मुद्दा : मारुतीरावांचे अजिंठाप्रेम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरुण निगुडकर

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील कालप्रवाहात नामशेष होत असलेल्या चित्रकृतींना पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रतिभावंत चित्रकार मारुतीराव पिंपरे यांनी आपल्या आयुष्याचे अर्धे शतक खर्ची घातले. मी पिंपरे यांना 20 वर्षे ओळखत होतो. वाशीम या ठिकाणाहून 1500 वर्षांपूर्वी त्यांचे पूर्वज वाकाटक सम्राटांनी अजिंठय़ाला चित्रकार म्हणून आणले होते अशी मारुतीरावांची धारणा होती. त्यापायी त्यांनी मुंबईच्या जे.जे स्कूलमध्ये चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केल्यावर अजिंठा हीच आपली कर्मभूमी मानून नोकरीसाठी इतरत्र उत्तम संधी उपलब्ध असताही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व पुरातत्व विभागात नोकरी केली. मूळ चित्रकारांनी 18 फूट उंचीची पॅनेल्स रंगविण्याअगोदर गौतम बुद्धांच्या जीवनावरील जातक कथांचा परिचय करून घेतला होता हे ते आवर्जून सांगत.त्या काळच्या चित्रकार, सुतार, शिल्पकार यांनी कुठलेही पॅनेल एकटय़ाने पूर्ण केलेले नाही. आधी डोंगर पोखरून घेणे, आवश्यक गुहा तयार करतानाच छताच्या मजबुतीसाठी ठरावीक आकाराचे खांब, शिल्पे, छत यांची कटाई, छाटणी, सफाई, चुन्याचे प्लॅस्टरिंग व ब्रशने अगोदर आऊटलाइन्स काढून त्यात ठरावीक छटेचे रंग भरणे यासाठी 800 वर्षे कारागीर, सुतार, शिल्पकार कसे राबले हे मारुतीरावांच्या बरोबर राहिल्याने मला नीट समजले. त्या कारागिरांच्या सुपरवायझर्सनी कापडावर, काळ्या फळ्यांवर व दगडी पृष्ठभागावर चित्रकृती तयार केल्या. अजिंठय़ाच्या डोंगरात काळे, पिवळे, तांबडे, व पांढरे रंग असलेले पिठूळ दगड मिळतात. ते दगडाच्या खलात कुटून विविध रंग तयार करीत. त्यात वनस्पतींचे रस मिसळून ही पॅनेल्स रंगविली आहेत. अशी मूळ कलाकारांची चित्रे शेकडो वर्षे जपून ठेवली गेली म्हणून चित्रकार व कारागिरांच्या पिढय़ान्पिढय़ा तयार झाल्या, तिथे खपल्या. त्यांना सातवाहन, वाकाटक, गुप्त राजघराण्यांनी तिथे वसविले, जेवणाखाणाची सोय केली. हे शेकडो वर्षे चाललेले मॅन पॉवर प्लॅनिंग आहे हे मला पिंपरे यांच्या संपर्कात आल्याने समजले हे माझे भाग्य असे मी समजतो. अजिंठय़ाची चित्रशैली मारुतीरावांच्या रोमरोमात अशी भिनली होती हे वाचकांच्या व जाणकारांच्या लक्षात आणून देणे हे माझे कर्तव्य आहे असे मला वाटते.

[email protected]