लेख – अति कोपता कार्य जाते लयाला!

605

>> स्नेहा अजित चव्हाण

राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही. राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला. तारस्वरात वाद घालून संबंध बिघडवण्यापेक्षा शांत सुरात बोलून समोरच्याला जिंकणंच महत्त्वाचं असतं. शांतपणे बोलण्यातला सूर सांभाळणं ही एक वेगळीच साधना आणि कला आहे. रागाने बोलून संबंध तोडण्यापेक्षा चांगल्या शब्दांत आणि खालच्या सुरात आपलं म्हणणं मांडण्याचा हा प्रकार स्वार्थ म्हणून नव्हे, तर व्यक्तिमत्त्व विकासातला चतुरपणाचा मुद्दा म्हणूच अंगीकारायला हवा. कारण ‘अति कोपता कार्य जाते लयाला’ हे त्रिकाल सत्य आहे.

क्रोध, राग हा मनुष्याचा शत्रू आहे. क्रोध एकदा का डोक्यात     शिरला की, तो दिवाळं काढल्याशिवाय थांबत नाही. जिथे राग आहे, तिथे दिवाळी कशी असेल? दिवाळंच असेल. प्रत्येक रागीट व्यक्तीला रागामुळे नुकसान हे सोसावे लागते.

घटना क्र. 1: 30वर्षे वयाचा तानाजी एमबीएपर्यंत शिक्षण घेऊन एका नामांकित कारखान्यात उच्च पदावर काम करत होता.  पत्नी, आईवडील, दोन लहान मुले असा सुखाचा संसार चालत होता.  शेताच्या बांधावरून चुलत्याबरोबर झालेल्या भांडणात क्रोधाग्नी भडकल्यामुळे तानाजीचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्याने चुलत्याच्या डोक्यात फावडे मारल्यामुळे चुलता जागेवरच मृत्युमुखी पडला. तानाजी आज जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

घटना क्र. 2: एका वर्षी वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेत फ्रान्सचा खेळाडू झिदान याने इटली व फ्रान्स या दोन्ही देशांतील वर्ल्ड कप मॅच सुरू असताना आईवरून शिव्या दिल्यामुळे इटलीच्या खेळाडूच्या छातीत डोकं मारलं. त्याची शिक्षा म्हणून त्याला रेड कार्ड मिळालं. वस्तुतः झिदाननं केवळ पहिल्या सात मिनिटांत स्पर्धेचा मानकरी असल्याचं सिद्ध केलं होतं, पण त्या झिदानलाच शेवटच्या दहा मिनिटांत आणि त्याच्या आयुष्यातल्या शेवटच्या वर्ल्ड कपमधून त्याच्या आयुष्याचा बट्टय़ाबोळ करणारं रेड कार्ड माथी घेऊन बाद व्हावं लागलं. परिणामी झिदान ज्या देशातर्फे खेळत होता, त्या फ्रान्स देशाचीदेखील हार झाली. झिदानला मॅच सुरू असताना त्या दुसऱ्य़ा खेळाडूने शिवी दिली होती, त्यावर झिदान लगेच रिऍक्ट झाला.  त्याला जो कोणी वाईट बोलला होता, त्याची तक्रार तो नंतर रीतसर करू शकला असता, पण तो ज्या प्रकारे रिऍक्ट झाला त्याने त्याला रेड कार्ड मिळालं, त्याला बाद व्हावं लागलं आणि ती त्याच्या आयुष्यातली शेवटची मॅच होती. नुकसान कोणाचं झालं?

घटना क्र. 3. : जुहूला गेलेल्या एका कॉलेजच्या मुलाने त्याच्या मैत्रिणीच्या डोक्यात दगड मारला. त्यात ती मरण पावली. तिला ठार मारण्याचा त्याचा उद्देश नव्हता. झालं काहीतरी भांडण आणि एका बेसावध क्षणी फक्त राग दर्शविण्यासाठी हातात दगड घेतला आणि खुनाच्या आरोपात आज तो जेलमध्ये आहे.

वरील सर्व घटना वाचता लक्षात येते की क्रोध व्यक्त केल्यानंतर ज्या कारणांसाठी आपण रागावतो ते कारण किती क्षुल्लक होते. पण क्षणांचा क्रोध तुमचं जीवन उद्ध्वस्त करू शकतो.

गीतेत म्हटले आहे…

क्रोधात भवति संमोहः संमोहात स्मृतिविभ्रमः

स्मृति भ्रंशात बुध्दिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती

क्रोधामुळे व्यक्तीचा विवेक सुटतो. तो सुटल्यामुळे स्मृतिदोष जडतो. स्मृतिदोषामुळे बुद्धिनाश होतो व त्यामुळे व्यक्तीचा नाश होतो. क्रोधामुळे मनुष्य हिंसक बनतो. त्यामुळे त्याच्या हातून वाईट कृत्ये घडू शकतात. क्रोधाने नुकसान होते हे मात्र निश्चितच. हे नुकसान कधी शारीरिक कधी मानसिक, कधी आर्थिक तर कधी नातेसंबंधाचेदेखील होते.  ‘अति राग आणि भीक माग’ हे मात्र खरेच. आपल्या तडकाफडकी वागणुकीने झालेले नुकसान आयुष्यावर बरेच दूरगामी परिणाम करणारे ठरत असते. त्या नुकसानीची झळ बरीच वर्षे लागून ती माणसं मानसिक तणावातूनदेखील गेलेली असतात, पण आपलं मन नुकसान किती झालंय ते कबूल करण्याच्या तयारीत नसतं, पण नुकसान तर झालेलं असतं. मग यावर उपाय काय? हे सर्व टाळण्याचा उत्तम उपाय म्हणजे पॉझ.

