आभाळमाया : अंतराळी आपत्तीवर उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>वैश्विक, [email protected]

खूप जुनी म्हणजे एकोणीसशे साठच्या दशकातली गोष्ट. आम्ही शाळेत होतो आणि एक दिवस चर्चा कानावर आली की, इकॅरस किंवा अशाच काहीशा नावाचा एक ‘ग्रह’ लवकरच पृथ्वीवर आदळणार आहे. माणूस चंद्रावर जाण्याच्या आधीचा तो काळ.  अवकाश विज्ञान आजच्या इतकं प्रगत नव्हतं. मात्र 1958 मध्ये युरी गागारिन अंतराळात जाऊन आल्यानंतर अवकाश कवेत आल्यासारखं संशोधकांना वाटू लागलं होतं. अर्थात अवकाशाच्या नव्या ओळखीबरोबरच त्यातले धोकेही ध्यानी येऊ लागले.

एखाद्या विषयावरचं समग्र संशोधन सर्वांगांनी होत असतं. ‘स्पेस’मध्ये वजनरहित अवस्था अनुभवलेल्या माणसाला तेव्हापासून जसे चंद्राचे वेध लागले तसे पृथ्वीभोवतीच्या अवकाशात असंख्य लहान-मोठे दगडगोटे आणि महाकाय पाषाणही (अशनी) फिरत असल्याची जाणीव झाली. एकदा अंतराळाचं दर्शन घेतल्याने तिथे काय असतं याचा परिचयही थोडय़ा प्रमाणात झालाच होता.

मंगळ आणि गुरू या ग्रहांच्या मध्ये पूर्वी एक ग्रह असावा आणि तो फुटल्यामुळे त्या ग्रहाच्या कक्षेत प्रचंड अशनी फिरत असावेत याचा अंदाज आल्यावर हा दगडपट्टा आपल्या पृथ्वीपासून फार जवळ नसला आणि त्यातले बरेचसे दगड मंगळच खेचून घेईल (गुरुत्वाकर्षणाने) हे खरं असलं तरी काही चुकार महापाषाण त्याच्या तावडीतून निसटले आणि थेट पृथ्वीकडे झेपावले तर? कल्पना भयावह होती. कोटय़वधी वर्षांपूर्वी पृथ्वीवरही अशा उल्का, अशनी, महापाषाणांची बरसात झाली होती. मात्र तो बराचसा काळ जीवसृष्टी निर्माण होण्यापूर्वीचा होता. आता भरवस्तीत जर असा काही अस्मानी उत्पात झाला तर? कारण काही हजार आणि काही शे वर्षांपूर्वीही असं घडण्याच्या खाणाखुणा पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपला आघात (इम्पॅक्ट) नोंदवून गेल्या होत्या. लोणार हे तर आपल्या महाराष्ट्रातलं गाव अशा अशनीजन्य विवरासाठीच प्रसिद्ध. तिथे अशनी कोसळला तो सुमारे बावन्न हजार वर्षांपूर्वी. प्रगत मानवी जगाचा आरंभ होण्यापूर्वी, परंतु रशियातील तुंगुस्काचे जंगल खाक करणारा अशनी तर विसाव्या शतकाच्या आरंभी कोसळला होता.

पृथ्वीच्या पृष्ठभागावर सुमारे 75 टक्के समुद्र आणि इतरत्र दऱ्याडोंगर, पर्वत-नद्या असंख्य असल्याने अवकाशस्थ पाषाण थेट मानवी वस्तीतच कोसळेल याची शक्यता खूपच कमी. मात्र निसर्ग जितका लहरी तितकाच निर्हेतुक असतो. अवकाशातून येणारा अशनी खाली काय आहे हे पाहून थोडाच कोसळणार? धुवाधार पाऊससुद्धा पडायचा तिथेच पडतो. निसर्गाच्या या रौद्र तांडवाला कोण रोखणार?

निसर्गावर मात करण्याची बात खोटी. त्याच्यावर मातबित करता येत नाही. त्याला समजून त्याच्या कलाकलाने काही मार्ग काढला तर तोच निसर्ग मित्र बनतो. माणसाला हे (उशिरा का होईना) पण कळू लागलंय. तर प्रश्न पृथ्वीभोवती अंतराळात गरगरणाऱ्या किंवा क्वचित धडक देण्याची शक्यता असलेल्या अशनी किंवा महापाषाणांचा. त्यासाठी ‘निअर अर्थ ऑब्जेक्टस्’ किंवा अंतराळातील पृथ्वीच्या जवळ फिरणारे भटके दगडगोटे किती नि कुठे आहेत? त्यांची गती काय आहे? ते आपल्या ग्रहमालेच्या कोणत्या भागातून येतात? त्याचबरोबर ‘उर्ट’ नावाच्या धूमकेतूच्या ढगांतून येणारे काही धूमकेतूही या महापाषाणांसारखेच त्रासदायक नाहीत ना या सर्वांचा अभ्यास सुरू झाला.

मग पृथ्वीजवळ येऊ पाहणाऱ्या अशनींचा मार्ग वळवणारी धडक देता येणं शक्य आहे का, अणुशक्तीच्या सहाय्याने अंतराळातच ते नष्ट करता येतील का अशा अनेक पर्यायांवर संशोधन सुरू झालं. यापैकी अणुस्फोटाने अशनीचा वेध घेणं तितकंच संयुक्तिक वाटत नसल्याने एखाद्या यानातून त्यावर मारा करून त्याचे निरुपद्रवी तुकडे अंतराळात विखरून टाकणं हा मार्ग सध्या योग्य दिसतो.

आता यामध्ये खूप काळजी घ्यावी लागणार. एखाद्या संभाव्य धोकादायक अंतराळी महापाषाणाचे तुकडे केले तर त्याच्या मोठा गाभ्याचा भाग तसाच फिरत राहिला तर त्याच्या गुरुत्वाकर्षणाने इतस्ततः फेकले गेलेले छोटे तुकडे त्याला पुन्हा चिकटू शकतात. त्यामुळे कॉम्प्युटर-सिम्युलेशनद्वारे असे प्रयोग केल्यावर ही गोष्ट लक्षात आली. त्यामुळे अवकाशी महापाषाणाचा फेरा आलाच तर निश्चित कोणती उपाययोजना करायची तेच अक्षरशः अधांतरी आहे. पृथ्वीवर अशनी, उल्का, धूमकेतू धडकण्याचं थांबल्यानंतरच जीवसृष्टी आकाराला आली. तरीही साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीव्यापी असलेल्या डायनॉसॉरचा विनाश अशाच एखाद्या धडकेतून झाल्याचं मानलं जातं. म्हणजे असं काही घडतं याची कल्पना असली तरी ठोस उपाय सापडलेला नाही, पण येत्या दीड-दोनशे वर्षांत तरी तशी शक्यता नसल्याने घाबरायचं कारण नाही. पुढे नवे शोध लागतीलच.