रंगीला रे तेरे रंग मे…

>> प्रा. अनिल कवठेकर

तो केवळ स्टाईलबाज एवढेच आपल्याला माहीत आहे, पण ही त्याची एक बाजू झाली. त्याची दुसरी बाजूही आहे. तो एक उत्तम विचारवंत … एक उत्तम फिलॉसॉफर होता. जीवनावर मनस्वी प्रेम करणारा होता. 26 सप्टेंबर हा अभिनेते देव आनंद यांचा जन्मदिन. या स्टाईलिश, सदाबहार हिरोच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडणारा लेख…

देव आनंद म्हणजे तारुण्य, उत्साह, नवचैतन्य, रोमान्स, उमदेपणा… देव आनंद म्हणजे निरागस हास्य, देव आनंद म्हणजे स्टाईल, केसांचा कोंबडा, गाणे गाताना धावण्याची स्टाईल, डोक्यावर टोपी ठेवण्याची, शर्टावर स्वेटर घालण्याची स्टाईल, स्वेटरचे हात वर करून शर्टाचे हात दाखवण्याची स्टाईल, जॅकेट घालण्याची वा गळ्यामध्ये मफलर घालण्याची स्टाईल, एका दमामध्ये मोठय़ात मोठा संवाद बोलण्याची स्टाईल. थोडक्यात देव आनंद म्हणजे स्टाईलचा बादशहा. त्याच्याकडे पाहून आपणही तसंच करावं, असं वाटायला लावणारा एक अतिशय वेगळा, पण सगळ्यांच्या मनातला देखणा नायक. सगळ्यांच्या मनातला सौंदर्याचा पुतळा असणारा राजपुत्र म्हणजे देव आनंद होय. तो सगळ्यांना आवडतो. सगळे जण त्याच्यावर प्रेम करतात आणि गंमत म्हणजे त्याच्या चुकांवरसुद्धा प्रेम करतात. त्याच्या स्टाईलवर प्रेम करतात. एक काळ असा होता की, देव आनंदने शर्टवर स्वेटर घालून स्वेटरचे हात वर करून शर्ट दाखवला तर आपल्या देशात सगळ्याच तरुणांची ती स्टाईल झाली. त्याने केसांचा कोंबडा केला तसा  तरुणांनी आपल्या केसांचा कोंबडा केला. जगभर त्याचे अनुकरण झाले. त्याने विशिष्ट जॅकेट घातले तर त्या कंपनीने ट्राऊझर बनवण्याचे सोडून जॅकेट बनवायला प्रारंभ केला. इतकी त्या जॅकेटची मागणी वाढली. त्यांनी विशिष्ट प्रकारची टोपी घातली आणि बाजारामध्ये त्या टोपीची मागणी वाढली. असा हा स्वतःची स्टाईल अत्यंत सुंदर पद्धतीने तरुणांपर्यंत पोहोचवणारा एकमेव स्टाईलिश हीरो म्हणजे देव आनंद होय.  त्याचा गळा कधीच मोकळा नव्हता. कधी स्कार्फची एकच गाठ मारायचा. कधी कधी टायसारखी गाठ मारायचा. एकच स्कार्फ तो अनेक प्रकारे प्रत्येक चित्रपटात वेगळ्या प्रकारे वापरायचा आणि ते त्याला सुंदर दिसायचं, लोकांनाही तसं करावंसं वाटायचं.

चित्रपटातील गाणी गाताना तो कधी काठी घेऊन धावायचा, तर कधी मासे पकडण्याचा गळ घेऊन रस्त्याने नायिकेच्या कारच्या पुढे पुढे गाणं गात चालायचा. ‘ये दिल न होता बेचारा’ (चित्रपट ज्वेल थीफ ), तर कधी फुलपाखरांना पकडण्याची जाळी घेऊन  ‘शोखीयो में घोला जाये फुलो का शबाब’ (चित्रपट ‘प्रेमपुजारी’) असे म्हणत एखाद्या निरागस, लहान, खटय़ाळ मुलासारखा शेताशेतामधून त्याचं ते सुंदर हास्य करत धावत निघायचा. त्याचे सगळे चित्रपट चालले असे नाही, पण त्याच्या चित्रपटांतील सगळी गाणी मात्र चालली. कारण खऱया  अर्थाने रोमान्स काय असावा हे जाणून तशी गाणी त्याने आपल्याला दिलेली आहेत. ती शब्दाशब्दांतून प्रेमाचा फुलोरा व्यक्त करणारी गाणी अजूनही आपल्या ओठांवर रेंगाळत राहतात. खरं तर त्या गाण्यावरच एक सुंदर लेखमाला होईल. त्याची रोमँटिक हीरो म्हणून इमेज इतकी सुप्रसिद्ध होती की, त्याला जेव्हा ‘हरे रामा हरे कृष्णा’ हा चित्रपट निर्माण करायचा होता. तेव्हा त्या काळातील एकही हिरोईन त्याच्याबरोबर त्याच्या बहिणीची भूमिका करण्यासाठी तयार नव्हती. ती भूमिका झीनत अमानने केली. कारण तो  तिचा पहिलाच चित्रपट होता. ती त्या वर्षीची ‘मिस आशिया’ या स्पर्धेची विनर होती.

