
>> स्वप्निल साळसकर
जैवविविधतेतील संतुलन योग्य राखण्यात वटवाघुळ महत्त्वाचे ठरतात. सध्या सिंधुदुर्गात त्यांचा अधिवास संकटात सापडला आहे. यामागची कारणे आणि सद्यस्थिती जाणून घ्यायला हवी.
शुभ अशुभ म्हणून गणना केली जाणाऱया मात्र निसर्गाचा समतोल राखण्यात तेवढीच महत्त्वाची भूमिका बजावण्याऱया वटवाघळांचा सिंधुदुर्गातील अधिवास हळूहळू धोक्यात येऊ लागला आहे. शेतकऱयांचा सोबती आणि शेती, बागायतीतील कीटकांचा भक्षक असणाऱया या वन्यजीवांची घटती संख्या जैवविविधतेचा ऱहास दाखवणारी सूचनाच म्हणावी लागेल.
सिंधुदुर्गात जैवविविधता अगदी ठासून भरलेली आहे. दोडामार्ग पासून वैभववाडीच्या टोकापर्यंत आठही तालुक्यात विविध वन्यप्राणी, पशुपक्षी, कीटक, फळे, फुले अशा नवनवीन गोष्टी संशोधनातून नेहमीच समोर येत आहेत. त्यातीलच निसर्गाचा समतोल राखणारा आणि शेतीचा संरक्षक म्हणून काम करणाऱया वटवाघळांचा अधिवास संकटात सापडला असल्याचे वटवाघुळ अभ्यासक राहुल प्रभू खानोलकर यांचे म्हणणे आहे. बेसुमार जंगलतोड, वातावरणातील बदल, विकासाच्या नावाखाली उभी राहणारी सिमेंट, काँक्रीटची जंगले याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे शेती बागायतीवर केली जाणारी औषधांची फवारणी यामुळे ही कीटक नाहीसे होत असून अन्न मिळणे दुर्लभ होत असल्याने या गरीब म्हणून गणल्या जाणाऱया वटवाघळांनी आपला रहिवास बदलला असल्याचे दिसून येते.
रात्रीच्या वेळी खाद्याच्या शोधात फिरत असताना ग्रामीण भागातील विजेच्या खांबावरील वाहिन्यांना शॉक लागून हा सस्तन प्राणी मृत्युमुखी झाल्याच्या घटना नेहमीच दिसून येतात. जगभरात 1400 हून अधिक तर हिंदुस्थानात 130, महाराष्ट्रात 35 ते 36 आणि सिंधुदुर्गात सर्वात जास्त वटवाघळाच्या 18 प्रजाती वास्तव्य करतात. जिह्यात सावंतवाडीतील राजवाडय़ाच्या मागच्या बाजूला, बांदा पोलीस ठाण्याच्या आवारात, कुडाळमध्ये लक्ष्मीवाडी, नांदगावला कोळंबा देवस्थानच्या समोरच मुंबई गोवा महामार्गावर असणाऱया सुरूच्या वनात वटवाघळांचे लक्ष वेधून घेणारे मोठे वास्तव्य आहे.
एकत्र घोळका करणाऱया या प्रजाती पडकेवाडे, घरे, गुहा यामध्येही राहत असून मच्छर, लहान बेडूक, उंदीर मासे, किडी, मुंग्या यासह इतर सदृश्य कीटक खाणाऱया मांसाहारी तर काही वटवाघळे फणस, चिकू, पेरू, काजू, उंबर, कापूस यासारखी फळे खाणारी शाकाहारी असतात. याबाबत प्रभू खानोलकर सांगतात, ‘वटवाघुळ हे संसर्गजन्य रोगाच्या विषाणूंचा प्रसार करतात हा गैरसमज आहे. त्यामुळे अधिवास नष्ट करणे त्यांना हुसकावून लावणे असे उपाय अमलात आणल्यास त्यांच्याकडून रोगप्रसार होण्याचे संभाव्य धोके निर्माण होऊ शकतात.’
खारफुटी वाढवण्यात मोठा वाटा
वटवाघळांमुळेच खाडी किनाऱयाची ढाल होण्राया, मातीची धूप रोखण्राया, माशांच्या अंडी घालण्यासोबतच इतर सागरी जीवांना आश्रय देण्राया खारफुटी वनस्पतीचे परागीभवन होते. कीटकभक्षी वटवाघळांकडून 2 ते 5 हजार कीटकांचा फडशा पाडला जातो. वटवाघळांच्या विष्ठेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण अधिक असल्यामुळे पूर्वी खत म्हणून शेतीमध्ये त्यांचा वापर होत असल्याचे प्रभू खानोलकर म्हणाले.
वन्यजीव कायद्यांतर्गत संरक्षण नाही
वटवाघुळ हे देशातील जैवविविधतेचा महत्त्वाचा घटक असून परागीभवन, बीजप्रसार आणि कीटक नियंत्रक म्हणून ते निसर्गात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. विविध परिसंस्थामधील त्यांची भूमिका आणि योगदान याबद्दल फारशी माहिती आणि अभ्यास नसल्यामुळे वटवाघळांच्या संरक्षणासाठी सहसा प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे वाघळांच्या बहुतेक जातींना वन्यजीव कायद्यांतर्गत संरक्षण नसल्याचे राहुल प्रभू खानोलकर यांनी सांगितले. माणूस आणि वाघळं यां दोघांच्या निरोगी सहजीवनासाठी वटवाघळांचं संरक्षण, संवर्धन आणि समाजात जागरूकता होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.