बारावीनंतर…विविध वाटा अन् करीअरच्या संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुदाम कुंभार, (निवृत्त प्राचार्य तथा समुपदेशक)

बहुतांशी विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांची माहिती नसल्यामुळे या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतले जात नाहीत. जर खरोखरच आपणाला एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये करीअर करायचे असेल तर असे अभ्यासक्रम जाणून घेणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे.

बॅचलर ऑफ मास मीडिया (बी.एम.एम.)

हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम आजच्या तरुणाईमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. आकाशवाणी, इंटरनेट, सर्व वृत्तवाहिन्या  तसेच मनोरंजन वाहिन्या, मासिके, साप्ताहिके इत्यादी क्षेत्रांत प्रवेश करण्यासाठी हा पदवी अभ्यासक्रम तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो. तुमच्या  बुद्धिमत्तेला सर्जनशीलतेची जोड देऊन तुम्हाला तुमचे करीअर घडवण्यासाठी हा अभ्यासक्रम नक्कीच उपयुक्त आहे.

बॅचलर ऑफ डिझाईन 

या अभ्यासक्रमांतर्गत फॅशन डिझायनिंग, टेक्स्टाईल डिझायनिंग, इंटेरिअर डिझायनिंग याबरोबरच मल्टिमीडिया डिझाईन, व्ही.एफ.एक्स तंत्रज्ञान, वेब डिझाईन तसेच गेम डिझाईन  इत्यादी कौशल्यांचा अभ्यास करण्याची संधी तुम्हाला मिळते व याच क्षेत्रात भविष्यात तुम्ही तुमचं करीअर घडवू शकता.

ऑनिमेशन 

बॅचलर्स डिग्री इन ऑनिमेशन हा एक विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे.  या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमांमध्ये तुम्हाला टूडी/थ्रीडी अनिमेशन तंत्रज्ञान शिकवले जाते. आज विविध मनोरंजन वाहिन्या आणि  चित्रपट निर्मितीमध्ये टूडी आणि थ्रीडीचे तंत्रज्ञान वापरले जाते. मुलांना आकर्षित करणारी गेमिंग इंडस्ट्रीसुद्धा आघाडीवरच आहे.

बॅचलर ऑफ सोशल वर्क (बी.एस.डब्लू.)

बहुतांश विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम माहीत नाही, परंतु या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमांमध्ये एक सोशल वर्कर (समाजसेवक) होण्यासाठीची कौशल्ये या अभ्यासक्रमांतर्गत शिकवली जातात.  लोकांच्या भल्यासाठी, त्यांचे जीवनमान समृद्ध करण्यासाठी झटणार असाल तर हा अभ्यासक्रम तुमच्यासाठी आहे. अभ्यासक्रमादरम्यान संशोधन, देशातील सामाजिक समस्या, त्यांच्यासाठी राबवलेली धोरणे तसेच सेवाभावी संस्था कशा प्रकारे काम करतात याचासुद्धा अभ्यास करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.

बॅचलर इन सायकॉलॉजी 

मानवी मनाचा अभ्यास करून भविष्यात शालेय विद्यार्थी, समाजातील समस्याग्रस्त व्यक्ती आणि खासगी तसेच शासकीय उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करून त्यांना समुपदेशन करण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो. या अभ्यासक्रमांतर्गत मानसशास्त्र,  मानवी वर्तन आणि मानवाचा विकास इत्यादीबाबत तुम्हाला अभ्यास करण्याची संधी मिळते. तीन वर्षांचा अभ्यासक्रम तसेच याच विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर मानसशास्त्रज्ञ किंवा समुपदेशक म्हणून तुम्ही तुमचं करीअर करू शकता.

बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (बी.एच.एम.)

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई आयोजित कोणत्याही शाखेतून इयत्ता  12 वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी  हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेशास पात्र असतील.

सामायिक परीक्षेची नोंदणी करण्याची कार्यपद्धती, परीक्षा शुल्क, सामायिक परीक्षेचे केंद्र, सामायिक परीक्षेसाठी अभ्यासक्रम, निर्धारित केलेले गुण, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या सहाय्यभूत सेवा तसेच त्यांच्यासाठीचे निकष, नमुना प्रश्नपत्रिका इत्यादीसाठी पुढील वेबसाईटवरून सविस्तर माहिती घ्यावी- https://bhmct2021.mahacet.org