लेख – (जी)वन-रक्षण!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे’ असा संदेश देणाऱया संतश्रेष्ठ तुकोबांच्या महाराष्ट्रातील आपण. वन आणि जन याचं नातं पुरातन काळापासून आहे. पृथ्वीवर प्राणिसृष्टी निर्माण होण्याआधी वनसंपदाच अस्तित्वात आली. अगदी शेवाळापासून ते आकाशस्पर्शी महाकाय झाडामाडांपर्यंत अनेक प्रजातींच्या वनस्पतींनी पृथ्वी बहरली. पंच्याहत्तर टक्के पाण्यामुळे ती अवकाशातून निळी दिसते. पण पृथ्वीवरून आपल्याला आकाशाची, समुद्राची निळाई आणि वनकाननांची हिरवाईसुद्धा अनुभवता येते. शिवार, हिरवंगार झालं की सुखावणारा शेतकरीच आपली दोन वेळची भूक भागवत असतो. निसर्गाशी फटकून वागता येत नाही आणि त्याचा अतिरेक झाला तर ‘निसर्ग’ उत्पात कसा घडवू शकतो याचा अनुभव माणसाने अनेकदा घेतला आहे.

23 जुलैला वनसंवर्धन तर 26 तारखेला खारफुटी किंवा कांदळवनाच्या रक्षणाचा दिवस होता. कोणे एकेकाळी माणसाची जीवनशैलीच वनरक्षणही करत होती. गेल्या दोन-तीनशे वर्षात त्यात आमूलाग्र बदल झाला. म्हणूनच आज जागतिक परिषदा घेऊन वनरक्षण, पर्यावरण संरक्षण याचा ऊहापोह करावा लागतो. त्याचा चांगला परिणाम असा की, थोडय़ाफार प्रमाणात वनसंवर्धनाविषयी जनजागृती झालेली दिसून येते. सरकारी पातळीवरही त्याचा विचार होतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी मेळघाट व्याघ्रप्रकल्पातून जाणाऱया संभाव्य ब्रॉडगेज रेल्वेबाबत सूचना केली किंवा राज्याच्या पर्यावरणमंत्र्यांच्या सजगतेमुळे सांगलीजवळचा एक पुरातन वटवृक्ष वाचविण्यात यश आलं. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. या सर्व गोष्टी दिलासा देणाऱया आहेत.

आपल्याकडे प्राचीनकाळी अग्निपुराणात वनरक्षणाचा उल्लेख असल्याचं म्हटलं जातं. चंद्रगुप्त, अशोक या राजांनी वनरक्षक अधिकारीच नेमले. वनसंवर्धनाबाबतची शिवकालीन आज्ञापत्रे हा तर आपला मोलाचा इतिहास आहे. या सर्वांतून बोध घेऊन दरवर्षी प्रत्येकाने एक झाड लावलं आणि वाढवलं तर उत्तमच. परंतु अस्तित्वात असलेल्या झाडामाडांविषयी अनास्था तरी दाखवू नये ही अपेक्षा.

दोनशे वर्षांपूर्वी जगात कोटय़वधी चौरस किलोमीटर भाग अरण्याने व्यापला होता. तो विविध कारणांनी कमी होत गेला. त्याला जसे ऑटिझोना, सायबेरिया किंवा ऑस्ट्रेलियात लागणारे नैसर्गिक महावणवे कारणीभूत आहेत. त्याचप्रमाणे माणसांची वाढत्या वस्तीस्थानांची लालसाही जबाबदार आहे. कॅविलॉन यांच्या म्हणण्यानुसार हिंदुस्थानात एकेकाळी सुमारे 70 टक्के जंगल होतं. आता ते प्रमाण वाढून 22 टक्क्यांपर्यंत खाली आल्याचं म्हटलं जातं. 2015 मध्ये जगात सुमारे तीन ट्रिलियन झाडं होती. एक ट्रिलियन म्हणजे एकावर 12 शून्य! साधारण 40 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर जे अरण्यकवच निर्माण होऊ लागलं त्याने या ग्रहावरच्या माणसासकट जैविक प्रजातींना जीवन’ दिलं. त्यामुळे वन हे जीवनदायी आहे ही गोष्ट जाणून घेतली पाहिजे.

पृथ्वीवर विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूला 10 अंश अक्षांशापर्यंत दाट जंगल असतं, या भागात रोज थोडा थोडा पाऊस पडतो. त्यामुळे ही ‘रेन फॉरेस्ट’ प्रचंड वाढतात. हिंदुस्थानातही केरळ, तामीळनाडू वगैरे दक्षिणी राज्यात दाट, उष्ण कटिबंधातील जंगलांचा प्रदेश येतो. केरळमधील मुन्नन्तेरई ‘रेन फॉरेस्ट’ आणि ‘सायलेन्ट व्हॅली’मधलं जैवविविध्य प्रसिद्ध आहे. एकूण पश्चिम घाटातील सह्याद्री नीलगिरी पर्वतराजींमध्ये दुर्मिळ वनसंपदा दडली आहे. निसर्गाचा आपण न मागता मिळालेला ठेवा जपायलाच हवा. त्यानंतर 10 ते 53 अक्षांशापर्यंत, पृथ्वीच्या दोन्ही गोलार्धात भरपूर अरण्य असतं. महाराष्ट्र त्यात येतो. पूर्वी तो नाशिक परिसरातल्या दंडकारण्यासाठी प्रसिद्ध होता. आजही मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मेळघाट, ताडोबासाठी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भाग वनसमृद्ध दिसतात.

अरण्याच्या चार प्रकारात पर्जन्यवनात (रेन फॉरेस्ट) खूप दाट आणि उंच झाडं असतात. समशीतोष्ण भागातही आपल्याकडे दिसतात तशी विशालदेही झाडं आढळतात. 53 अक्षांपासून पुढे 70 अक्षांशापर्यंत धुवीय जंगल (बोरीमाल फॉरेस्ट) दिसतं. अगदी हिमालयासारख्या भागात सूचीपर्णीसारखी थंड हवामानात टिकणारी झाडं दिसतात. महाकाय झाडं, झुडपं, गवत, पिकं सारीच हिरवाई विविध रूपांनी आपल्याला भरपूर काही देत असते. खारफुटी किंवा सागरकिनारी असलेली चिवट मुळांची कांदळवनं जमिनीची धूप थांबवतात. तेच काम डोंगर उतारावरची वनश्री करत असते.

आज देशात सुमारे बावीस टक्के भागात जंगल असेल आणि महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यात ते सरासरीपेक्षा कमी दिसत असेल तर ती गांभीर्याने विचार करण्याची गोष्ट आहे. तरीही देशातल्या विसेक राज्यांची स्थिती वनसंपदेबाबत बरी आहे. ब्रिटिशांच्या काळात देशात खूप जंगलतोड झाली. मग डलहौसीने त्याविषयी नियम केले. 1952 पासून देशात वनसंवर्धनात सरकारने लक्ष घातलं. मात्र हे काम एकटय़ा सरकारचं नसून पृथ्वीवरच्या प्रत्येकाचं आहे. जंगलं प्रदूषण कमी करतात आणि अन्न देतात. आपण त्यांना काय देतो हा प्रश्न आपल्याला उत्तरदायी करतो.