लेख – प्रदूषणविरहित हवा हा मूलभूत हक्क!

583

>> सुनील कुवरे

मुंबईकरांना प्रदूषणाच्या विळख्यातून सोडवायचे कारखाने, वाहने इतरातून होणाऱ्या धुरांचे उत्सर्जन कमीत कमी करायला हवे. तसेच रस्त्यावरून धावणारी हजारो वाहने यामुळे ध्वनी आणि वायुप्रदूषणाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून त्यावर आताच उपाययोजना करणे गरजेचे आहे. रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी केली तर वायुप्रदूषण कमी होईल. खासगी वाहनांवर निर्बंध आणावेत. प्रदूषणाचे सर्वाधिक पातळीवर पोहचलेले प्रमाण कमी करणे हाच त्यावर एकमेव उपाय आहे. कारण स्वच्छ हवा हा आपला महत्त्वाचा मूलभूत अधिकार आहे. सरकारने वायुप्रदूषण हा राष्ट्रीय प्रश्न मानून यात लक्ष घालण्याची गरज आहे.

दिवसागणिक वायुप्रदूषणाचे वाढते प्रमाण ही जागतिक समस्या बनली आहे. वायू, ध्वनिप्रदूषणामुळे मानवी जीवनाचे आरोग्यमान ढासळत चालले आहे. बेसुमार वृक्षतोड, वाहनांची वाढती संख्या आणि ध्वनिप्रदूषणामुळे देशातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वायुप्रदूषणामुळे गेल्या काही वर्षांत सर्वच वयोगटांतील नागरिकांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होत आहेत.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई महापालिका पर्यावरण विभागाच्या ताज्या अहवालानुसार मुंबई हे देशातील किनारी महानगरांमधील सर्वाधिक प्रदूषित शहर बनले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जागतिक आरोग्य संघटनेने प्रदूषण पातळीची निश्चित केलेली मर्यादा या मुंबईसह राज्यातील अनेक शहरांनी ओलांडल्यामुळे स्वच्छ हवेवर प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई महापालिका पर्यावरण विभाग या दोन संस्थांनी 2018- 19 या वर्षातील केलेल्या सर्वेक्षणानुसार हवेतील धुलीकणांचे प्रमाण ही सर्वात गंभीर समस्या असल्याचे आढळून आले आहे. सिपिसिबिने आखून दिलेली धुलीकणांची प्रमाणित पातळी 60 मायक्रो ग्रॅम इतके असायला हवी. एक मायक्रो ग्रॅम म्हणजे एका ग्रॅमचा दशलक्षाश भाग. 2015 मध्ये मुंबईच्या हवेत प्रतिघनमीटर 107  मायक्रो ग्रॅम घनधुलीकण होते. म्हणजे तेव्हाचे प्रमाण जवळपास दुप्पट होते. आता ते तिप्पट 166 झाले आहे. तर मुंबईतील प्रदूषित हवेत गेल्या तीन वर्षांत तब्बल 80 टक्के वाढ झाली आहे.

