मुद्दा : वांद्रे ते सावंतवाडी कायमस्वरूपी गाडी

26

>>नितीन ग. गांधी<<

पश्चिम उपनगर वांद्रे ते दहिसरपर्यंतच्या उपनगरात 5 ते 6 (अंदाजे) कोकणातील चाकरमानी आहेत. गणेश चतुर्थी व मे महिन्यात तात्पुरत्या स्वरूपाची हॉली डे स्पेशल गाडी सोडली जाते. गणेशोत्सवात तर विविध गावे, वाडय़ांमध्ये मे व जूनपर्यंत जत्रा, गुढीपाडवा, होळी, दिवाळी, जागर असे विविध सांस्कृतिक उत्सव साजरे करण्यासाठी चाकरमानी आपल्या गावी जातो. अशा वेळी कोकणवासीयांना सीएसटी, दादर मध्य, ठाणे, लोकमान्य टिळक टर्मिनल, दिवा या स्थानकांपर्यंत जाण्यासाठी गर्दीच्या वेळी त्रासदायक प्रवास करावा लागतो व कोकणात जाणारी गाडी पकडावी लागते याची नुसती कल्पनाच केलेली बरी.

आज कोकण रेल्वे प्रशासनाकडून केरळ, तामीळनाडू, कर्नाटक या दक्षिणी राज्यांसाठी 38 एक्प्रेस, 12 पॅसेंजर डेमू अशा 50 गाडय़ांच्या जाणाऱ्या व येणाऱ्या मिळून 100 फेऱ्या होतात. गोवा राज्याला एक्प्रेस, पॅसेंजर व डेमू मिळून 20 गाडय़ांच्या जाता येता अशा नियमित 40 फेऱ्या होतात, तर महाराष्ट्राच्या को.रे.चे शेवटचे स्थानक सावंतवाडी मडुरेसाठी तुतारी एक्प्रेस (गा. क्र. 11003), दिवा-सावंतवाडी (क्र. 50105), दादर ते रत्नागिरी (क्र.50103), सावंतवाडी ते मडगाव (क्र. 50107), रत्नागिरी ते मडगाव पॅसेंजर (क्र.50101) अशा एकूण 5 गाडय़ा सोडल्या जातात. त्यांच्या एकूण 10 फेऱ्या होतात, परंतु मुंबई पश्चिम उपनगरातून कोकणात जाण्यासाठी एकही गाडी का सोडली जात नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटते.

को.रे. प्रकल्पांसाठी 43 हजार शेतजमीन मालकांकडून जमीन संपादित करण्यात आल्या. पनवेल ते सावंतवाडी 581 कि.मी. (29.7 टक्के), सावंतवाडी ते मडगाव 76 कि.मी 3.5 टक्के), मडगाव ते मेंगलोर 341.7 कि.मी (16.9 टक्के), मेंगलोर ते कोईमतूर 417.9 कि.मी. (20 टक्के) मेंगलोर ते तिरुवनंतपुरम (त्रिवेंद्रम) 620 कि.मी (30.9 टक्के) असे एकूण 2035.9 कि.मी. लांबीचे लोहमार्गाचे को.रे.चे जाळे पसरलेले आहे. गोवा, कर्नाटक, तामीळनाडू व केरळ या राज्यांचे रेल्वे रुळांचे जाळे 71.3 टक्के असूनही गाडय़ा 93 टक्के व महाराष्ट्र कोकणासाठी फक्त 7 टक्के गाडय़ा देण्यात आल्या. खरे तर महाराष्ट्र कोकण रेल्वे सावंतवाडीपर्यंत को. रे. रेल्वे रुळाचे जाळे 29.7 टक्के असताना फक्त 7 टक्के गाडय़ा नियमित आहेत.

सदर विषयावर मुंबई, उपनगर मध्य, प. उपनगरासह महाराष्ट्र कोकणातील लोकप्रतिनिधीसह कोकणवासीयांनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.‘पारिजातकाचे झाड रुक्मिणीच्या दारी! फुले मात्र सत्यभामेच्या अंगणी’ असा उफराटा व संतापजनक प्रकार को. रे. प्रशासनाकडून चालला आहे. सदर बाब ही गंभीर असून संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी व मुंबईसह कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींनी आलेली मरगळ झटकावी व जातीने लक्ष घालावे. पश्चिम उपनगरामधून वांद्रे, अंधेरी, बोरिवली, वसई, पनवेलमार्गे सावंतवाडीपर्यंत नियमित कायमस्वरूपी गाडी सुरू करून पश्चिम उपनगरातील कोकणवासीयांना दिलासा द्यावा ही विनंती.

आपली प्रतिक्रिया द्या