मुद्दा – ऑटिझम : मिथके आणि वास्तव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरातील प्रत्येक 100 मुलांमागे अंदाजे एक मूल ऑटिझम स्पेक्ट्रम डिसॉर्डर (एएसडी)च्या कोणत्या ना कोणत्या प्रकाराने ग्रस्त असते – एएसडीबद्दलची जी चार मिथके आहेत त्यांच्यावर जराही विश्वास ठेवता कामा नये. स्वमग्नता अर्थात ऑटिझम किंवा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसॉर्डर (एएसडी) हे सामाजिक कौशल्यांचा अभाव, वर्तनातील पुनरावृत्ती, बोलण्यातील, शब्दांवाचूनचा संवाद साधण्यातील अडचणी अशा आव्हानांशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्यांच्या विपूल पटाला दिले गेलेले नाव आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगभरात प्रत्येक 100 मुलांमागे एका मुलाला एएसडीचा त्रास कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जाणवतो – अर्थात वेगवेगळ्या व्यक्तींसाठी या आजाराची तीव्रता वेगवेगळी असू शकते व काळानुरुप विशिष्ट स्थितीनुसार त्यात बदल घडू शकतो.

साधारणपणे मूल दोन किंवा तीन वर्षांचे असतानाच ऑटिझमची लक्षणे दिसू लागतात. तसेच ऑटिझम असलेल्या व्यक्तींच्या आजाराचे निदान लवकर झाल्यास त्याचे सकारात्मक परिणाम होऊ शकतात. याबाबतीत अनेक संशोधनांच्या निष्कर्षांमध्ये आणि तज्ञांमध्ये एकवाक्यता आढळून येते. या स्थितीविषयी अधिक जाणिवजागृती घडवून आणायची असल्यास पुढे दिलेल्या काही मिथकांवर विश्वास ठेवणे मात्र थांबवायला हवे.

मिथक 1 : ऑटिझम बरा होऊ शकतो.

वास्तव : हा आजार बरा होऊ शकत नाही, तर त्याचे व्यवस्थापन करता येते. कारण ही एक मज्जासंस्थेच्या विकासाशी निगडित समस्या आहे. संवादक्षमता, सामाजिक कौशल्ये आणि इतरांशी विचारांशी देवाणघेवाण करण्यातील असमर्थतेच्या रूपात ती प्रकट होते. ऑटिझमग्रस्त व्यक्ती तुलनेने स्वतंत्र आयुष्य जगू शकते. अशी व्यक्ती एक सुफल, निरोगी आयुष्यही जगू शकते. पण त्यासाठी या आजाराचे शक्य तितक्या लवकर निदान होणे व त्यासाठी व्यावसायिक आणि वैद्यकीय मदत पुरविली जाणे महत्त्वाचे आहे.

मिथक 2 : लसींमुळे ऑटिझम होऊ शकतो.

वास्तव : हा भ्रम बहुधा 1990च्या उत्तरार्धात प्रसिद्ध झालेल्या एका संशयास्पद संशोधनातून उद्भवला असावा. लसीकरण आणि ऑटिझममध्ये काही संबंध असण्याची शक्यता त्यात व्यक्त करण्यात आली होती. मात्र या संशोधनादरम्यान हाती घेण्यात आलेल्या प्रयोगांमध्ये वैज्ञानिक निकषांचे पुरेपूर पालन करण्यात आले नव्हते आणि पुढे या संशोधनाला फसवे, नक्कल करण्यास अपात्र आणि आपल्या निष्कर्षांचे कोणतेही पुरावे न देणारे संशोधन म्हणून नाकारण्यात आले. असे असूनही या मिथकावर अनेकांचा विश्वास आहे व त्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. खरेतर अलीकडेच करण्यात आलेल्या एका पाहणीमध्ये 11 वर्षांवरील 6 लाख 60 हजार मुलांचा अभ्यास करण्यात आला आणि त्यातून लसीकरण व ऑटिझममध्ये कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले.

मिथक 3 : ऑटिझमग्रस्त लोक हिंसक असतात व त्यांना कोणत्याही भावना नसतात.

वास्तव : ऑटिझमग्रस्त लोकांना भावना असतात मात्र त्यांना त्या सहजपणे व्यक्त करता येत नाहीत. याचे कारण ऑटिझममुळे व्यक्तीच्या संवाद साधण्याच्या, आपल्या भावना इतरांसमोर व्यक्त करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो व त्यातून अशा व्यक्तीला भावनाच नसतात असा निष्कर्ष बाहेरचे जग काढते. शिवाय ऑटिझमग्रस्त लोकांना इतरांच्या भावनांचा, त्यांच्या देहबोली, हावभावांचा अर्थ लावण्यासाठी, सामाजिक संवादातील बारकावे समजून घेण्यासाठीही खूप खटपट करावी लागते. त्यामुळेही त्यांच्याविषयीची ही चुकीची समजून आणखी पक्की होते. म्हणूनच अशा स्थितीमध्ये थेरपी आणि व्यावसायिक हस्तक्षेप अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कारण त्यामुळे त्यांना संवाद साधण्याच्या कामी मदत मिळते.

मिथक 4 : ऑटिझममुळे केवळ मेंदूवरच परिणाम होतो.

वास्तव : ऑटिझम ही एक मज्जासंस्थेशी संबंधित समस्या असल्याचे बहुतेकदा मानले जाते. मात्र वास्तवात या आजाराचा मेंदूसह मानवी शरीराच्या वेगवेगळ्या भागांनाही फटका बसू शकतो. ऑटिझमग्रस्त मुलांमध्ये अपस्मार, रोगप्रतिकार यंत्रणेच्या कार्यात बिघाड व उदरांत्राच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता सर्वसामान्य लोकसंख्येच्या तुलनेत जास्त असते. शिवाय हा आजार प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत वेगवेगळ्या स्वरूपाचा असू शकतो, म्हणजे काहींना झोप आणि आहाराशी संबंधित अडचण असू शकते तर काहींच्या संज्ञानात्मक कार्यांमध्ये समस्या असू शकते. लक्षात ठेवा, ऑटिझमग्रस्त व्यक्तीला मदत करण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे त्यांना व त्यांच्या स्थितीला समजून घेणे, या स्थितीविषयी अधिकाधिक माहिती करून घेणे, जेणेकरून त्यांच्यावर होणारा अन्याय व भेदभाव कमी होऊ शकेल.

– डॉ. केदार तिळवे
(कन्सल्टन्ट – सायकिऍट्रिक्स, फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड व फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल, वाशी)
– डॉ. अस्मिता महाजन
(कन्सल्टन्ट निओनॅटोलॉजिस्ट व पिडिएट्रिशियन, एस.एल. रहेजा हॉस्पिटल, माहीम)