तुळशी माळ गळा…

881

>> मंजुश्री गोखले

राही… रखुमाई आणि तुळस. विठ्ठलाच्या रोजच्या जगण्यात तिचे स्थान अबाधीत आणि तिच्या मुग्धतेचा मानही वेगळाच.

प्राचीन हिंदू संस्कृतीमध्ये आणि अर्वाचीन हिंदुस्थानी संस्कृतीमध्ये तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आयुर्वेदाने तर तुळशीला संजीवनी असं संबोधलं आहे. प्रत्येक हिंदूच्या दारासमोर, अंगणात, परसदारी, कुंडीत, गच्चीत, बाल्कनीत आपल्या अंगभूत वैशिष्टय़ाने मिरवणारी तुळस ही आमच्या हिंदू संस्कृतीचं एक गोजिरवाणं, पवित्र, भक्तिमय रूप आहे. पुराणकाळात देवांना, विशेषतः श्रीकृष्णाला प्रिय असलेली ही तुळस आधुनिक काळातही श्रीकृष्णाच्या भक्तीचे माध्यम आणि साधन ठरत आहे, ठरली आहे. ‘तुळस’ या नावाभोवतीच एक पवित्रतेचं वलय आहे. अगदी ती देवाला वाहिली नाही तरी. सगळ्या वाईट गोष्टीत एखादी चांगली गोष्ट घडली की, आपण सहजपणे म्हणून जातो, ‘भांगेत तुळस’. तुळशीभोवती असलेलं हे पवित्र वलय तिच्या औषधी गुणांमुळे आणखीच सिद्ध होतं. देवाचे नैवेद्याचे पान वाढले की, त्यावर तुळशीदल ठेवण्याची प्रथा आहे. ती आजतागायत पाळली जाते. इथं तिच्या औषधी गुणांची चर्चा करणं हा हेतू नसला तरी तिचं पावित्र्य सांगणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुळशीचं वैशिष्टय़ म्हणजे तुळशीला कधीही कीड लागत नाही. तिला आयुर्वेदात संजीवन वनस्पती अशासाठी म्हटलंय की, तुळशीचं झाड मेलं असं कधीच होत नाही. तिच्या मंजिऱया पडून अनेक रोपं येत राहतात. तुळस ही अशी वनस्पती आहे की, जी दिवस-रात्र प्राणवायू उत्सर्जित करते. साहजिकच तुळशीभोवतालचं वातावरण स्वच्छ, निर्मळ, आरोग्यपूर्ण आणि पवित्र राहतं. अशी तुळस परमेश्वराला प्रिय झाल्याशिवाय कशी राहील?

तुळशीचं हे परमेश्वराला, विशेषतः श्रीकृष्णाला आणि विठ्ठलाला प्रिय असणं हे भक्तांचं गौरवस्थान आहे आणि यामागची कारणं सांगणाऱया कथाही फार सुंदर आहेत. श्रीकृष्णाची प्रिय सखी राधा (‘रा’ म्हणजे तेज आणि ‘धा’ म्हणजे धारण करणारी). श्रीकृष्णाच्या प्रेमाचं आणि भक्तीचं तेज जिनं धारण केलं आहे अशी राधा श्रीकृष्णाची प्रियतमा, पण ती विवाहित होती. अनय नाव होतं तिच्या पतीचं. विवाहित असल्यामुळं तिचं श्रीकृष्णाशी एकरूप होणं अशक्य होतं. म्हणून तिनं श्रीकृष्णाकडे वर मागितला, ‘‘या नाहीतर पुढच्या जन्मी मी तुझी पत्नी होईन’’, पण त्याही जन्मात हा वर पूर्ण झाला नाही. पुढच्या जन्मात राधा जन्मली वृंदा म्हणून आणि जालंधराशी तिचा विवाह झाला. याही जन्मात राधा-कृष्णाचं मीलन अपूर्ण राहिलं. मग मात्र राधेनं श्रीकृष्णाला आपल्या भक्तीची शपथ घातली आणि म्हणाली, ‘‘तू जितक्या वेळी जिथे जिथे, जो जो जन्म घेशील, त्या त्या वेळी, त्या त्या जन्मात मी सतत तुझ्या समीप राहीन असा मला वर दे.’’ श्रीकृष्णानं ‘‘तथास्तु’’ म्हटलं आणि वृंदेचं तुळशीत रूपांतर झालं. तुळशीचा हार बनून ती श्रीकृष्णाच्या गळ्यात पडली. द्वापारयुगानंतर श्रीकृष्णानं कलियुगात विठ्ठलाच्या रूपात जन्म घेतला आणि ही वृंदा ऊर्फ राधा तुळशीहाराच्या रूपानं विठ्ठलाच्या छातीवर विराजमान झाली. म्हणूनच विठ्ठलाला तुळशीमाळ अत्यंत आवडते. म्हणून ‘तुळशीमाळ गळा कर ठेवूनी कटी’ असा तो अठ्ठावीस युगे उभा आहे. कितीही मौल्यवान दागदागिने घातले तरी तुळशीमाळ घातल्याशिवाय विठ्ठलाची पूजा पूर्ण होत नाही. हीच तुळस कलियुगात संत जनाबाईंच्या रूपात अवतरली. म्हणूनच जनाबाईंनी गुंफलेली तुळशीदलाची माळ सुकत नसे असं म्हणतात. द्वापारयुगातही रुक्मिणीला राधा-कृष्णाची एकरूपता माहीत होती. म्हणूनच सगळी संपत्ती सत्यभामेनं ओतल्यावरही श्रीकृष्णाची तुला पूर्ण होईना. त्यावेळी रुक्मिणीनं एक तुळशीदल त्या पारडय़ात टाकलं आणि तुला संपन्न झाली. तर नटून सजून आलेल्या रुक्मिणीला आपल्या मस्तकावर मोरपीस दिसलं आणि तुळशीच्या रोपाच्या प्रत्येक पानात श्रीकृष्णाची छबी दिसली. अशी ही तुळस निरामय भक्तीचं, चिरंतन प्रेमाचं, चिरंजीव आरोग्याचं प्रतीक आहे.

लाखो भक्तांच्या हृदयात चिरंतन राहणाऱया विठ्ठलाच्या गळ्यात त्याच्या छातीवर रुळणारी ही तुळस प्रेम आणि त्याग या हिंदुस्थानी संस्कृतीचा चिरंतन वारसाच आहे आणि जोपर्यंत विठ्ठल आहे, तोपर्यंत चंद्रभागा आहे आणि जोपर्यंत वारकरी आहेत, तोपर्यंतच नव्हे, तर त्यानंतरही ही तुळस भक्तीच्या आणि प्रेमाच्या मंजिऱया सर्वांगावर लेवून आपल्याला भक्तीची शाश्वती सांगत राहणार आहे. तुळशीचं हे असं तुळस असणं हेच तर अधोरेखित करतं.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या