नैराश्यावर आशेचं शिंपण करणारा सण

>> प्रा. बी. एन. चौधरी

आपल्या पूर्वजांना, स्नेहीजनांना आठवण्याचा, त्यांची मुक्ती प्रशस्त करण्याचा आणि जे हयात आहेत त्यांचे, नव्याने जगणे सुरू करण्याचा सण म्हणजे ‘अक्षय तृतीया’. जगणे हे रहाटगाडगे आहे. सुख आणि दुःख हे येणार आणि जाणार. जगणे अक्षय असावे, ते थांबू नये, खंडू नये हा मंत्र देणारा हा सण. नैराश्यावर आशेचे शिंपण करणारी ‘अक्षय तृतीया’.

सध्या कोरोना संकटाने देशभरात थैमान घातले आहे. घराघरात कोरोना रुग्ण आहेत. अनेक घरांतून त्या घरातील जीवलग माणसे मृत्यूला सामोरी गेली आहेत. हे जग सोडून गेली आहेत. घराघरात दुःख, दैन्य आणि चिंता पसरली आहे. अशा वेळी सण-उत्सव साजरे करण्यावरही बंदी आहे. असे असले तरी आपली संस्कृती महान आहे. ती जिवंत माणसांचा जसा विचार करते तसाच विचार मृत व्यक्तीचा, त्यांच्या आत्म्यांचाही करते. जे आपल्याला सोडून गेले. आज आपल्यात नाहीत. ज्यांच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. गोडधोड खाऊ शकत नाही. नवे वस्त्र्ा प्रधान करू शकत नाही. ते सर्व करायला समाजमान्यता देणारा हा सण, म्हणजे अक्षय आनंद देणारी ‘अक्षय तृतीया’. आपल्या पूर्वजांना, स्नेहीजनांना आठवण्याचा, त्यांची मुक्ती प्रशस्त करण्याचा आणि जे हयात आहेत त्यांचे, नव्याने जगणे सुरू करण्याचा सण म्हणजे ‘अक्षय तृतीया’. जगणे हे रहाटगाडगे आहे. सुख आणि दुःख हे येणार आणि जाणार. जगणे अक्षय असावे, ते थांबू नये, खंडू नये हा मंत्र देणारा हा सण. नैराश्यावर आशेचे शिंपण करणारी ‘अक्षय तृतीया’. अर्थात खान्देशवासीयांची ‘आखाजी’.

अक्षय तृतीया हा महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीची घागर (मडके) आणून त्यात पाणी भरून वाळा टाकतात. त्यावर डांगर हे फळ ठेवून या भरल्या घटाची पूजा करतात. यालाच ‘घागर’ पुजणे असे म्हणतात. पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर पुरणाची पोळी व द्रोणात खीर, आंब्याचे पन्हे, चिंचोणी किंवा कटाची आमटी, पापड, कुरडय़ा इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातो. असे केल्याने पितरांच्या आत्माला शांती मिळते, असे मानले जाते. घरात वर्षभरात कुणी मृत झालेले असेल तर त्यांच्या नावाने ‘डेरगं’ भरले जाते. पुढे दरवर्षी त्यांच्या नावाने ‘घागर’ पुजली जाते.

या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय’(न संपणारे) असते, असा समज आहे. हिंदुस्थानात माती पुजली जाते. सदोदित कृपादृष्टी ठेवणाऱया मृत्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी व वैभवलक्ष्मी यांची प्राप्ती होते. अक्षय तृतीयेला कृतज्ञ भाव ठेवून मृत्तिकेची म्हणजेच मातीची व नवांकुराची पूजा केली जाते.

अक्षय तृतीयेला खान्देशात आखाजी म्हणतात. हा त्यांचा नववर्ष सण. या सणाला सासुरवाशीण मुली माहेरपणाला माहेरी येतात. झोक्यावर बसतात. झिम्मा-फुगडी खेळतात, गाणी गातात आणि पुन्हा सासरी निघून जातात. खान्देशातील आखाजीची आहिराणी गाणी जगप्रसिद्ध आहेत.

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात, अशी समजूत आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, अशी धारणा आहे.