 देव आनंद म्हणजे केवळ स्टाईलबाज एवढेच आपल्याला माहीत आहे, पण ही त्याची एक बाजू झाली. देव आनंदची दुसरी बाजूही आहे. तो एक उत्तम विचारवंत होता. तो एक उत्तम फिलॉसॉफर होता. जीवनावर मनस्वी प्रेम करणारा होता. निसर्गावर अलोट प्रेम करणारा, डोंगरावर चढल्यानंतर आपला पुन्हा एकदा जन्म होतो असं वाटणारा. चित्रपटावर अत्यंत प्रामाणिकपणे प्रेम करणारा दिग्दर्शक होता, नायक होता, पटकथा लेखक होता.  लहान मुलासारखं जीवनाचं रहस्य शोधण्यात त्याला मोठी जिज्ञासा होती. त्याचं स्वतःचं म्हणणं अगदी पक्कं होतं. दुसऱयांच्या विचारांचा सन्मान करणारा होता. असं म्हणता येईल की, त्याला आत्मजागृती झालेली असावी. त्याची अत्यंत मधाळ भाषा अनेक वेळा त्याच्या मुलाखतीतून आपल्याला जाणवते, पण त्याच्या त्या स्टाईलमध्ये त्याची ही बाजू आपल्यापर्यंत आलीच नाही.

त्याचं नाव  धरमदेव आनंद असे होते, पण ‘धरम’ हा शब्द माणसाला नेहमी गोंधळात टाकणारा आहे. त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणारा आहे असे त्याला वाटत होते. म्हणून त्याने आपल्या नावातील ‘धर्म’ हा शब्द काढून टाकला आणि  ‘देव आनंद’ हा आनंद देणारा शब्द स्वीकारला असे सहजपणे मोकळेपणाने त्याने एका ठिकाणी सांगितलेले आहे.

देव आनंदला अनेक वेळा अनेक जणांनी एकच प्रश्न विचारला की, तुमच्या तारुण्याचं रहस्य काय? तेव्हा देव आनंद म्हणाला, ‘अगर वह राज है तो राज ही रहने दो.’ पुन्हा हसत हसत म्हणाला, ‘वो कोई राज नही है. मी जीवनावर अत्यंत प्रेम करतो. मी निसर्गावर प्रेम करतो. मी निसर्गाशी बोलतो. मी जेव्हा चित्रपट निर्माण करतो तेव्हा कॅमेऱयासमोर आणि कॅमेऱयाच्या मागे पंधरा-सोळा तास मजेत काम करतो. कदाचित हेच ते माझ्या तारुण्याचं रहस्य असेल.’ तरीही एका मुलाखतीत त्याला पुन्हा हाच प्रश्न विचारला तेव्हा त्याने ते आपल्या स्टाईलमध्ये सांगितले, ‘इटिंग लेस स्मायलिंग फेस आणि ऑल्वेज बिझी.’ आयुष्याच्या शेवटपर्यंत चित्रपटावर प्रचंड प्रेम करणारा. नावीन्याचा ध्यास असणारा. चित्रपटातून  लोकांना काहीतरी आपल्याला देता येईल, अशी खूप सुंदर भावना मनाशी बाळगणारा देव आनंद. आज त्याचा वाढदिवस आहे. आपण त्याला जन्मदिनाच्या  शुभेच्छा देऊ या! कारण देव आनंदसारखे नायक कधीही मरत नाहीत. ते  त्यांच्या स्टाईलच्या रूपाने आपल्यामध्ये जिवंत असतात.