे ‘आर्य संगीत विद्यालय’ स्थापन केलं. त्यानंतर ते मिरज येथे स्थायिक झाले. म्हैसूरच्या दरबारात त्यांना मोठा मान होता. ते धारवाड येथे असताना रामभाऊ कुंदगोळकर हे त्यांचे शिष्य झाले आणि पुढे सवाई गंधर्व म्हणून प्रसिद्ध पावले. उस्ताद अब्दुल करीम खां ठिकठिकाणी मैफली करत. 1957 मध्ये पुद्दुचेरी (त्या वेळचं पॉण्डिचेरी) येथे कार्यक्रमाला जात असताना प्रवासात त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांचे अमर स्वर मात्र मागे राहिले. त्यांची परंपरा सुरेशबाबू माने तसंच हिराबाई बडोदेकर आणि सरस्वती राणे यांनी समर्थपणे पुढे चालवली. त्यांच्या किराणा घराण्याचेच महान गायक पंडित भीमसेन जोशी यांचं गाणं तर जगभर पोहोचलं. या स्वरभास्कराला ‘भारतरत्न’ म्हणून गौरविण्यात आलं. हा अब्दुल करीम खां यांच्याच सांगीतिक परंपरेचा एक प्रकारे सन्मान होता.
अब्दुल करीम खां यांचं खूप कमी रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. तरीही त्यांनी गायिलेली मराठी नाटय़पदं आज यू-टय़ूबवरून ऐकता येतात. ‘उगीच का कांता गांजिता’ (सं.मूकनायक), ‘प्रेमभावे जीव जगी या नटला’ (मानापमान), ‘नच सुंदरी करू कोपा’ (सौभद्र), ‘चंद्रिका ही जणू’ आणि ‘प्रेम सेवा शरण’ (मानापमान), तसंच ‘तारी तारी रे रामराया’ आणि ‘आता रामपायी मना लाग वेगे’ अशी गाणी उपलब्ध आहेत. त्यातून उस्तादांच्या सात्त्विक गायकीची कल्पना येते. त्यातील आलापि, तराणा यातून स्वरांवरची हुकूमत जाणवते. ‘प्रेम सेवा शरण’ हे गाणं नंतर मास्टर दीनानाथ यांनी वेगळय़ा पद्धतीने गाऊन खूपच लोकप्रिय केलं. अब्दुल करीम खां यांची चाल थोडी निराळी आहे असं लक्षात येईल. तीच गोष्ट ‘चंदिका ही जणू’ या गीताची. पूर्वी आमच्याकडे ‘फोनो’वर ऐकलेल्या या ‘रेकॉर्डस्’ परवा पुन्हा नेटवर ऐकल्या आणि बरं वाटलं.

























































