
>> प्रशांत गौतम
या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रख्यात मल्याळम कवी अक्कितम अच्युतन नंबुद्री यांना नुकताच घोषित झाला. मल्याळम भाषेत ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे ते 5 वे साहित्यकार आहेत. अनेक लेखन प्रकार त्यांनी हाताळले असले, तरी त्यांचे पहिले प्रेम कवितेवरच राहिले. कसदार आणि दमदार कविता लेखन करून त्यांनी आपल्या साहित्याचा वेगळा वाचकवर्ग निर्माण केला व स्वातंत्र्य पाऊलवार निर्माण केली. 1926 साली जन्म झालेले अक्कितम आज 93 वर्षांचे आहेत. या प्रदीर्घ काळात त्यांनी जवळपास 55 पुस्तकांचे लेखन केले. अक्कितम यांना साहित्य, कला या विषयांची आवड लहानपणापासूनच निर्माण झाली, एवढेच नव्हे तर तत्कालीन व अलीकडच्या सामाजिक/राजकीय परिस्थितीचा प्रभाव त्यांच्या साहित्यनिर्मितीवर होत असे. ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ या उक्तीप्रमाणे त्यांच्या लेखननिर्मितीवर होणारे परिणाम काव्यातून अभिव्यक्त होत असत. ‘अक्कितम यांची कविता आत्ममग्न आहे, संकेतबद्ध आहे. त्यांच्या कवितेत सामाजिक आशय फार कमीच दिसतो’, अशी टीका त्यांच्यावर नेहमी होत असे. परंतु, त्याची त्यांना अजिबात पर्वा नसायची, कारण त्यांची निष्ठा, इमान हा साहित्याशी होता. जे टीकाकार या भीष्माचार्यावर टीका करायचे, त्यांनाच त्यांची कविता तत्त्वभान जपणारी आहे, असे वाटू लागले. आधुनिकतेचे दर्शन त्यांच्या काव्याने आजपर्यंत घडविले आहे. शिवाय या आधुनिकतेसोबतच हिंदुस्थानचे तत्त्वज्ञान आणि सामाजिक मूल्य यांची जोड त्यांच्या काव्यलेखनास होती. त्याचमुळे कवीच्या कवितेने मधला दुवा म्हणून भूमिका बजावली. कवितेव्यतिरिक्त त्यांनी नाटके आणि कादंबऱयांचेही लेखन केले आहे. अनुवादाच्या माध्यामातून त्यांच्या कवितेचा परिचय जगभरातल्या चाहत्यांना झालेलाच आहे. खंडकाव्य, कथाकाव्य, चरित्रकाव्य, गीतलेखन यासाठी प्रांतात अक्कितम यांनी केलेले लेखन गाजले आहे. वीर वाङ्मय, बालदर्शनम्, निमीषा श्रेत्रम्, अमृता खाटिका यांचा उल्लेख देता येईल. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक बुद्धिवादी लेखकांनी पत्रकबाजी केली. अक्कितम यांनी मात्र या पत्रकबाजीचा खरपूस समाचार घेतला. या देशात असहिष्णुता वाढत चालल्याचा आरोप जेव्हा होत होता, तेव्हा या कवीने कणखरपणाने हा आरोप मोडून काढला. कवी आणि कार्यकर्ता ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे लाभलेले अक्कितम हे ‘उन्नी नंबुद्री’ या मासिकाचे संस्थापक आहेत. शिवाय आकाशवाणीच्या माध्यमातून त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. वेद वाङ्मय अभ्यासाच्या नव्या दिशा शोधणे आणि त्याचवेळी सामाजिक सुधारणांसाठी प्रयत्न करणे, असे कार्य त्यांनी उत्तरेत केले आहे. एक प्रतिभावंत कवी सामाजिक प्रथा-कुप्रथा यांच्याविरोधात जेव्हा उभा राहतो, तेव्हा तो समाजाला आपला वाटत नाही. अक्कितम यांच्याबाबतीत तेच झाले. अस्पृश्यतेविरोधात त्यांनी कडक भूमिका घेतली. अक्कितम यांचे साहित्य लेखन आणि वास्तव, हे असे एकजीव झाल्याचे आपल्या लक्षात येते. मात्र, त्यांच्या अभिजात साहित्य लेखनाची अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी दखल घेतली. केरळ सरकार व केंद्र सरकारच्या साहित्य अकादमीचे पुरस्कार त्यांना अनुक्रमे 1972 व 1988 साली लाभले. 2017 साली पद्मश्री हा बहुमान आणि यंदा त्यांच्या मल्याळम साहित्यात भरीव योगदानासाठी ज्ञानपीठ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान झाला.





























































