ठसा – प्रा. भाऊ लोखंडे

>> महेश उपदेव

आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, पाली साहित्याचे गाढे अभ्यासक तसेच नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ. भाऊ लोखंडे यांचे नुकतेच निधन झाले. भाऊंच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीच्या आधारस्तंभाला महाराष्ट्र मुकला आहे. समतेचे सजग प्रहरी, बहुआयामी असे डॉ. भाऊ लोखंडे यांचे व्यक्तिमत्त्व होते.

डॉ. भाऊ लोखंडे यांचा जन्म 15 जून 1942 रोजी मध्य प्रदेशातील छिंदवाड़ा जिल्हय़ाच्या सौसंर तालुक्यातील संगमसावंगा येथे झाला. ते सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, रिपब्लिकन स्टुडण्ट्स फेडरेशनचे प्रणेते आणि बौद्ध व दलित साहित्याच्या चळवळीत महत्त्वाचे योगदान असलेले आंबेडकरवादी विचारवंत होते. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठामधील पदव्युत्तर पाली प्राकृत विभागाचे माजी रीडर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख होते.

त्यांनी अनेक संस्थांच्या कार्यकारिणीत विविध पदांवर काम केले आहे. ते ‘विदर्भ साहित्य संघ दलित साहित्य संमेलना’चे अध्यक्ष होते. त्यांनी ‘मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव’ या विषयावर पीएच.डी.साठीचा शोधप्रबंध लिहिला आहे. तसेच ‘रशियातील बौद्धधर्म’ हे पुस्तक लिहिले आहे. गडचिरोलीच्या महात्मा फुले, आंबेडकर विचारमंचाच्या वतीने 13 फेब्रुवारी 2015 रोजी गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित महात्मा फुले-आंबेडकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. भाऊ लोखंडे होते.

थायलंडमधील इंटरनॅशनल नेटवर्क ऑफ एंगेज्ड बुद्धिस्टच्या कार्यकारी समितीचे ते सदस्य होते. थाई भूमीमध्ये बौद्ध धर्मावरील चर्चेत जागतिक संमेलनात भाग घेतला होता. नेपाळमध्ये वर्ल्ड फेलोशिप बौद्ध कॉन्फरन्समध्ये त्यांनी बौद्ध धम्मावरील प्रबंध सादर केला होता. त्यांनी जपानला भेट दिली होती. डॉ. आंबेडकर यांच्यावर मानवाधिकार परिषदेत सादर केलेला पेपर खूप गाजला होता. ‘निकाय’ या नियतकालिकाचे ते संपादक होते

त्यांनी सामाजिक कार्य, बौद्ध व दलित साहित्याच्या चळवळीत मोठे योगदान दिले. राज्य शासनाचा दलितमित्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता पुरस्कार तसेच इतर अनेक प्रसिद्ध संस्थांचे पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत. 1970 ते 78 यादरम्यान ते मॉरिस कॉलेजमध्ये व्याख्याताही होते. आयएएस प्रशिक्षण संस्थेचे ते संचालकही होते.

15 जून 2017 रोजी वयाची 75 वर्षे पूर्ण केल्यानिमित्त डॉ. भाऊ लोखंडे अमृत महोत्सवी नागरिक सत्कार समितीच्या वतीने त्यांचा 1 जुलै 2017 रोजी सत्कार करण्यात आला होता. नागपुरात आयोजित दुसऱया अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. एप्रिल 11 व 12 रोजी साई सभागृहात संमेलन होणार होते. अनेक संस्थांच्या कार्यकारिणीत विविध पदे भूषविणाऱया डॉ. लोखंडे यांचे साहित्यातील योगदान मोठे आहे. विदर्भ साहित्य संघाच्या दलित साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ‘मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव’ हा त्यांच्या पीएच.डी. शोधप्रबंधाचा विषय होता.

अयोध्या ही बुद्धकालीन साकेत नगरी असे त्यांचे मत होते. अयोध्या कोणाची, रामाची, बाबरांची की बुद्धाची या विषयावरील संशोधन ग्रंथातून अयोध्या ही पूर्वाश्रमीची साकेतनगरी होती, असे संशोधन डॉ. लोखंडे यांनी ग्रंथातून पुढे आणले होते. यावर बरीच चर्चा झाली होती. मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव या विषयात त्यांनी पीएच,डी. घेतली होती.
भाऊंचे योगदान आणि विचार नेहमीच समाजाला नवी दिशा व प्रेरणा देत राहतील.

आपली प्रतिक्रिया द्या