लेख : ‘पायलट प्रोजेक्ट’ झाला, पुढे काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>सनतकुमार कोल्हटकर<<

[email protected]

बालाकोटवरील यशस्वी कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक पायलट प्रोजेक्ट पूर्ण झाला असून मोठी कारवाई बाकी आहे,’ असे विधान केले होते. साहजिकच पुढे काय नेमके होणार याबद्दल असलेली उत्सुकता अजूनही कायम आहे. पुढे खरोखरच काही होणार की नाही होणार, हे येणारा काळच सांगेल. मात्र गेल्या काही दिवसांतील घडामोडी व त्यासंदर्भातील बातम्या बघितल्या तर त्यावरून पुढील घडू शकणाऱ्या घटनांचा अंदाज बांधता येऊ शकतो. या सर्व गोष्टींमध्ये एक निश्चित अशी संगती आहे. त्यांची संगतवार मांडणी केल्यास जे चित्र समोर येते त्यानुसार एक गोष्ट सांगता येते की, ‘‘पिक्चर अभी बाकी है…!’’

बालाकोटवरील यशस्वी सर्जिकल स्ट्राइकनंतर पुढे काय? असा प्रश्न सर्व हिंदुस्थानींना पडला आहे हे निश्चित. कारण पाकिस्तानविरुद्धची मोहीम अजून संपलेली नाही हे तर सुस्पष्ट दिसत आहे. त्यातच हिंदुस्थानात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात पाकिस्तानच्या सीमेवर अथवा सीमेपार काही घडू शकते का याचीच प्रत्येकाला उत्सुकता आहे. पाकिस्तान अथवा तेथील दहशतवादी संघटनाही त्यांचा पूर्वेतिहास पाहता स्वस्थ बसतील हे संभवत नाही. बालाकोटवरील यशस्वी कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक पायलट प्रोजेक्ट पूर्ण झाला असून मोठी कारवाई बाकी आहे,’ असे विधान केले होते. पंतप्रधान मोदी यांच्या ‘‘यशस्वी पायलट प्रोजेक्टनंतर आता खराखुरा प्रोजेक्ट करणे बाकी आहे’’ या विधानामुळे  ‘‘फिल्म अभी बाकी है’’ असाच संदेश लोकांपुढे गेला आहे. अर्थातच तो संदेश सीमापार पाकिस्तानपर्यंतही पोहोचला असावा असे मानण्यास जागा आहे. एअर मार्शल धानोरा यांनीही बोलताना पाकिस्तानविरुद्धची कारवाई अजून संपलेली नसल्याचे विधान केले होते.

गेल्या काही दिवसांतील घडामोडी व त्यासंदर्भातील बातम्या बघितल्या तर त्यावरून पुढील घडू शकणाऱ्या घटनांचा अंदाज बांधता येऊ शकतो. या विविध घटना म्हणजे विविध बिंदू असून त्या बिंदूंना जोडत गेल्यास जे चित्र समोर येते, त्यावरून सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीत हिंदुस्थानकडून जागतिक पातळीवर किती बारकाईने आणि अभ्यासपूर्ण तयारी चालू आहे हे कळते. खालील घटना वेगवेगळ्या लिहिलेल्या आहेत. सुजाण वाचकांना त्यातून कयास बांधता येईलच.

> 13 मार्चला संयुक्त राष्ट्रांत फ्रान्सने दहशतवादी मसूद अजहरवर बंदीच्या ठरावावर मतदान झाले आणि अपेक्षेप्रमाणे चीनने त्या ठरावात खोडा  घातला. चीनकडून परत या ठरावाविरुद्ध ‘व्हेटो’ वापरला गेला. या ठरावाला फ्रान्सबरोबरच जर्मनी, ब्रिटन,  अमेरिका, रशिया आणि अनेक राष्ट्रांनी पाठिंबा दिला आहे.

> मागील आठवड्यातच पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात बलुची मुक्ती संघटनेकडून तेलवाहिनी उडवून देण्यात आली.

> युरोप आणि अमेरिकेत राहणाऱ्या सिंधी, बलुची आणि पश्तुनी या मूळ पाकिस्तानच्या, पण परदेशात  राहणाऱ्या लोकांनी संयुक्त राष्ट्रांकडे पाकिस्तानकडून होणाऱ्या अत्याचाराचे फोटो व ध्वनिचित्रफितींमार्फत माहिती दिली.

> युरोपमध्ये बलुची आणि सिंधी लोकांची पाकिस्तानविरुद्ध निदर्शने.

> इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्चे प्रमुख कासीम सुलेमानी यांनी पाकिस्तानला तेथील ‘जैशे आदिल’ संघटनेवर लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी दिलेला इशारा अथवा स्वतः पाकिस्तानमध्ये घुसून या संघटनेवर कारवाई करण्याची दिलेली धमकी. पाकिस्तानस्थित जैशे आदिल या संघटनेच्या दहशतवाद्यांनी 12 फेब्रुवारीला केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 30 इराणी जवान ठार झाले होते. त्या हल्ल्याबद्दल इराणकडून  प्रतिक्रियाही आली होती. बालाकोटवरील कारवाईपूर्वी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी इराणला धावती भेट दिली होती आणि इराणच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांशी चर्चाही केली होती.