पूर्वी गिरण्या होत्या. त्यावेळी मुंबईत खूप प्रदूषित होती. कारण हवेत सल्फरचे प्रमाण जास्त होते. गिरण्यांच्या बॉयलरमध्ये जळणाऱ्या कोळशामुळे सल्फर डायऑक्साईडचे प्रमाण हवेत जास्त होते. 1990 नंतर हळूहळू गिरण्या बंद झाल्या. तसे वायुप्रदूषण कमी होत गेले, पण गेल्या काही वर्षांत धुलीकणांचे प्रमाण वाढले. मुंबईतले धुलीकणांचे प्रमाण धोक्याच्या पातळीवर आहे. मुंबईच्या वाढत्या प्रदूषणात मुख्य वाटा वाहनांचा आहे. मुंबईच्या वांद्रे -कुर्ला संकुल, अंधेरी, बोरिवली, माझगाव या भागांत धुलीकणांचे प्रमाण जवळपास दुप्पट असल्याचे दिसून येते. चेंबूर, भांडुप, कुलाबा, वरळी या भागांतही धुलीकणांची समस्या गंभीर असल्याचे अहवालात म्हटले आहे. ही दूषित हवा आजारी पाडते. मनःस्वास्थ बिघडते. ही चिंताजनक बाब आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते आजचे वातावरण किंवा हवा ही मृत्युदायी बनत आहे. जगातील दहापैकी नऊ लोकांना अशुद्ध हवेत राहावे लागते. हे विदारक सत्य आहे. तर वायुप्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात दहा वर्षांत चार पटीने वाढ झाली. जगातल्या दर आठ मृत्यूमध्ये एक मृत्यू वायुप्रदूषणामुळे होत आहे. हिंदुस्थान आणि चीनमध्ये जगात वायुप्रदूषणाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. देशात दरवर्षी 24 लाख मृत्यू हे वायुप्रदूषणामुळे होतात. त्यात महाराष्ट्रात वायुप्रदूषणामुळे 1 लाख 8 हजार अपमृत्यू झाले आहेत. त्यानंतर तामीळनाडू, केरळ, पंजाब, दिल्ली या राज्यांचा क्रमांक लागतो. प्रदूषणाच्या राक्षसाने हिंदुस्थानला मगरमिठीच मारली आहे. दररोज देशातील नागरिकांना गिळंकृत करीत सुटला आहे. असे म्हटले तर वावगे ठरू नये.

देशाची आर्थिक राजधानी मुंबई देशातील सर्वाधिक प्रदूषित महानगर म्हणून पुढे येत आहे. उदा. द्यायचे तर मुंबईतील माहूल परिसरातील जवळपास दीड लाख लोकांना प्रदूषणाच्या समस्येने अक्षरशः जेरीस आणले आहे. 2017 या वर्षात माहूलमध्ये विविध प्रकारच्या संसर्गामुळे जवळपास शंभरच्या वर मृत्यू झाले.

मुंबईत प्रदूषण वाढण्याची विविध घटक कारणीभूत आहेत. गेल्या काही वर्षांत मुंबईत सुरू असलेली विविध विकासकामे आणि बांधकामे यातून निर्माण होणारी धूळ, तसेच वाहनांमधून निघणारा धूर हवा प्रदूषणासाठी कारणीभूत आहे. वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण 16 टक्के इतके आहे. तसेच प्रक्रिया न केलेले औद्योगिक उत्सर्जन, कचऱ्याच्या ढिगांना आग लावल्याने होणारे प्रदूषण. हवेतील धुलीकणांचे वाढते प्रमाण हे नागरिकांच्या श्वसनासाठी त्रासदायक ठरते. हवेतील सल्फर डायऑक्साईडचे प्रमाण वाढल्यामुळे छातीत दम लागणे, दमा, खोकला आदी त्रास होतो. श्वसनाच्या विकारांचे प्रमाण अगदी कमी वयातच दिसून येत असल्याची गंभीर बाब अहवालात नमूद केली आहे. तसेच हवेतील अमोनिया पाण्यात मिसळला गेल्यास त्याचे दुष्परिणाम मानवाबरोबर वृक्षवल्लीनाही होतो, असे तज्ञ व्यक्तींचे मत आहे.

मुंबईकरांना प्रदूषणाच्या विळख्यातून सोडवायचे कारखाने, वाहने इतरातून होणाऱ्या धुरांचे उत्सर्जन कमीत कमी करायला हवे. तसेच रस्त्यावरून धावणारी हजारो वाहने यामुळे ध्वनी आणि वायुप्रदूषणाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून त्यावर आताच उपाययोजना करणे गरजेचे आहे. रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी केली तर वायुप्रदूषण कमी होईल. खासगी वाहनांवर निर्बंध आणावेत. प्रदूषणाचे सर्वाधिक पातळीवर पोहचलेले प्रमाण कमी करणे हाच त्यावर एकमेव उपाय आहे. कारण स्वच्छ हवा हा आपला महत्त्वाचा मूलभूत अधिकार आहे, पण मुंबईकरांपासून तो हळूहळू हिरावत चालल्यासारखे वाटते. तेव्हा 2022 पर्यंत राज्य प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला असला तरी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने ही वायुप्रदूषण हा राष्ट्रीय प्रश्न मानून यात लक्ष घालण्याची गरज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या