
>>डॉ. सरिता विनय भावे
मध्य प्रदेशातील चंबळ नदीच्या खोऱयात, मुरैना जिह्यातील ‘बटेश्वर’ या आडगावात असणारे मंदिरसंकुल पाहता आले. 8 ते 10 व्या शतकात, गुर्जर-प्रतिहार यांच्या कालखंडात बांधलेल्या; शिव, विष्णू आणि शक्ती यांना समर्पित, साधारण 200 वालुकाश्म (सँडस्टोन) मंदिरांचा हा विशाल समूह. मंदिर संबंधित कला आणि कलाकार यांचे केंद्रस्थान म्हणून या जागेचा वैभवशाली ‘नजारा’ पाहण्याजोगा आहे.
‘सहज मिळे त्यांत जीव तृप्तता न पावे; जे दूर, जे असाध्य तेथे मन धावे’ याला मी तरी का अपवाद ठरेन! म्हणूनच मध्य प्रदेशातील ‘बटेश्वर’ या आडगावात असणाऱया मंदिर संकुलाला भेट देण्याची ओढ आसुसून मनात आल्यावर, अनेक सायासानंतर मी तिथे पोचलेच. बटेश्वरची मंदिरे मध्य प्रदेशातील चंबळ नदीच्या खोऱयात, ग्वाल्हेरपासून साधारण 35-40 कि.मी. अंतरावर मुरैना जिह्यातील पडावली गावाजवळ आहेत. 8 ते 10 व्या शतकात, गुर्जर-प्रतिहार यांच्या कालखंडात बांधलेल्या; शिव, विष्णू आणि शक्ती यांना समर्पित, साधारण 200 वालुकाश्म (सँडस्टोन) मंदिरांचा हा विशाल समूह आहे.
नोव्हेंबर महिन्यातील एका थंड दुपारी, आजूबाजूला वस्ती नसलेल्या, पाषाणशिल्पांच्या या अलिबाबाच्या गुहेत मी मनात अनामिक धडधड घेऊन शिरले. समोरच हारीने उभ्या असलेल्या सुबक, ठेंगण्या मंदिरांचे लावण्य नजरेत सामावून घेत मी पुढे पुढे जात होते. त्यानंतर मात्र माझ्या दृष्टिक्षेपात जे आले, ते पाहिल्यावर भोवळल्यासारखे होऊन तिथल्याच एका खांबाचा मी आधार घेतला.
माझ्यासमोर अक्षरशः शेकडो मंदिरांचा खच पडलेला होता. इतस्ततः विखुरलेले, कलाकुसर केलेले फुटके खांब, अस्ताव्यस्त पडलेल्या वळणदार कमानी, कळस नसलेली मंदिरे आणि आकाशाकडे नजर लावून जमिनीवर पडलेले देखणे कळस… हे सगळे जी. ए. कुलकर्णींच्या ‘रमलखुणा’ पुस्तकातील ‘इस्किलार’ कादंबरीतील बेचिराख झालेल्या ‘अर्शिपॉलिस’ नगरीची आठवण करून देणारे होते. पर्यटकांच्या गैरहजेरीमुळे भयाण शांतता तर तिथे होतीच; एक विचित्र गुढत्वही संपूर्ण परिसराला प्राप्त झाले होते. आजूबाजूच्या हिरव्या झाडींतून येणारी सोनेरी उन्हाची तिरीप त्या तांबूस पिवळसर अवशेषांना झळाळून काढत त्यांना एक वेगळेच सौंदर्य प्रदान करत होती. माझ्या मनात विचारांचा कल्लोळ उठला होता की, मी वर्तमानकाळात आहे की भूतकाळात? की आपल्या सगळय़ांचाच हा भविष्यकाळ आहे? या भग्न अवशेषांसाठी अश्रूंच्या मोत्यांची ओंजळ वाहू की दिव्यचक्षूंनी त्या अप्रतिम सौंदर्याची कल्पना करून, हर्षभरीत होऊन त्या अनाम शिल्पकारांपुढे नतमस्तक होऊ? इतके मंत्रमुग्ध करणारे ते दृश्य, तो परिसर आणि एकाकी असा तो क्षण होता. एखाद्या प्रतिभावंत कवीला त्या विचक्षण दृश्याने समर्पक काव्य सुचले असते, पण म्या पामरात इतकी प्रतिभा कुठे? त्या भग्न खांबांना मिठी मारून त्यांच्या स्वर्गीय सौंदर्याला मला पावती द्यावीशी वाटली तरी प्रत्यक्षात केवळ नजरेनेच मी त्यांना अधाशासारखे पिऊन घेतले.