> हिंदुस्थानचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांची अमेरिकेत जाऊन भेट घेतली. दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनात अमेरिकेकडून दहशतवाद रोखण्यासाठी हिंदुस्थानला पाठिंबा व्यक्त करण्यात आला. अमेरिकेचे सुरक्षा सचिव जॉन बोल्टन यांनी पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास तयार असल्याचे विधान केले.

> हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टर्कीचे अध्यक्ष एर्दोगेन यांच्याबरोबर 20 मिनिटे फोनवरून चर्चा झाल्याचे वृत्त होते.

> सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री ‘अल जुबेर’ यांनी दिल्लीला नुकतीच दिलेली तातडीची भेट.

> केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह  यांनी मध्यंतरी  बालाकोटनंतर अजून एक तिसरा सर्जिकल स्ट्राइकही यशस्वी झाल्याचे सांगितले होते. तो स्ट्राइक म्यानमारच्या संरक्षण दलांसमवेत ईशान्य हिंदुस्थानात सक्रिय असणाऱ्या आणि म्यानमारमधील जंगलात लपून बसलेल्या ‘युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम’ (उल्फा), ‘नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड, खापलांग’ या दहशतवादी संघटनांवर जोरदार व आक्रमकपणे करण्यात आला. या संघटनांचे म्यानमारमधील अनेक तळ हिंदुस्थानी लष्कराने उद्ध्वस्त केले. या सर्व दहशतवादी संघटनांना पाकिस्तान व चीनकडून सक्रिय पाठिंबा मिळत होता असे बोलले गेले. आता या संघटनांना म्यानमार, बांगलादेश, नेपाळ, भूतान या हिंदुस्थानच्या शेजाऱयांपैकी कोणीही आश्रय द्यायला तयार नाही.

> अफगाणिस्तानमधून सैन्य परत बोलावल्यावर अमेरिकेला हिंदुस्थानचा अफगाणिस्तानमध्ये सक्रिय सहभाग हवा आहे,  पण हिंदुस्थान त्यास अजिबात तयार नाही. अफगाणिस्तानच्या पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये हिंदुस्थानला रस आहे. अफगाणिस्तानलाही पाकिस्तानवरील अवलंबित्व संपवायचे आहेच.

> रशियन बनावटीच्या मिग – 21 ने अमेरिकन बनावटीचे एफ-16 पडल्यापासून अमेरिका अस्वस्थ आहे. जागतिक शस्त्रास्त्रांच्या बाजारातील एफ-16 ची  पत घसरण्याची अमेरिकन कंपनी  लॉकहिडला भीती वाटत आहे. एफ-16चा मिग-21 पुढे टिकाव लागला नाही असाच संदेश जगभर गेला आहे.

या सर्व गोष्टींमध्ये एक निश्चित अशी संगती आहे. या विविध गोष्टींची संगतवार मांडणी केल्यास जे चित्र समोर येते त्यानुसार एक गोष्ट निश्चितपणे सांगता येते की, ‘‘पिक्चर अभी बाकी है…!’’

येणाऱ्या नजीकच्या काळात  पाकिस्तानकडून ( हिंदुस्थानातील निवडणुकीच्या काळातही) काही आगळीक झाल्यास हिंदुस्थानकडून पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई होऊ शकते. त्याची पूर्ण तयारी झालेली असू शकते किंवा तयारी चालू असू शकते. ही कारवाई फक्त हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्या एकमेकांना भिडलेल्या भौगोलिक सीमेपुरता कदाचित मर्यादित नसेल, तर पाकिस्तानच्या एकंदर संपूर्ण सीमाच कारवाईच्या मर्यादेत असतील असे वाटण्यास जागा आहे. पाकिस्तान एकावेळी किती आघाडय़ांवर लढू शकेल आणि किती दिवस तग धरू शकेल याचा पुरेपूर अभ्यास झालेला असण्याची शक्यता दिसत आहे.

पाकिस्तानमध्ये सिंधी, बलुची आणि पश्तुनी लोक पाकिस्तानविरुद्ध उभे ठाकले असून या सर्वांना पाकिस्तानमधून बाहेर पडून स्वतंत्र व्हायचे आहे. या सर्वांना त्यासाठी एकच आशेचा किरण आहे तो म्हणजे हिंदुस्थान.

हिंदुस्थानकडून पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई झाल्यास सिंध,  बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनवा या तिन्ही प्रांतांत स्वातंत्र्यासाठी मोठे उठाव होऊ शकतात. पाकिस्तानला सीमेवर लक्ष ठेवावयाचे की, पाकिस्तानमधील वर उल्लेखलेल्या प्रांतातील अंतर्गत असंतोषावर लक्ष ठेवावयाचे हे ठरवावे लागेल. पाकिस्तान जागतिक पातळीवर पूर्णपणे एकटा पडला असून चीन सोडता त्याला सहानभूती दाखवणारा एकही देश राहिलेला नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे एकतर मसूद अजहर, लख्वी, हाफिज सईद व इतर दहशतवाद्यांवर दृश्य अशी विश्वासार्ह  कारवाई करावी लागेल अथवा पुढे वाढून ठेवलेल्या घटनांना तोंड द्यावे लागेल. येणारा काळच काय काय घडू शकते याबद्दल सांगू शकेल.