‘अक्षर मानव’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  रचना बागवे

‘‘आम्ही प्रयत्न करतो आहोत, माणसाला माणूस जोडण्याचा. जाती, धर्म, देव, वर्ग, वर्ण, लिंग यांच्या पल्याड जाऊन माणसांना एकत्र आणण्याचा…’’ हे विचार आहेत ‘अक्षर मानव’ या संस्थेचे.

माणसाला माणसाशी जोडण्याचे काम ते करतात आणि त्यांच्या याच कार्यामुळे कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात या संघटनेने अनेक लोकांचे जीव वाचवले. असंख्य लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली.

साहित्यिक राजन खान यांनी या संघटनेची निर्मिती 1981 साली केली असून माणसाचं जगणं प्रत्येक अर्थाने समृद्ध करण्यासाठी ते कार्यरत आहेत. 50 ते 60 विभाग संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहेत. लॉक डाऊनच्या पहिल्या टप्प्यात जेव्हा लोकांची मानसिक स्थिती बिघडलेली तेव्हा त्यांनी मानसोपचार तज्ञ आणि डॉक्टरांची टीम बनवून लोकांना मार्गदर्शन केले. नकारात्मकता आणि नैराश्यामधून लोकांना बाहेर काढण्यास मदत केली. कोविड नियंत्रण कक्षाची स्थापना केली. सहा संघ बनवून लोकांसाठी मानवतेची साखळी निर्माण केली. दुसऱया लॉकडाऊनच्या वेळेस त्यांनी लोकांच्या गरजा ओळखल्या आणि प्लाझ्मा, रक्त, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, हॉस्पिटल्समध्ये बेडची उपलब्धता करून दिली. कठीण काळात पेशंट्सना घरपोच डबा पोहोचवला. ‘अक्षर मानव’ या संकेत स्थळावर त्यांनी स्वतंत्रपणे एक टॅब निर्माण केला. त्याचबरोबर डॅशबोर्डची निर्मिती केली जो कोरोनाच्या काळात लोकांसाठी वरदान बनला आहे. या संघटनेत सर्व लोक स्वेच्छेने काम करतात.

प्रदीप मांजरेकर, सेव्रेटरी जनरल, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट यांनी संघटनेच्या सदस्यांसाठी SCGT कोविड वॉरियर्सची स्थापना केली तेव्हा ‘अक्षर मानव’ या संघटनेने त्यांना पहिला मदतीचा हात आणि प्रतिसाद दिला.

मानव साखळीचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. या मानव साखळीने असंख्य घरांमध्ये एक सकारात्मकतेची ज्योत पेटवली आहे. ही ज्योत अशीच कायम पेटत राहो आणि लाखो लोकांना त्याचा फायदा होवो अशी ‘अक्षर मानव’ संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी इच्छा व्यक्त केली.