ठसा – अपर्णा रामतीर्थकर

1537

>> भगवान परळीकर

‘लव जिहाद’सारख्या विषयावर परखडपणे विचार मांडून सामाजिक बांधिलकी जपणाऱया ऍड. अपर्णाताई रामतीर्थकर नावाच्या वादळाचा प्रवास कायमचा थांबला. अपर्णाताई यांचे सोलापूर येथे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. हिंदुत्वनिष्ठ व्याख्यात्या, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख होती. अर्थात, त्यांचा खरा परिचय हा आपल्या देशातील कौटुंबिक व्यवस्था पुन्हा बळकट करण्यासाठी तसेच त्याबाबत सामान्य लोकांमध्ये सकारात्मक मानसिक बदल घडवून आणण्यासाठी झटणारे समर्पित व्यक्तिमत्व असा परिचय होता. विशेषत: लव जिहादमुळे महिलांवर होणाऱया अन्यायाच्या विरोधात अपर्णाताईंनी सातत्याने एका रणरागिणीच्या जोशात आवाज उठविला. सर्वदूर व्याख्यानांच्या माध्यमातून राष्ट्रनिष्ठ आणि धर्मनिष्ठ विचारांचे बीजारोपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात केले. अपर्णाताई यांचे हे कार्य राष्ट्रप्रेमी समाज कधीही विसरणार नाही. हिंदुत्व विचारसरणीचा पगडा असलेल्या अपर्णाताईंनी सामाजिक व कौटुंबिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. जनसेवा हीच ईश सेवा हे ब्रीदवाक्य त्यांनी खऱया अर्थाने सार्थ केले. ऍड. अपर्णाताई मुळच्या सातारा येथील पूर्वाश्रमीच्या सुनीता यशवंत कुलकर्णी. त्यांची आजी हाच त्यांचा आदर्श होता. गोपाळ पेठेतील त्यांचे घर म्हणजे कार्यकर्त्यांचा आधार. अगदी आणीबाणीतही भूमिगत असलेला कार्यकर्ता रात्री-अपरात्री आला तरी त्याला पिठलं-भाकरी करून त्यांच्या आजी आश्रय देत. आणीबाणीच्या विरोधात सत्याठाह करणाऱया आपल्या आजींचा वारसा अपर्णाताईनी पुढे चालू ठेवला. पुढे ज्येष्ठ पत्रकार आणि समीक्षक अरुण रामतीर्थकर यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. अरुण यांची नोकरी बदलल्याने पुण्याहून त्यांनी सोलापूरला स्थलातंर केले. मुलगा इंजिनीअर होईपर्यंत त्या गृहिणी म्हणून काम करीत होत्या. मात्र मुलगा स्वावलंबी झाल्यावर 1996 मध्ये त्यांनी आपले अपूर्ण शिक्षण पूर्ण करीत बी.ए.ची पदवी मिळवली. त्यानंतर लगेच कायद्याचे शिक्षण घेऊन एल.एल.बी. पदवी प्राप्त केली. मात्र न्यायालयात वकिली करताना पीडित महिलांचा त्रास आणि वकिलांचे वर्तन पाहून त्या उद्विग्न होत असत. त्यामुळे वकिली करायची नाही असे त्यांनी ठरवून टाकले. अशील आणि प्रतिवादी यांच्यात त्या समेट घडवून आणू लागल्या. अनेक केसेसमध्ये आर्थिक परिस्थिती हे भांडणाचे कारण दिसून आल्यामुळे पीडित महिलांच्या आर्थिक विकासासाठी त्यांनी शुभांगी बुवा, चंद्रिका चौहान या मैत्रिणींच्या मदतीने उद्योग वर्धिनी संस्थेची उभारणी केली. त्या माध्यमातून गरजू महिलांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला, अनेक महिलांचे संसार सावरले. आज उद्योग वर्धिनीचे नाव दिवाळी फराळाच्या माध्यमातून सातासमुद्रापलीकडे पोहोचले आहे. अपर्णाताईंनी व्याख्यानांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा वसा शेवापर्यंत जपला. विशेषत: कौटुंबिक एकतेसाठी त्यांची कायम धडपड राहिली. चला नाते जपू या, आईच्या जबाबदाऱया या विषयावर त्यांनी तीन हजारांहून अधिक व्याख्याने दिली. ‘सामना’सह अनेक वर्तमानपत्रांत स्तंभ लेखन केले. तुटणारी घरे वाचली पाहिजेत आणि लव जिहादसारख्या छुप्या आक्रमणांपासून आपल्या मुली आणि स्त्रियांना वाचवले पाहिजे या भावनेने त्या काम करत होत्या. महाराष्ट्रातील अनेक संघटना आणि सांस्कृतिक मंडळे यांना त्यांनी राष्ट्रनिष्ठेच्या धाग्यात गुंफले. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सनातन संस्था, हिंदू जनजागरण समिती, शिवसेना आदी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना त्या सातत्याने मार्गदर्शन करीत. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी मातृवत् प्रेम दिले. केवळ महिलाच नव्हे तर दुर्बल घटकातील लहान मुलांचे संगोपन आणि शिक्षण यासाठीही त्यांनी विशेष कार्य केले. शतकानुशतके रानावनात भटकणाऱया पारधी समाजाच्या उत्फानासाठीही आयुष्य वेचले. पारधी समाजातील एक सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भोसले अपर्णाताईंच्या संपर्कात आले. त्यांच्यावर दुहेरी खुनाचा खटला होता. या खटल्यातून अपर्णाताई यांनी ज्ञानेश्वर यांची निर्दोष मुक्तता केली. पुढे ज्ञानेश्वर यांच्याच मदतीने पारधी समाजातील 60 मुले एकत्रित करून सोलापूर-पुणे महामार्गावरील मोहोळ येथे विद्यालय सुरू केले. तत्कालिन जिल्हाधिकारी जगदीश पाटील यांनी सामाजिक जाणिवेतून अपर्णाताई यांच्या कामाची दखल घेवून त्यांना जमीन उपलब्ध करून दिली. महाराष्ट्रभर केलेल्या व्याख्यानातून मिळालेले मानधन आणि मिळालेल्या देणग्या अपर्णाताई या शाळेतील भटक्या मुलांसाठी खर्च करीत. पायाला भिंगरी लावून महिन्यातून सलग 27-28 दिवस अपर्णाताई या संपूर्ण महाराष्ट्रात व्याख्याने देत असत. प्रसंगी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करीत त्यांनी त्यांचे समाजकार्य अविरत सुरू होते. संपूर्ण महाराष्ट्रात व्याख्यानांच्या माध्यमातून समाजकार्याचा आणि धर्मकार्याचा यज्ञ त्यांनी तेवत ठेवला होता. काही वर्षापूर्वी त्यांचे पती पत्रकार अरुण रामतीर्थकर यांचे निधन झाले. मात्र त्यातूनही स्वत:ला सावरत अपर्णाताईंनी समाज प्रबोधनाचे काम सुरूच ठेवले होते. ते शेवटच्या श्वासापर्यंत चालू होते. एखाद्या शिलेदारापर्यंत अपर्णाताईंनी धारदार हिंदुत्ववाद जपला. त्याचवेळी कौटुंबिक व्यवस्था कशी टिकून राहील यासाठीही धडपड केली. अपर्णाताईंच्या निधनाने व्याख्यानांच्या माध्यमांतून समाजातील स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवणारे एक वादळ कायमचे शांत झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या