
>> दिलीप जोशी
‘विश्व’ हा शब्द बराच व्यापक आहे. गेल्या वेळच्या लेखात म्हटल्याप्रमाणे आपल्या आकाशगंगा दीर्घिकेतल्या सुमारे दीडशे-दोनशे अब्ज ताऱयांपैकीच काही हजार तारे, तारकासमूह वगैरे आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसतात. म्हणजे सहजतेने होणाऱया विश्वदर्शनाला बरीच मर्यादा असते. शिवाय आपल्या आकाशगंगेसारख्या अब्जावधी दीर्घिका विश्वात आहेत. त्यांच्यातले तारे, ग्रहमाला दिसणं तर दुरापास्तच. नाही म्हणायला आपल्या शेजारची, अगदी जवळची देवयानी किंवा ऍन्ड्रोमीडा गॅलेक्सी आकाश निरीक्षणाला सरावलेल्या नजरेला अस्पष्ट, धुकट अशी दिसते.
आता ही जवळची देवयानी दीर्घिका (ही नावे बाळशास्त्र्ााr जांभेकर यांनी दिली. त्यांनीच मराठीतले पहिले ‘दर्पण’ वृत्तपत्र सुरू केले) ‘जवळ’ म्हणजे किती, तर 22 लाख प्रकाशवर्षे दूर आहेत. अर्थातच प्रकाशाच्या वेगाने तिकडे निघाल्यास 22 लाख वर्षांनी ‘गंतव्यस्थानी’ पोहोचता येईल. हा प्रवास तर केवळ अशक्य. जेमतेम मंगळापर्यंत सदेह जाण्याच्या गोष्टी करताना आपली दमछाक होतेय. व्हॉएजरसारखी काही यानं सूर्यमालिकेपलीकडे (केसरबाई केरकर यांच्या ‘जात कहां हो’ या बंदिशीच्या स्वरांसह) गेली आहेत हे खरं, पण 1974 पासून त्यांचा प्रवास सुरू आहे. माणूस अंतराळात एवढय़ा दूर पाठवायचा तर यानात संसार थाटूनच त्याला निघावं लागेल. ते सध्या तरी अशक्य!
मात्र दुर्बिणीच्या सहाय्याने विश्वातील अनेक गोष्टी आपण नजरेच्या टप्प्यात आणल्या. आपल्याकडे पूर्वी द्विनेत्री किंवा बायनॉक्युलर्स म्हणजे ‘दुर्बिण’ असं समजलं जायचं. पर्यटनस्थळी जाताना अशा ‘दुर्बिणी’ घेऊन लोक निसर्गाचं ‘जवळून’ निरीक्षण करत आणि आजही करतात, परंतु ती खरं तर द्विनेत्री. ज्याला अवकाश दाखवणारी दुर्बीण म्हटलं जातं तो टेलिस्कोप. त्याचे प्रकार किती आणि कोणते अधिक चांगले ते पुढे एखाद्या लेखात जाणून घेऊ, परंतु 1609 मध्ये गॅलिलिओ गॅलिली यांनी अवकाशाकडे पहिली दुर्बीण रोखल्यापासून आकाश नजरेत साठवणाऱयांची संख्या सतत वाढत आहे. आमच्या खगोल मंडळातर्फे 1985 पासून हजारो लोकांना आम्ही आकाशातील ग्रह, तारे, दीर्घिका आणि दूरस्थ तारकागुच्छ वगैरेचं दर्शन घडवलं आहे. कारण या काळापासून दुर्बिणींचा वापर बऱयापैकी वाढला. 1986 मध्ये आलेल्या ‘हॅली’ धूमकेतूचं दर्शन फारसं समाधानकारक झालं नाही, पण त्यातून आकाशातील दौलत अनुभवण्याची सवय अनेकांना लागली. काहींनी तर खगोलशास्त्र्ाातच अत्युच्च शिक्षणही घेतलं. आता पाऊस संपताना (कोविडचे नियम पाळून) कशा प्रकारे आकाशदर्शन करता येईल याचा विचार करायला पाहिजे.
परंतु दुर्बीण नसतानाही लेझर टॉर्चच्या सहाय्याने एकेक तारकासमूह दाखवून केवळ डोळ्यांनी दिसणाऱया ‘विश्वा’ची ओळख करून घेता येते. एकदा हे ‘पॅटर्न’ किंवा तारकांपुजांचे आकार लक्षात राहिले की, त्यातील ठळक ताऱयांच्या संदर्भाने आसपास कोणते तारे दिसतात ते लगेच समजतं. हा सरावाचा भाग आहे. त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे दुर्बिणीतून अवकाश न्याहाळणं. त्यासाठी दुर्बीण ‘सेट’ करता येणे किंवा लक्ष्याच्या दिशेनेच रोखता येणे ही थोडी अभ्यासाची गोष्ट आहे. दुर्बीण हाती आली की, विश्वातील सर्व वस्तू ‘प्रचंड’ दिसतील ही कल्पना आधी दूर करायला हवी. त्या आकाराने फार मोठय़ा दिसत नाहीत, तर त्यांचे बारकावे स्पष्ट दिसतात. उदाहरणार्थ, चंद्र आपल्याला अगदी सहज दिसतो, पण छोटय़ा म्हणजे कमी व्यासाचा आरसा वा भिंग असलेल्या दुर्बिणीतूनही चंद्रावरची विवरं म्हणजे खड्डे स्पष्ट दिसतात. तीच गोष्ट गुरू ग्रहाचे चार ‘चंद्र’ आणि शनी ग्रहाच्या सुंदर कडय़ांची!
पृथ्वीवरून आपण दुर्बिणीद्वारे करणाऱया आकाशदर्शनालाही काही मर्यादा आहेत. आकाश अवेळी ढगाळलं तरी आपल्या कार्यक्रमाचा फज्जा उडू शकतो. यावर उपाय म्हणजे पृथ्वीच्या वातावरणापलीकडे अंतराळात जाऊनच विश्वरूप दर्शन घेणे. ते सर्वांनाच शक्य नाही. मात्र काही अवकाशस्थ दुर्बिणींनी घेतलेली दूरस्थ अवकाशवस्तूंची छायाचित्रं ‘नासा’सारखी संस्था प्रसिद्ध करते. त्यावरून विश्वाच्या विराटत्वाची कल्पना येते.
आपल्या आकाशगंगा दीर्घिकेला ‘लार्ज’ आणि ‘स्मॉल’ मॅजेलॅनिक क्लाऊड नावाच्या दोन उपदीर्घिकाही आहेत. कन्याकुमारीला गेलात तर दक्षिण आकाशात त्या सहजतेने दिसतात. इतकं करूनही एकूण विश्वापैकी आपल्या डोळ्यांनी आणि (प्रचंड अवकाश दुर्बिणींनीसुद्धा) दिसणारं विश्व हा एकूण विश्वाचा अवघा चार टक्के भागच असतं. उरलेल्याचा शोध सातत्याने सुरू आहे.


























