अक्षय तृतीयेच्या दिवशी राजा किंवा प्रजेच्या पालनपोषणाची जबाबदारी असणारे सामूहिकरीत्या राजवाडय़ात किंवा सामूहिक पूजाविधीच्या ठिकाणी विष्णूसहित लक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तिभावाने पूजन करतात. यामुळे प्रजा सुखी व समृद्ध होते. नुसत्या लक्ष्मीदेवीची कृपा आपल्यावर होत नाही; कारण लक्ष्मीदेवी ही श्रीविष्णूची शक्ती आहे. जेथे विष्णूलाच बोलावणे नाही, तर त्याच्यासोबत किंवा त्याच्यात असणारी त्याची शक्ती कशी बरे पूजास्थळी येऊन कृपा करेल.

खान्देशात अक्षय तृतीयेलाच आखाजी म्हणतात. हा गौराई म्हणजे पार्वतीचा माहेरी येण्याचा सण म्हणून साजरा केला जातो. मराठमोळ्या स्त्र्ाया या दिवशी हळदीकुंकू करून सुवासिनींना पैरीची डाळ, पैरीचे पन्हे, नारळाची करंजी देतात. या दिवशी बत्तासे, मोगऱयाची फुले किंवा गजरे देतात. भिजवलेल्या हरबऱयांनी ओटी भरतात. अक्षय तृतीयेला गौरी उत्सवाची सांगता करण्यात येते.

पुराणांनुसार त्रेतायुगाचा प्रारंभदिन अक्षय तृतीया हा होता. या दिवशी एका युगाचा अंत होऊन दुसऱया युगाला सुरुवात झाली होती. या दिवसाने एका कलहकालाचा अंत व दुसऱया युगाच्या सत्ययुगाची सुरुवात, अशी संधी साधलेली असल्याने तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो, म्हणूनच अक्षय तृतीया या दिवसाला साडेतीन मुहूर्तांतील एक मुहूर्त मानले जाते.

अक्षय तृतीयेला स्वर्गलोकी गेलेले भूलोकातील अनेक जीव पृथ्वीच्या जवळ येतात. भूलोकातील बहुतांश जीव हे मानवाचे पूर्वज असतात. पूर्वज पृथ्वी जवळ आल्यामुळे व त्यांच्या काही इच्छा, आशा, अपेक्षा अपूर्ण राहिलेल्या असतील तर त्याचा मानवाला जास्त त्रास होण्याची शक्यता असते. मानवावर पूर्वजांचे ऋणही खूप असते. हे ऋण फेडण्यासाठी मानवाने प्रयत्न करणे ईश्वराला अपेक्षित आहे, यासाठी या दिवशी पूर्वजांना गती मिळविण्यासाठी तील तर्पण केले जाते. पूर्वजांना आवाहन करून तीळ अर्पण करतात. यालाच तिलांजली म्हणतात. पूर्वजांना गती देण्यासाठी विनंतीपूर्वक प्रार्थना करतात. तील तर्पणामुळे पूर्वजांच्या सूक्ष्म देहातील सात्त्विकता वाढून, त्यांना पुढच्या लोकात जाण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते. ते मुक्त होतात. मानवाला पूर्वजांपासून जो काही त्रास होत असेल तो कमी होतो, असे मानले जाते.

कोरोनाने समाजजीवन ढवळून निघाले आहे. कामधंदा बंद पडला आहे. बाहेर फिरण्यावर बंदी आहे. अनेकांना रोजच्या जेवणाची चिंता लागलेली आहे. घरातली प्रिय माणसे अनंताच्या प्रवासाला निघून गेली आहेत. गांवे ओस पडली आहेत. सर्वत्र दुःखाचे सावट आहे. अशा प्रसंगात आनंदी राहणे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. मात्र, लोक काय म्हणतील ही चिंता प्रत्येकाला सतावते. त्याला तोंड देण्यासाठी, संकटांवर मात करण्यासाठी, जगणे सुसह्य करण्यासाठी आणि जीवन पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी सण-उत्सवांची गरज आहे. ती सोय आपल्या पूर्वजांनी करून ठेवली आहे. ते शिकलेले नव्हते. मात्र त्यांचा मानवतेचा अभ्यास मोठा होता. तोच या परंपरेतून दिसून येतो. म्हणून आपण या परंपरा जपायला हव्यात. यातील विज्ञान, तत्त्वज्ञान, चिंतन, दर्शन शोधून काढायला हवे. ते नव्या पिढीला द्यायला हवे. असे म्हणतात जेव्हा विज्ञान हतबल होते तेव्हा पूर्वजांचे तत्त्वज्ञान बल देते. जगणे सुलभ करते. सर्वांना अक्षय तृतीयेच्या आभाळभर शुभेच्छा.

आपली प्रतिक्रिया द्या