ठसा – अर्जुन अणावकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्वप्नील साळसकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील अणाव गावचे ‘मिलेक्ट्रीवाले काका’ म्हणजेच अर्जुन अणावकर यांनी 1971 सालच्या हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धातील आठवणींना उजाळा दिला. 1962 साली मुंबईतून नायगाव येथील बॅचमधून भरती झालेले अणावकर हे एकमेव महाराष्ट्रीयन होते. मोटर मेकॅनिकची जबाबदारी सांभाळताना रशियन रणगाडे, युनिटच्या ताफ्यात असणाऱया इतर वाहनांच्या दुरुस्तीबरोबर प्रत्यक्ष युद्ध सुरू असताना केल्या जाणाऱया कारवाया आणि प्रसंग त्यांनी जवळून अनुभवले. 1986 मध्ये निवृत्त झाल्यानंतर ते आपल्या गावी किराणा दुकान सुरू करून चरितार्थ चालवत आहेत. अणाव गावात ‘मिलेक्ट्रीवाले काका’ अशीच ओळख अणावकर यांची आहे. वयोमानानुसार थकले असले तरी त्यांचा सकाळी लवकर उठणे, व्यायाम हा दिनक्रम ते सांभाळत आहेत. अलीकडे त्यांनी देशसेवेतील आठवणी जागवल्या. 1962 साली मुंबईतील नायगाव येथून एका युनिटमधून त्यांची भरती झाली. लष्करात मोटर मेकॅनिक म्हणून काम करताना तीन टनांचे रशियन रणगाडे, इतर वाहनांच्या दुरुस्तीची कामे केली. युनिटला साहित्य पोहोचविण्याचा प्रवास जवळपास 100 ते 150 कि.मी. असे. आसामच्या छमजोडियापासून हासीमार आणि कश्मीरच्या झुळूक बॉर्डरपर्यंत हिंदुस्थानी जवानांबरोबर असणाऱया वाहनांची देखभाल, दुरुस्ती त्यांच्या युनिटकडून केली जात असे. एकदा युद्ध सुरू झाले की, सहा दिवसांपर्यंत सुरूच असायचे. त्यादरम्यान बॉर्डरवर असणाऱया विहिरीतील पाणी पिणेही धोक्याचे होते. त्यामुळे रात्री येणाऱया दूध, पाणी आणि जेवणाच्या गाडीची वाट पाहावी लागे. दिवसभर काहीतरी खाऊन दिवस ढकलावा लागत असे. रस्त्यात एखाद्या वेळेस गाडी बंद पडली आणि तिला दुरुस्त करण्यास विलंब लागणार असेल तर दरीत ढकलून द्यायचे. त्या वाहनाचे टायर काढून ठेवले जात असत. त्याचा इतर कोणालाही फायदा होणार नाही याची काळजी घ्यावी लागत होती. 1971 साली छमजोडिया बॉर्डरवर असताना 14 रणगाडय़ांचा ताफा निघाला होता. त्यादरम्यान युद्धाला सुरुवात झाली. आम्हीही एका गाडीतून मागोमाग होतो. मात्र घनघोर युद्धाला सुरुवात झाली. त्यात गाडीच बंद पडली आणि आमच्या युनिटमधील पाच जण पळत सुटलो. जवळपास 12 किमीचे अंतर पारही केले. पळताना काही ठिकाणी खड्डावजा बंकरमध्ये थांबायचे आणि पुन्हा पळायचे. मात्र त्यादरम्यान पाकडय़ांच्या गोळीबारात युनिटमधील दोघांचा मृत्यू झाला त्यात एकजण नदी पार करताना पाण्यात बुडाला त्यात त्याचा मृत्यू झाला आणि आम्ही दोघे युनिटपर्यंत सुखरूप पोहोचलो असा धक्कादायक प्रसंगही अणावकर काकांनी सांगितला. 24 वर्षांच्या सेवेत वर्षातून एकदा कुटुंबाला भेटण्याची संधी मिळत असे, असेही अणावकर काका सांगतात.