
>> वैश्विक
अशनी किंवा महापाषाण अथवा ऍस्टेरॉइड यांची संख्या आपल्या सूर्यमालेत प्रचंड आहे. आपला सूर्य पाच अब्ज वर्षांपूर्वी आणि त्यानंतर काही कोटी वर्षांनी जेव्हा ग्रहमाला अस्तित्वात येऊ लागली तेव्हा त्या प्राथमिक (फॉरमॅटिव्ह) अवस्थेत ग्रह-उपग्रहांच्या कक्षा, गती, आता ठरलेले आकार या साऱ्याची जडणघडण होत होती. आपला चंद्र पृथ्वीच्या बराच जवळ होता आणि पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेगही अफाट होता. हळूहळू स्थिरस्थावर होत कालांतराने आता आपण (आपल्यासकट) पाहतो ती ग्रहमाला तयार झाली. एवढय़ा मोठय़ा विस्तारात फक्त पृथ्वीवरच ‘जीवसृष्टी’ म्हणावी असं जीवन निर्माण झालं आणि माणूस नावाच्या प्राण्याला विश्वाचा कानोसा घेण्याइतपत बुद्धी प्राप्त झाली. आधुनिक माणसाच्या हजारो वर्षांच्या इतिहासात थेट अंतराळात जाऊन विश्वनिरीक्षण करण्याचं तंत्रज्ञान अवघ्या साठ वर्षांपूर्वीचं आहे.
मात्र या अभ्यासातून आपल्याला आपला चंद्र पादाक्रांत करता आला. पृथ्वीचं अंतराळातून छायाचित्रण करता आलं. बुध, शुक्र, मंगळ, गुरू, शनी यांच्याकडे यानं पाठवता आले. व्हॉएजर तर सूर्यमालेपलीकडेही पोचले. विश्वाचा आवाका लक्षात आला. ही सारीच प्रगती लक्षणीय आहे. त्याच वेळी वैश्विक घडामोडींचा मागोवा घेताना ग्रहमालेतील धोकेही लक्षात आले. ग्रहमाला तयार होताना ‘रोश लिमिट’नुसार मंगळ आणि गुरू यांच्या दरम्यान एक ग्रह असायला हवा होता. तसा तो नाही, परंतु तिथे मोठा अशनी पट्टा आहे. ते टक्करलेल्या ग्रहांचे अवशेष असावेत. हा पट्टा असंख्य दगडगोटे, पाषाणांनी गच्च भरलेला आहे. त्यातले काही निसटून एखाद्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाच्या सपाटय़ात सापडून त्यावर आदळू शकतात. आपली पृथ्वीही याला अपवाद नाही.
हे उल्का (छोटे दगड) किंवा अशनी (महापाषाण) मंगळ, गुरू, शनी यांच्याकडे खेचले गेले तरी तिथे जीवितहानी होणार नाही. कारण तिथे सजीवांचं अस्तित्वच नाही. असलं तरी अतिसूक्ष्म एकपेशीय जीवांचं असेल. आपल्या चंद्राच्या 4 टक्के वस्तुमान असलेल्या या दगडपट्टय़ात सेरेस, व्हेस्टा, पेलास, हायजिया असे प्रचंड आकाराचे अशनीसुद्धा आहेत. त्यातील सेरेस हा तर खुजा ग्रह (ड्वार्फ प्लॅनेट) म्हणावा इतक्या आकाराचा आहे. त्याचा व्यास 950 किलोमीटर एवढा असून ते आपापल्या गतीने सूर्याभोवती फिरत आहेत. या ऍस्टेरॉइट बेल्टचं 99 टक्के वस्तुमान त्यांच्या निर्मिती काळातील पहिल्या 10 कोटी वर्षांतच नष्ट झालेय. या पट्टय़ाच्या बाह्य भागातील बर्फाळ अशनी पृथ्वीवर कोटय़वधी वर्षांपूर्वी आदळून महासागर तयार झाले असा एक कयास आहे.
