स्थापत्यशास्त्राचा कल्पतरू आविष्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गजानन शेपाळ

नगर जिल्ह्याच्या शहराजवळ स्थापत्यशास्त्राचा उपयोग करून ‘कल्पतरू’ या धार्मिक आणि सामाजिक स्थळाची निर्मिती झाली. संपूर्ण मंदिरशास्त्राचा आणि पुरातन वास्तू तंत्र विज्ञानाचा उपयोग करून, रंगशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ग्रहविज्ञान, अंकशास्त्र आणि वैदिक मंत्र, ऋचा यांचा उपयोग करून ही वास्तू उभी राहिली आहे…  

आपल्या देशात किंबहुना जगात, जुन्या वास्तू, जुनी धार्मिक स्थळं, पुरातत्व स्थळं यांच्या श्रेष्ठतेबद्दलचं महत्त्वं सांगितलं जातं. ते वाचून वा ऐकूण आपण त्या स्थानाला भेट देत असतो. फारच प्राचीन काळी आपल्याकडे मंदिर स्थापत्य, मूर्तीशास्त्र, वास्तुशास्त्र अशा विविध ज्ञानमार्गांचा उपयोग हा प्रत्यक्ष कृतीसाठी केला जायचा. त्याच भावनेतून एखादे मंदिर वा एखादी वास्तू निर्माण केली जात असे.  केवळ भव्यता प्राप्त करून कुठलंही स्थापत्य महान बनत नाही, असं माझं प्रांजळ मत आहे. छ. शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्वीचे व्ही. टी. स्टेशन) 1850च्या दरम्यान बांधत असताना त्या वास्तुविषारदाने मि. सी. एम. स्टिव्हनने, सातव्या शतकातील ‘शिल्पप्रकाश’ या ग्रंथाचा वास्तुनिर्मितीला उपयोग करून घेतला असावा, असे संदर्भ पीएच. डी.चा संदर्भग्रंथ बनविताना ध्यानात आले. ही सारी प्रस्तावना एवढय़ाचसाठी की, महाराष्ट्रात, नगर या जिह्याच्या शहराजवळ अशाच स्थापत्यशास्त्राचा उपयोग करून ‘कल्पतरू’ या धार्मिक आणि सामाजिक स्थळाची निर्मिती झाली. संपूर्ण मंदिरशास्त्राचा आणि पुरातन वास्तू तंत्र विज्ञानाचा उपयोग करून, रंगशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ग्रहविज्ञान, अंकशास्त्र आणि वैदिक मंत्र, ऋचा यांचा उपयोग करून ही वास्तू उभी राहिली आहे. या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात दि. 7 या दिवशी या वास्तूची आणि या वास्तूतील आधुनिक संतांसह पुराणकाळापासून वर्णने असलेल्या देवतांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

अशा प्रकारची वास्तू गेल्या 2000 वर्षांत ना हिंदुस्थानात ना जगात बांधण्यात आलेली असावी…!! याचं कारण असं आहे की, वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशा, त्या दिशेचे स्वामी त्या दिशेचे नक्षत्र तसेच नक्षत्र स्वामी, त्यादिशेचा स्वगृहीचा ग्रह, त्या दिशेची देवता, त्या दिशेचा धातू, धान्य, वृक्ष, मंत्र, त्या दिशेच्या देवतांसह त्यांच्या इतर सहदेवता आणि त्यांचा 1 ते 9 मधील भाग्यांक… अशा साऱया तपशिलाची यादी बनवून खास पंचधातूंसह त्या त्या दिशेच्या देवतेचा (लाभदायक) आवडता धातू… यांच्या एका विशिष्ठ प्रमाणातील ‘यंत्राकार’ तयार करून, त्या दिशेच्या, लाभ देणाऱया रंगाचा उपयोग सदर यंत्राकारात सदर रंगाने अलंकृत करण्यात आले. अशा प्रकारची आठ दिशांची आठ यंत्रे, सदर वास्तूच्या अष्टकोनी भिंतीच्या पायाशी स्थापित केली, सदर अष्टकोणी वास्तूच्या अष्टकोणी पिरॅमिडच्या, जिथे आठही दिशांची टोके एकत्रित येतात त्या ठिकाणी स्थापित केली. ही विशिष्ठ आकारांतील यंत्रे, त्या त्या रत्नांनी युक्त अशी, स्थपन करताना, लाभदायक नक्षत्रांच्या आणि ग्रहस्थितीच्या मुहूर्तांचा विचार केला. हेच तंत्र  सदर गर्भगृहासमोरील सभामंडपावरील तीन प्रकारच्या ‘पिरॅमिड’ आकाराच्या उंचवटय़ांच्या टोकात यंत्र स्थापन करताना उपयोगात आणले. सत्व, रत्न, तन गुणांचे तीन प्रकारचे ‘पिरॅमिडस्’नी युक्त निर्माण झालेला सभामंडपदेखील तितकाच महत्त्वाचा आहे.

या ‘कल्पतरू’ वास्तुतील मुख्य मूर्ती ही, धनकवडी, पुणे येथील श्री सद्गुरू शंकरबाबा मठातील, श्री शंकर महाराजांची आहे. स्वच्छ सफेद संगमरवराच्या दगडातून साकारलेली ही मूर्तीदेखील अत्यंत वास्तववादी शैलीतील आणि संगमरवरी शिल्प कलेचा एक सुंदर आविष्कार आहे. येथीलच आणखी एक मूर्ती आहे. ‘यलो स्टॅण्ड स्टोन’मधील, कुबेर देवतेची मूर्तीदेखील, नगरवासीयांचं भूषण तर ठरेलच, परंतु श्रद्धास्थानही ठरेल एवढी, पवित्र भाव धारण केलेली आहे. तिसरी मूर्ती ही अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची आहे. सफेद संगमरवरी वास्तववादी शैलीत निर्माण केलेल्या मूर्तीच्या चेहऱयावरील भाव कोरताना शिल्पकाराच्या उत्कटभावनांचा आविष्कार व्यक्त होताना दिसतो. या सभागृहाच्या सुरुवातीलाच, काळय़ा पाषाणातील वीर हनुमंतांच्या चार दिशांना चार अशा स्थितीतील एकाच पाषाणात, अर्धउठावाने कोरलेल्या मूर्तींनी युक्त एक सुंदर शिल्प मिलाप आहे. चारही दिशांकडून येणाऱया संकटांपासून रक्षण करणाऱया वीर हनुमंतांच्या चतुर्मूतींच्या दर्शनाने भाविक संकटमुक्त होवो… या सद्भावनेतून हे शिल्प साकारलेले आहे. असे आधुनिक शिल्प नगर येथील, ‘कल्पतरू’च्या वास्तुमध्येच पाहायला मिळेल. कल्पतरू नामक वास्तुस्थापत्य लवकरच प्रसिद्ध होईल, यात संदेह नाही.

[email protected]