वेब न्यूज – हत्तींच्या सुरक्षेसाठी AI

<<< स्पायडरमॅन >>>

आपल्या देशात रेल्वे रुळावर रेल्वेच्या धडकेने अनेकदा हत्तींचे अपघात होतात आणि बरेचदा त्यांचा जीवदेखील जातो. अशा घटना रोखण्यासाठी रेल्वे विभाग आणि वन विभाग कायम प्रयत्न करत असतात. आता रेल्वे आणि वन विभाग या दोघांनी संयुक्तपणे आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारे तंत्रज्ञान वापरून अशा अपघातांच्या घटना रोखण्याचे ठरवले आहे. हे तंत्रज्ञान अतिशय उत्तमपणे आपली कामगिरी पार पाडत असल्याने आता हे तंत्रज्ञान देशभरात वापरण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे.

फेब्रुवारी 2024 मध्ये तामीळनाडूच्या वन विभागाने मदुकराई क्षेत्रामध्ये A1 Alert system (IDS) (इंटर रनिंग सिस्टिम) लागू केली. ही यंत्रणा हत्ती रेल्वे ट्रकच्या जवळपास पोहोचण्यापूर्वीच ते येत असल्याचा इशारा देते आणि वेळीच हत्तीला रेल्वे रुळापासून दूर करण्यात यश मिळते. एका वर्षात या यंत्रणेने पाच हजारांपेक्षा जास्त इशारे देऊन अनेक अपघात टाळण्यात मोठी मदत केली आहे. या यंत्रणेची ही कामगिरी पाहून सरकार आता झारखंडमध्येदेखील तिचा वापर सुरू करण्याच्या तयारीत आहे.

नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे विभागदेखील ही यंत्रणा सुरू करणार आहे. हिंदुस्थानच्या रेल्वे विभागाने रॅम्पसच्या मदतीने ही Intrusion detection system (IDS) तयार केली आहे. या यंत्रणेत ऑप्टिकल फायबर आधारित सेन्सर्स आणि AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हत्तीबरोबरच इतर वन्य जिवांच्या रक्षणासाठीदेखील त्याचा उपयोग होत आहे. हत्ती अथवा इतर कोणताही वन्य जीव त्याच्या सीमारेषेतून बाहेर पडतो आणि रेल्वे रुळांपासून विशिष्ट अंतरात प्रवेश करतो त्या क्षणी ही यंत्रणा त्याची घुसखोरी पकडते आणि तातडीने तसा इशारा देते. हत्तींच्या सुरक्षेसाठी ह्या यंत्रणेचे विस्तारीकरणदेखील करण्यात येणार असून त्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची गस्त, निगराणी आणि थर्मल कॅमेऱ्यांचादेखील वापर करण्यात येणार आहे. देशभरातील हत्ती मार्गांवर ही योजना लागू करण्यात येणार आहे.