आभाळमाया – लघुग्रहांची गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक

आपल्या सूर्यमालेतील ग्रहांची अंतरं सूर्यापासून कोटी ते अब्जावधी किलोमीटर आहेत. पृथ्वी ते सूर्य हे अंतर सुमारे 15 कोटी तर मंगळाचं अंतर 22 कोटी किलोमीटर आहे, त्यापलीकडचा गुरू पहिल्या चार, बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ या ग्रहांच्या तुलनेत जरा जास्तच दूर असल्याचं आधुनिक खगोल अभ्यासाच्या सुरुवातीच्या काळातच लक्षात आलं. टायटीअस बोड यांच्या ग्रहांच्या अंतरांच्या मांडणीत एक गणितीक्रम होता. त्यानुसार हे अंतर असल्याचं सिद्ध झालं.

हा क्रम मंगळ आणि गुरू यांच्यातील अंतराबाबत चुकत असल्याने त्यांच्यामध्ये ‘काही तरी असलं पाहिजे असा कयास व त्यावर अभ्यास सुरू झाला. मधला एखादा ग्रह ‘गायब’ झाला असेल तर त्याजागी काय असावं याचा विचारही सुरू झाला. कालांतराने त्या जागाही लक्षावधी लघुग्रहांचा पट्टा असल्याचं सिद्ध झालं आणि नंतर त्याचं मोजमाप होऊन फोटोसुद्धा घेतले गेले.

महापाषाण ऊर्फ अशनी यांनाही लघुग्रह म्हणतात. त्याचप्रमाणे अनेक ग्रहांच्या विशेषतः गुरू ग्रहाच्या स्थिर लॅग्रॅन्ज बिंदूंवर ‘पकडल्या’ गेलेल्या (टॅप झालेल्या) महापाषाणांचा उल्लेखही लघुग्रह असा होतो. असे लघुग्रह पृथ्वीपासून काही अंतरावरही भटकत असतात. ‘निऊर अर्थ’ किंवा पृथ्वीजवळच्या कक्षांमध्ये भटकणाऱया लघुग्रहांचा धोकाही पृथ्वीला संभवतो. अशा धडकी भरवणाऱया बातम्या अधूनमधून येत असतात. मला 1968 पासूनच्या अशा धास्तावणाऱया, पण पुढे फोल ठरलेल्या अनेक घटनांचं स्मरण होतं.

…तर मुद्दा लघुग्रहांचा, म्हणजे मंगळ आणि गुरू यांच्यामधल्या जागेत जिथे एखादा पूर्णाकृती ग्रह असू शकण्याच्या जागी पसरलेल्या असंख्य लघुग्रहत्वात लघुग्रहांची गर्दी गोलाकार पसरलेली दिसते. मात्र त्यातील बहुतेक दगडधोंडे आणि धुळीकण इतके छोटे वा सूक्ष्म आहेत की आपल्या ग्रहमालेची विजय यात्रा करणाऱया कृत्रिम अंतराळयानांना आजपर्यंत त्यांचा त्रास (म्हणजे आदळआपट) झालेला नाही.

मंगळ-गुरूच्या मध्यभागी असलेल्या लघुग्रहांच्या पट्टय़ाचं वेगळेपण दाखवण्यासाठी त्याला लघुग्रहांचा प्रमुख पट्टा (मेन बेल्ट) म्हटलं जातं. त्याची निर्मिती झाली सोलार लेब्युला किंवा सौर मेघ तयार होत असतानाच झाली. याचवेळी सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या निर्मितीचा आरंभ खगोलीय दृष्टीने थोडय़ाफार फरकाने सुरू झाला होता. याच काळात हा लघुग्रहाचा पट्टा निर्माण झाला.

मंगळ आणि गुरू यांच्यामधील ‘ग्रह’ निर्माण होण्यापूर्वीच त्यातील द्रव्य का विखुरले गेले याविषयी बरीच चर्चा झाली. एका मतानुसार गुरू या सौरमालेतील खरोखरच ‘गुरू’ म्हणजे सर्वात मोठय़ा ग्रहाच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे हा विशिष्ट ग्रह तयार होत असतानाच त्यातील बरेच द्रव्य गुरूच्या गुरुत्वाकर्षणाने विस्कळीत स्वरूपातच ठेवले ते एकत्र येऊन घट्ट होऊन त्याला पूर्ण ग्रहाचे स्वरूप येण्यात कायमचा अडथळा आला. परिणामी हे द्रव्य त्या ‘संभाव्य’ पण न घडलेल्या ग्रहाच्या कक्षेत पसरत राहिले. तोच हा लघुग्रहांचा पट्टा.

या लघुग्रहांच्या पट्टय़ाचा अभ्यास आता आपणाला उपलब्ध आहे. लघुग्रहांच्या या गर्दीतील चारच लघुग्रहांचा उल्लेख करण्याएवढं त्यांना महत्त्व आहे. बाकीचे तसे नगण्यच. सेरेस, व्हेस्टा, पेलास आणि हायजिया या चार लघुग्रहाचं अस्तित्व ठळकपणे जाणवतं. या लघुग्रह पट्टय़ातील द्रव्याच्या एकूण वस्तुमानापैकी निम्म वस्तुमान आपल्या चंद्राच्या तीन टक्के असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे ते सगळं एकत्रित केलं तरी मोठा ग्रह होणार नाही.

‘सेरेस’ला खुजा ग्रहसुद्धा म्हटलं जातं. त्याचा व्यास 950 किलोमीटर आहे. इतर तीन लघुग्रहांचा 600 किलोमीटरपेक्षा कमी आणि बाकी छोटय़ा दगड-धोंडय़ांची काय ‘गणती’ करणार, त्यातील काही अधूनमधून परस्परांत ‘सामील’ होतात. चार मोठे लघुग्रह मात्र कर्ब, सिलिका आणि धातुयुक्त आहेत. गुरूच्या गुरुत्वाकर्षणाने या पट्टय़ातील बरंच म्हणजे जवळजवळ 99 टक्के द्रव्य सुमारे कोटय़वधी वर्षांपूर्वीच नष्ट (गिळंकृत?) केलं आहे. असाच एक लघुग्रहांचा पट्टा ‘किपर बेल्ट’ नावाने नेपच्युनपलीकडेही सापडला आहे. त्याविषयी पुन्हा केव्हातरी मंगळ-गुरूमधल्या ‘सेरेस’ वरील पाण्याची वाफ इफ्रारेड संशोधनात सापडल्याचं म्हटलं जातं. वास्तविक असं निरीक्षण धूमकेतूच्या बाबतीत घडतं. या पट्टय़ाचं भाकित केपलर यानी 1596 मध्ये केलं होतं. तर त्यातील ‘सेरेस’चा शोध ब्युसेमी प्लंझो यानी 1809 मध्ये लावला.

(हा लेख लिहीत असतानाच मुंबईच्या आयआयटीमधील दोन तरुण अभ्यासकांनी पृथ्वीपासून 2950 कि.मी. अंतरावर असलेल्या लघुग्रहाचा शोध लावल्याचं वृत्त आलं. या संशोधकांचं अभिनंदन.)