जसं एखादं गाणं चालू असताना आपण पॉझचं बटन दाबतो. बटन दाबल्यावर ताबडतोब गाणं आहे तिथेच थांबतं. ते पुढे किंवा मागे जात नाही,  पण ते गाणं ऐकायला येत नाही. त्या गाण्याशी असलेला संबंध तुटलेला असतो. त्या वाजत असलेल्या गाण्याबाबतचे विचार त्यावेळी थांबलेले असतात. ते पॉझचं बटन दाबल्यानंतर आपण मधल्या वेळेत दुसरं काहीतरी आपलं छोटंसं काम आवरून होतं. पॉझचं बटन पुन्हा दाबल्याबरोबर गाणं जिथे थांबलं होतं तिथपासून पुन्हा त्या गाण्यात आपण गुंतून जातो.  आपण रागात एखादी गोष्ट बोलण्याच्या वेळी ‘मनाचं पॉझचं’ बटन दाबायचं आणि सर्व विचार आहेत ते तिथेच थांबवायचे. ते विचार पुढे किंवा मागेदेखील जाऊ द्यायचे नाही. ते विचार सोडून द्यायचे. फक्त हाच विचार करायचा की, मला आता जे काही सांगायचे आहे ते मी आताच न सांगता उद्या सांगेन. याक्षणी मी याबाबत कुठलाही विचार करणार नाही.

त्या घटनेवरील वैचारिक प्रतिक्रियाच सोडून द्यायची. त्या विचारांशी संबंधच तोडून टाकायचा. आपल्याला एक किंवा दोन दिवसांनी यावर निर्णय घ्यायचा आहे हे ठरवून टाकायचं. एखादा वादविवादाचा विषय असेल, एखाद्या वादग्रस्त गोष्टीचा खुलासा कोणाला करायचा असेल आणि आपण ते सांगण्यासाठी चिडून उत्तेजित झालेलो असू, एक्साईट झालेलो असू, त्यावेळी हे मनाचं पॉझचं बटन दाबायचं. पहा, किती फरक पडतो ते! जी गोष्ट तुम्हाला ताबडतोब सांगायची होती तीच गोष्ट दुसऱ्य़ा दिवशी तुम्ही जास्त उत्तम प्रकारे आणि शांतपणे पटवून देऊ शकता. प्रयोग केल्यावर तुम्हाला कळू शकते. या पॉझनंतर झालेल्या जादूमध्ये एक प्रकारची जबरदस्त ताकद आलेली असते, ती तुम्ही अनुभवून पहाच.

मधल्या काळात आपली त्यावरील वैचारिक प्रतिक्रिया पूर्णतः झालेली असते.  त्यावेळी आपला विचार मांडताना आपले उसळून आलेले विचार आता नियंत्रित झालेले असतात. आपली सारासार विवेकबुद्धी मधला वेळ मिळाल्याने स्वतःच त्यावर उत्तम मार्ग निवडते. त्यामुळे पायरीपायरीने ते विचार मांडण्याची आपली मनातली प्रक्रिया पूर्ण झालेली असते. त्यातील आततायीपणा गेलेला असतो. बालिशपणा नष्ट झालेला असतो. शांतपणे एखादी गोष्ट पटवून देताना त्यात एक प्रकारचा ठामपणा येतो. परिणामी होणारे नुकसान, आपलीच अब्रू जाणं हे प्रकार टाळले जातात. समाजात असलेल्या आपल्या व्यक्तिमत्त्वावर येणारा ओरखडा टाळता येतो.

आपल्या रोजच्या जीवनातदेखील बऱ्य़ाचदा आपल्याला अपरिहार्य वाटणाऱ्य़ा घटना घडत असतात किंवा अप्रिय निर्णय घेण्याची वेळ येत असते. काही वेळेस कठोर बोलण्याचीदेखील वेळ येते. अशा वेळी फक्त मनाचं पॉझ बटन दाबायचा प्रयोग करायचा. संपूर्ण विचार तेथेच थांबवायचे आणि या क्षणाला मी काही बोलणार नाही असं ठरवायचं. आयुष्य जगणं हीच सर्वात मोठी कला असते. यात काही वेळेस आपण तानाजी असतो, काही वेळेस अजय असतो, तर काही वेळेस झिदान असतो. आपण संतापाने एखाद्या गोष्टीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करतो. आपल्याला जी गोष्ट समोरच्याच्या कानावर घालायची असते, ती कधी संतापामुळे पोहोचतच नाही, पण मनाचं पॉझ बटन दाबून त्यानंतरच्या काळात तोच विचार जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीच्या कानावर घालतो तेव्हा तो फारच परिणामकारक, व्यवस्थितपणे पटवून देऊ शकतो. या पॉझनंतर झालेल्या जादूमध्ये एक प्रकारची जबरदस्त ताकद आलेली असते. ती तुम्ही अनुभवून पाहाच. राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही. राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला. तारस्वरात वाद घालून संबंध बिघडवण्यापेक्षा शांत सुरात बोलून समोरच्याला जिंकणंच महत्त्वाचं असतं. शांतपणे बोलण्यातला सूर सांभाळणं ही एक वेगळीच साधना आणि कला आहे. रागाने बोलून संबंध तोडण्यापेक्षा चांगल्या शब्दांत आणि खालच्या सुरात आपलं म्हणणं मांडण्याचा हा प्रकार स्वार्थ म्हणून नव्हे, तर व्यक्तिमत्त्व विकासातला चतुरपणाचा मुद्दा म्हणूच अंगीकारायला हवा.

कारण…

‘अति कोपता कार्य जाते लयाला’ हे त्रिकाल सत्य आहे.

(लेखिका महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त शिक्षिका आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या