खगोल वैज्ञानिकांनी निअर अर्थ ऑब्जेक्टस् (एनईओ) नोंद केली असून असे सुमारे 20 हजार पाषाण पृथ्वीच्या जवळ फिरत आहेत. त्यामध्ये शंभराहून अधिक अल्पकालीन धूमकेतूंचाही समावेश आहे. 1980 पासून या अशनींची प्रकर्षाने दखल घेतली जाऊ लागली. ‘स्पेस’ जिंकण्याच्या नादात पृथ्वीवर उत्पात करणाऱ्या अशनींचा खोडा नको म्हणून सावधगिरी बाळगण्याचं ठरलं. 52 हजार वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्रातील लोणार येथे प्रचंड अशनी कोसळून निर्माण झालेलं विवर आणि त्यातील सरोवर जगप्रसिद्ध झालं आहे. ज्वालामुखीजन्य (इग>स) खडकातील हे एकमेव ज्ञात क्रेटर असून अमेरिकेत ऍरिझोना, कॅनडात न्यू क्वेबेक वगैरे प्रचंड विवरं आढळतात. 1910 मध्ये रशियातील तुंगुष्का येथे कोसळलेल्या एका अशनीने सबंध जंगल जाळून टाकलं.
140 मीटरपेक्षा जास्त मोठय़ा अशनीला धोकादायक मानलं जात असलं तरी 20 मीटर एवढा अशनीही पृथ्वीवर उत्पात घडवू शकतो. अशा अशनींच्या सूर्याभोवतीच्या फेरीचा अनेक वर्षांचा (किंवा अनेक फेऱयांचा) अभ्यास करून ते पृथ्वीवर आढळतील का याचं गणित मांडलं जातं. दरवर्षी केव्हातरी एखादी तारीख जाहीर होऊन ‘आता अमुक तमुक अशनी पृथ्वीवर आदळणार’ अशा बातम्या येतात. काही चॅनलवाले तर उच्चरवाने ‘सर्वनाश होणार का?’ वगैरे चर्चाही घडवतात. 1968 पासून माझ्या पिढीने अशा अनेक भाकितांचा सामना केला आहे. तेव्हा तर जगबुडी होण्याची आवई उठली होती. निमिरू नावाचा ग्रह पृथ्वीवर आदळण्याची तारीख 2017 मध्ये अशाच भाकीतकर्त्यांनी दिली. त्याला वैज्ञानिक आधार नव्हता, पण चर्चा मात्र झाली.
आता पुन्हा अगदी परवा म्हणजे 10 ऑगस्टला 2006 QQ23 नावाचा एक महापाषाण पृथ्वीवर आदळेल अशी हवा निर्माण केली गेली आहे. पृथ्वी ते सूर्य या अंतराला (15 कोटी कि.मी.) एक खगोलीय एकक असं म्हटलं जातं. ही अशनी 049977 इतक्या खगोलीय एकक अंतरावरून जाणार असल्याने त्याची पृथ्वीच्या सर्वात नजीकची ती कक्षा आहे. त्यामुळे ‘आता काय होणार?’ हा प्रश्न निर्माण केला जातोय.
अर्थात पूर्वानुभव लक्षात घेता या अशनीची पृथ्वीवर आदळण्याची शक्यता सात हजारांत एक आहे. त्यामुळे घाबरण्याचं करण नाही. परंतु तसं घडलंच तर पृथ्वीवर मोठी हानी होऊ शकते. 65 कोटी वर्षांपूर्वी अशाच अशनी किंवा धूमकेतूच्या आघाताने डायनॉसॉर पूर्णपणे नष्ट झाल्याचं म्हटलं जातं. दक्षिण युरालमध्ये (रशिया) 2013 मध्ये 66 फूटी अवकाशी पत्थर आदळून 1500 लोक जखमी झाले होते. पृथ्वीवर पडणाऱ्या बहुतेक छोटय़ा उल्का वातावरणाशी घर्षण होऊन जळून जाताना चमकदार दिसतात. अशनींचा उत्पात मोठा असतो. परवा पृथ्वीजवळून जाणारा अशनी सुमारे 1870 फुटांचा असून तो कक्षाबदल न करता शांतपणे आपल्या मार्गाने पसार होईल अशी वैज्ञानिकांना खात्री वाटते.




























































