ठसा – अनिल कालेलकर

>> अनिल कालेलकर

वडिलोपार्जित कला आपण पुढे नेणे हे जेवढं आनंददायक, तेवढेच आव्हानात्मक. पटकथा, संवाद लेखक अनिल कालेलकर यांच्याबद्दल अगदी हेच झाले. साठ आणि सत्तरच्या दशकांतील यशस्वी लोकप्रिय नाटककार, मराठी व हिंदी चित्रपट लेखक, गीत लेखक, चित्रपट व नाटय़ निर्माते मधुसूदन कालेलकर यांचा पुत्र ही पार्श्वभूमी असलेल्या अनिल कालेलकर यांनी आपल्या पित्याचा वारसा पुढे कायम ठेवला, पण मधुसूदन यांनी भरपूर काम करूनही त्यांचे म्हणावे तसे त्या काळात कौतुक झाले नाही. तोच वा तसाच काहीसा प्रकार अनिल कालेलकरांबद्दलही झाला. लेखक म्हणून काम खूप केले. त्या कामाचे अधिक कौतुक अपेक्षित होते, पण अनिल कालेलकरांनी आपल्या कामावरचे लक्ष अथवा फोकस कायम ठेवला आणि सतत नवीन संधी मिळावी यासाठी सकारात्मक प्रयत्न केले. बदलत्या काळासोबत बदलही स्वीकारले.

अनिल कालेलकर यांना अभ्यासापेक्षा लेखन आणि दिग्दर्शनात विशेष रस. त्यांची ती आवड लक्षात घेऊन मधुसूदन कालेलकर यांनी दिग्दर्शक शंकर मुखर्जी यांना फोन करून अनिल कालेलकर यांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून संधी देण्याची विनंती केली. तेव्हा शंकर मुखर्जी देव आनंद व आशा पारेख यांना घेऊन ‘महल’ हा चित्रपट दिग्दर्शित करत होते. अनिल कालेलकर यांना सहाव्या क्रमांकाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून संधी मिळाली आणि अनिल कालेलकर यांनी चित्रपट माध्यमाची ओळख करून घेण्याला प्राधान्य दिले. शंकर मुखर्जी आणि अन्य काही दिग्दर्शकांकडे सात-आठ चित्रपट ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्यरत होते. त्यात ते एकेक पायरी चढत राहिले आणि मग ते स्वतंत्रपणे चित्रपट कथा, पटकथा लेखक झाले. त्यांचा तेव्हाचा बहुचर्चित चित्रपट होता देवदत्त दिग्दर्शित ‘शांतता खून झाला आहे’ हा रहस्यरंजक चित्रपट. 1975 सालची ही गोष्ट. मराठीत  तेव्हा सामाजिक व विनोदी चित्रपटांची चलती होती आणि त्यात मारधाड चित्रपटाचे लेखन करणे हे आव्हानात्मक होते. चित्रपट माध्यम आणि व्यवसायात पटकथाकार म्हणून वाटचाल करीत असलेल्या अनिल कालेलकर यांना नव्वदच्या दशकातील मनोरंजन उपग्रह वाहिनीच्या काळात भरपूर संधी मिळाली. विशेषतः दैनंदिन मालिकांचे लेखन हे त्यांचे वैशिष्टय़ ठरले. ‘बंदिनी’, ‘कमांडर’, ‘परमवीरचक्र’, ‘हॅलो इन्स्पेक्टर’ अशा त्यानी लिहिलेल्या एकामागोमाग एक दैनंदिन मालिका लोकप्रिय झाल्या. रहस्यमय गुन्हेगारी मालिका, भयकथा हे त्यांचे वेगळेपण ठरले. अशा एकूण बारा रहस्यमय गुन्हेगारी मालिका त्यांनी लिहिल्या. ‘हॅलो इन्स्पेक्टर’ ही मालिका सत्य घटनेवर आधारित असल्याने ते अनेक पोलीस स्टेशनमध्ये जात आणि तशी प्रकरणे जाणून घेत. हे अतिशय मेहनतीचे काम होते,  पण मालिका रंगतदार होण्यासाठी हे आवश्यक आहे असे ते मानत. भयकथा आवडीचे श्रेय ते बाबुराव अर्नाळकर यांना देत. त्यांच्या भयकथा मोठय़ा प्रमाणावर वाचल्याचा आपल्यावर प्रभाव पडल्याचे अनिल कालेलकर यांचे म्हणणे होते.

अनिल कालेलकर यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1947 रोजी झाला. प्राथमिक शिक्षण दादरमधील छबीलदास हायस्कूलमध्ये, तर पुढील शिक्षण नॅशनल कॉलेज, वांद्रे येथे झाले. ते अविवाहित होते. त्यांचे घर अनेक प्रकारच्या पुस्तकांमुळे लक्षवेधक ठरत असे. अगदी गप्पिष्ट असे व्यक्तिमत्त्व हे विशेष. अलीकडेच त्यांनी आपली भाची गौरी कालेलकर चौधरी यांच्या सोबत मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शनची स्थापना केली आणि वडिलांची स्मृती जपली, तर पंचवीसहून अधिक हिंदी, मराठी आणि गुजराती चित्रपटांचे लेखन त्यांनी केले. त्यात ‘आहुती’, ‘शुभमंगल सावधान’, ‘रणांगण’, ‘करार प्रेमाचा’ इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे.अनिल कालेलकर यांनी केलेले 17 मालिकांचे सलग लेखन हा दूरदर्शन क्षेत्रातील एक दुर्लभ आणि अभूतपूर्व विक्रम आहे.

आपल्या कारकीर्दीत तीनशेहून अधिक विविध विषयांवर लेखन आणि प्रत्येक विषयावर तेवढीच प्रभावी मांडणी हे त्यांचे वैशिष्टय़ आणि वेगळेपण. ‘बंदिनी’, ‘परमवीर’, ‘हॅलो इन्स्पेक्टर’  या तीनही मालिकांना लागोपाठ तीन वर्षे सर्वोत्कृष्ट मालिकेचे पारितोषिक ही एक विलक्षण हॅटट्रिक. विशेष उल्लेखनीय गोष्ट, मधुसूदन कालेलकर यांना ग. दि. माडगूळकर पुरस्कार प्राप्त झाला तेव्हा ते त्या पुरस्काराचे पहिलेच वर्ष होते आणि चौदा वर्षांनंतर अनिल कालेलकर यांनाही हा पुरस्कार देण्यात येऊन सन्मानित करण्यात आले.

आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला लेखनासाठी भरपूर संधी मिळाली आहे. चित्रपट, नाटक, मालिका आणि वेब सीरिज असे बरेच काही लिहायला आहे, पण नवीन पिढीतील लेखकांनी मोठ्या प्रमाणावर वाचन करायला हवं आणि जगभरातील अनेक भाषांतील चित्रपट पाहायला हवेत आणि त्यातील गोष्टी आपल्या मराठीत कशा पद्धतीने स्वतंत्रपणे मांडता येतील यावर विचार करायला हवा असे अनिल कालेलकर म्हणत.