वेब न्यूज : प्रयोगशाळेत बनवला कृत्रिम सूर्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विन्कॉसिन्सच्या शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत एक सूक्ष्म रूपातील सूर्य बनवण्यात यश मिळवले आहे. अर्थात त्यांचा हा दावा जगातला काही पहिला दावा नाही. कारण याआधी जर्मनी आणि चीनच्या शास्त्रज्ञांनीदेखील प्रयोगशाळेत सूक्ष्म आकाराचा सूर्य बनवल्याचा दावा केलेला आहे. मात्र या तीनही टीमने वेगवेगळ्या प्रयोगांसाठी अशा प्रकाराचा सूर्य तयार केलेला आहे. विन्कॉसिन्सच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेला सूक्ष्म सूर्य हा सोलर विंड अर्थात सोलर वाऱयांचा अभ्यास करण्यासाठी बनवला आहे. हे सोलर विंड विशेषतः उपग्रहांसाठी अत्यंत हानीकारक असतात. अब्जावधी रुपये खर्च करून आणि अनेक वर्षांची मेहनत घेऊन सोडण्यात आलेले हे उपग्रह सोलर विंडच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी, प्रत्यक्ष सूर्याजवळ न जाता सूर्याचा आणि या वाऱयांचा अभ्यास करण्यासाठी हा सूक्ष्म सूर्य बनवण्यात आलेला आहे. या प्रयोगाला ‘The Big Red Ball experiment’ असे नाव देण्यात आले आहे. जेव्हा सूर्याच्या एका क्षेत्रातील चुंबकीय बल कमी होते, तेव्हा त्याच्यापासून प्लाझ्माचा एक मोठा गरम गोळा विभक्त होतो. जेव्हा असा प्लाझ्माचा गोळा विभक्त होतो, तेव्हा तो सोलर विंडस्ची उत्पत्ती करतो. हे सोलर विंडस् ‘विनाशकारी’ या प्रकारातच मोडले जातात. त्यांना सध्या तरी ‘वेगवान वारे’ आणि ‘हळुवार वारे’ अशा दोन सदरात मापले जाते. आजवर सोडलेल्या काही उपग्रहांनी हे वेगवान सोलर विंड कुठल्या भागात आणि कसे तयार होतात आणि ते कसे कार्य करतात याचा बराचसा अभ्यास करून त्याचा डाटा शास्त्रज्ञांना पाठवलेला आहे. मात्र जे हळुवार सोलर विंड तयार होतात, त्यांचा विशेष अभ्यास करून ते पृथ्वीकडे कसा प्रवास करतात आणि काय परिणाम करतात याचा प्रामुख्याने अभ्यास या प्रयोगात केला जाणार आहे. या सूक्ष्म सूर्याच्या निर्मितीमुळे आता शास्त्रज्ञांना सूर्याचा आणि त्याच्या चुंबकीय क्षेत्राचा त्रिमितीय अभ्यास करणे सहजशक्य होणार आहे.