ठसा – अभय मोकाशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रभाकर पवार

ज्या दिवशी वाढदिवस होता त्याच दिवशी ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे वयाच्या 69 व्या वर्षी कर्करोगाने बोरिवली येथे गेल्या आठवड्यात निधन झाले आणि एक लढाऊ पत्रकार काळाच्या पडद्याआड गेला. तीन वर्षांपूर्वी मोकाशी यांच्या पत्नीचे निधन झाले तेव्हा त्यांची भेट झाली होती. नंतर फोनवर बोलणेही व्हायचे, परंतु इतक्या लवकर मोकाशी हे जग सोडून जातील असे वाटले नव्हते. असो, अभय मोकाशी हे संघर्ष करणारे, कुणाचाही मुलाहिजा न ठेवणारे, स्वतंत्र बाण्याचे प्रामाणिक पत्रकार होते. पत्रकारिता कशी करावी, याचे धडे शेकडो तरुणांनी त्यांच्याकडून घेतले. त्यातील बहुसंख्य जणांनी पत्रकारितेची मूल्ये पाळली. अभय मोकाशी ज्याप्रमाणे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर झाले नाहीत त्याप्रमाणे तेदेखील झाले नाहीत. माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी आपल्या मुलीचे वैद्यकीय पदवी परीक्षेत 2 गुण वाढविले आणि नापास झालेल्या मुलीला पास केले अशी बातमी अभय मोकाशी यांनी आपल्या वर्तमानपत्रात छापली तेव्हा डॉ. शिवाजीराव निलंगेकर यांच्यासह सारे मंत्रिमंडळ हादरून गेले. विरोधकांनी अभय मोकाशी यांच्या बातमीचे, धाडसाचे कौतुक करून निलंगेकरांच्या राजीनाम्याची मागणी केली. वैद्यकीय क्षेत्रात तणाव निर्माण झाला. राजकीय वातावरण तापले. अखेर निलंगेकरांना अभय मोकाशींच्या खळबळजनक बातमीमुळे राजीनामा द्यावा लागला. अभय मोकाशी यांनी आयुष्यभर निःपक्षपाती पत्रकारिता केली. आपल्या विद्यार्थ्यांना ते ‘‘पत्रकारिता हे एक ‘क्रत’ आहे, संकल्प आहे, त्याच्याशी प्रामाणिक राहा. कोणाशी तडजोड करू नका’’ असे नेहमी सांगायचे. त्यामुळे अभय मोकाशींबाबत लोक नेहमीच आदराने बोलत. अभय मोकाशी हा पत्रकारितेमधील एक आदर्श होता. सध्याच्या बिघडलेल्या राजकीय वातावरणात अभय मोकाशींसारखे विश्वसनीय, सच्चे, इमानदार, चारित्र्यवान पत्रकार सापडणे कठीण आहे. अभय मोकाशींचे बोलणे फारच तोलून मापून असायचे. ते कधी कुणाशी कठोरपणे बोलले नाहीत. त्यांनी कधी कुणाला दुखावले नाही. असा हा सभ्य पत्रकार कर्करोगाशी लढताना अकाली गेला याबद्दल मराठी व इंग्रजी वृत्तपत्रसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.