भूकंपामुळे अपरिमित पडझड झाल्याने काही वर्षांपर्यंत तरी या मंदिरांचे फक्त अवशेषच अस्तित्वात होते. सरकारी अधिकारी, गावकरी किंवा प्रवासी इथे चुकूनही फिरकत नसल्याने चंबळच्या खोऱयातील दरोडेखोरांसाठी ही जागा अनायासे हक्काचे आश्रयस्थानच झाली होती. मोठमोठे नेते आणि राजकारणी त्यांच्यापुढे हतबल झाले होते. तेव्हा ‘भारतीय पुरातत्त्व खात्या’तील, ‘श्री. के. के. मुहम्मद’ नावाच्या अजब वल्लीने हिंदूंच्या या प्राचीन मंदिरांचे पुनरुत्थान करण्याचा विडा उचलला. भयंकर दबदबा असलेल्या कुख्यात दरोडेखोर निर्भयसिंग गुज्जर आणि त्याची टोळी यांना समोरासमोर लढा देण्यापेक्षा त्यांना आपल्या बाजूने वळवून घेण्यासाठी चाकोरीबद्ध मार्गांपेक्षा वेगळय़ा उपाययोजनांची गरज भासणार होती. तेव्हा श्री. मुहम्मद यांनी जिवाची पर्वा न करता, अक्षरशः दरोडेखोऱयांच्या गुहेत शिरून त्या अमोलिक ठेव्याचे महत्त्व त्यांना पटवून दिले. ‘आपले नाव गुज्जर आणि ज्या परिसरात तुम्ही राहत आहात ती मंदिरेही निर्माण केली गुर्जर राज्यकर्त्यांनी… म्हणजे तुम्ही त्यांचेच वंशज… इथले राजकुमारच तुम्ही…’, असे त्यांना गोडीगुलाबीने मनवून, त्या दरोडेखोरांचीच मदत घेऊन, श्री. मुहम्मद आणि त्यांच्या टीमने मंदिरांच्या पुनर्वसनाचे काम सुरू केले. संस्कृतचे गाढे अभ्यासक असलेल्या श्री. मुहम्मद यांनी मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी 4 थ्या शतकातील ‘मानसारा’ या शिल्पशास्त्र्ााच्या आणि 7 व्या शतकातील ‘मयमतुम’ या वास्तुशास्त्र्ााच्या हिंदू मंदिर रचनेवर आधारित ग्रंथांचा आधार घेतला. त्याला अनुभव आणि स्थापत्यशास्त्र्ााच्या ज्ञानाची जोड देऊन, तिथेच पडलेल्या दगडांचे वर्गीकरण केल्यानंतर त्यांचाच कौशल्याने वापर करून, अखंड विश्वासाचे धनी असलेल्या श्री. मुहम्मद यांनी शून्यातूनच जणू हे विश्व साकारले. एका भग्न स्वप्नाला मूर्त रूप दिले. एखादी चित्रखंड पहेलिका (जिगसॉ पझल) सोडवताना विविध लाकडी ठोकळय़ांना विशिष्ट पद्धतीने जुळवून जसे शेवटी एक अर्थपूर्ण चित्र तयार होते, त्याच्याशीच या सर्व उपक्रमाची तुलना होऊ शकते. अशाप्रकारे दरोडेखोरांव्यतिरिक्त खाण माफियांशीसुद्धा सामना करत 200 पैकी 80 मंदिरांना पुनरुज्जीवन देण्याचे श्रेय श्री. मुहम्मद आणि त्यांच्या सहकाऱयांना जाते. श्री. मुहम्मद तेव्हा म्हणाले होते, ‘बटेश्वर हे माझे तीर्थक्षेत्र आहे आणि या आसमंतात असलेला श्री शंभूंचा वावर माझ्यावर नजर ठेवून आहे असा मला नेहमी भास होतो.’ उगीच नाही त्यांना ‘टेम्पल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून नावाजले जाते! खरंच, यांच्यासारखी जात-धर्मापलीकडे विचार करणारी थोडी का होईना, ‘वेडी माणसे’ अस्तित्वात आहेत म्हणून हे जग शहाण्यासारखे चालले आहे, यात शंका नाही!
‘भुतेश्वर’ महादेव वरून या जागेच्या नावाचा ‘बटेसर’ अथवा ‘बटेश्वर’ असा अपभ्रंश झाला असावा असे म्हणतात. शिव-विष्णू मंदिरे, शिवपार्वतीचा मंगलपरिणय आणि त्याला असलेली विष्णू, ब्रह्मादि देवांची उपस्थिती; नटराज, कृष्णलीला, दशावतार, नवग्रह, सप्तमातृका; बासरी, वीणा, मृदंग वाजवणाऱया स्त्र्ााr-वादक, कामातूर जोडपी अशा विविध शिल्पांमुळे त्यावेळी शैव, वैष्णव, शाक्त पंथीय संकल्पना एकत्र नांदत होत्या असे अनुमान काढता येते. मंदिर संबंधित कला आणि कलाकार यांचे केंद्रस्थान म्हणून या जागेचा तेव्हाचा वैभवशाली ‘नजारा’ कसा असेल याची कल्पना आपल्याला निराळय़ाच विश्वात नेते! असे हे बटेश्वरचे प्राचीन संकुल माझ्या नशिबात ‘घडवून’ आणणाऱया नियतीविषयी कृतज्ञता व्यक्त करणे एवढेच माझ्या हातात राहते!





























































