दिल्ली डायरी – बिहारमधील सरकारचे ‘उत्तरायण’ सुरू

>> नीलेश कुलकर्णी 

संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते. बिहारमध्ये नितीशबाबूंच्या सरकारचे ‘उत्तरायण’ सुरू झाले आहे. बिहारमध्ये भाजप संयुक्त जनता दल आघाडीचे सरकार आहे. मात्र, आता कोणी नितीशबाबू व तेजस्वी यादव एकत्र येतील, असे भाकित करत आहेत, तर दस्तरखुद्द राबडीदेवींनीच नितीशबाबूंना महाआघाडीत येण्याचे आवतण दिले आहे. तेजस्वी यादवांनी त्याचे खंडन केले असले, तरी गोंधळात गोंधळ वाढलेला आहे. खरमासनंतर राष्ट्रीय जनता दलात फूट पडेल, अशी भविष्यवाणी भाजपचे तिथले प्रभारी भूपेंद्र यादव यांनी केली आहे. काय घडेल हे यथावकाश कळेलच, पण बिहारमधील नितीशबाबू सरकारचे उत्तरायण सुरू झाले आहे, हे नक्की.

सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना नितीशबाबू अडखळले आणि त्यांनी घेतलेली अर्धवट शपथ राज्यपालांच्या सूचनेनुसार पूर्ण करावी लागली. अर्थात बिहारच्या निकालानंतर नितीशबाबूंचे मनोधैर्य अधिक खच्ची झाले आहे. भाजपच्या सत्ताकांक्षी धोरणामुळे व मित्रपक्षालाच नख लावण्याच्या वृत्तीमुळे ‘एनडीए’ नावाचा प्रकार केवळ कागदावर उरला आहे. त्यामुळे आम्ही मित्रपक्षाला धोका देत नाहीत असा केविलवाणा प्रकार दाखविण्यासाठी भाजपने नितीशबाबूंना मुख्यमंत्रीपदाच्या बोहल्यावर चढवले खरे, मात्र पुढची वाट काटय़ांची आहे याची नितीशकुमारांना कल्पना आलेली आहे. त्यामुळेच भाजपच्या टेकूवर शेवटची इनिंग खेळण्यापेक्षा राष्ट्रीय राजकारणातील मोठय़ा पदावरून आपली राजकीय इनिंग सन्मानाने संपवावी, असा धोरणी हिशेब नितीशबाबूंचा आहे. भाजपने त्यांना उपराष्ट्रपतीपदाची ऑफर दिल्याची वदंताही आहेच, मात्र नितीशबाबूंची नजर ‘रायसीना हिल्स’वर आहे. बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री खुर्चीवर बसवायचा हा त्या पक्षाचा जुना अजेंडा आहेच. सात वेळा मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर नितीशकुमार यांची सत्तेची अभिलाषा संपलेली दिसत आहे. बिहारात भाजपचा मुख्यमंत्री या मांडवलीच्या बदल्यात त्यांच्या पदरात दिल्लीतून काय पडते, यावर पुढची गणिते अवलंबून असतील. भूपेंद्र यादवांच्या भाकितानुसार राष्ट्रीय जनता दलात उभी फूट पडून भाजपने येनकेन प्रकारेण बहुमताचा सोपान गाठला तर नितीशबाबूंचे राजकारण अडगळीत पडणार आहे. या जर तरच्या गोष्टी असल्या तरी राजकारणात कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संक्रांतीच्या सणाच्या मुहूर्तावर खुर्चीवर येऊ घातलेली संक्रांत नितीशबाबू परतवून लावतात का, सगळ्यांची तोंडे ‘गोड’ करतात का ते पाहणे मनोरंजक ठरणार आहे. यानिमित्ताने बिहारच्या राजकारणाचे उत्तरायण सुरू झाले आहे हे नक्की.

दादा गांगुलींचे ‘आजारपण’

ज्या सौरभ गांगुली यांनी मॅच फिक्सिंगनंतर मरगळलेल्या गलितगात्र झालेल्या हिंदुस्थानी क्रिकेटला लढायला, जिंकायला शिकवले ते बीसीसीआयचे अध्यक्ष असलेले माजी कर्णधार सौरभ गांगुली हृदयविकाराने आजारी पडले आणि त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र, गांगुली खरेच आजारी पडले की मानसिक दबावामुळे ताण आल्याने त्यांना ऍडमिट करावे लागले यावर संपूर्ण बंगालमध्ये चर्वितचर्वण सुरू आहे. यावेळी येनकेन प्रकारेण बंगालच्या खाडीत कमळ उमलविण्याचा दिल्लीकरांचा मनोदय आहे. त्यासाठी ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस फोडण्याचा एककलमी कार्यक्रमही सध्या जोरात आहे. फोडाफोडीमुळे ममतादीदी काहीशा धास्तावल्या असल्या, तरी त्या सहजासहजी घाबरणाऱया नाहीत. ममतादीदींना हरवायचे तर त्याच तोडीचा नेता हवा. भाजपकडे नेमकी हीच अडचण आहे. ममतादीदींच्या पासंगालाही पुरेल असा नेता नाही. त्यामुळे दिल्लीकर मंडळींनी दादा गांगुलींसाठी गेले काही महिने ‘फिल्डिंग’ लावली, मात्र क्रीझच्या बाहेर येत मैदानावर गांगुली ज्या पद्धतीने चेंडू मैदानाबाहेर भिरकवायचे तशीच भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱयाची ‘ऑफर’ धुडकावत राहिले. मात्र एकीकडे भाजपचा दबाव, दुसरीकडे ममतादीदींशी असलेले वैयक्तिक संबंध, तिसरे म्हणजे घरातूनच भाजपच्या विचारधारेला विरोध करणारी कन्या अशा तिहेरी कात्रीत सापडलेल्या लढवय्या गांगुलींना ताण असह्य झाल्याने हॉस्पिटलमध्ये जावे लागले असे सांगतात. गांगुलीची ‘राजकीय गरज’ असल्याने केंद्रातील भाजप सरकारने नेमलेले राज्यपाल धनखडही यांनीही हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची ख्यालीखुशाली विचारली. त्यावेळी राज्यपाल महोदयांनाही दादा गांगुली हे ‘फिट’ वाटले. मग गांगुली कशासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले यावर आता चर्चा सुरू आहे. ‘गांगुली हे खेळाडू म्हणून बंगालचा व देशाचा अभिमान आहेत. त्यांच्यावर राजकीय दबाव आणून राजकारणासाठी त्यांचा वापर करू नका’, अशा शब्दांत कम्युनिस्ट नेते अशोक भट्टाचार्य यांनीही भाजप व तृणमूलला सुनावले आहे.

काँग्रेसचेही ‘जय श्रीराम!’

अयोध्येतील राममंदिर उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेने निधी संकलनाचा संकल्प सोडलेला असतानाच आता काँग्रेसनेही राममंदिरासाठी निधी उभारण्यासाठी पुढाकार घेत ‘जय श्रीराम’चा नारा दिल्याने राममंदिर व हिंदुत्व म्हणजे केवळ आपलाच अजेंडा असे मानणाऱया भाजप आणि संघ परिवाराची चांगलीच गोची झाली आहे. काँग्रेसमध्ये अलीकडच्या काळात काही लक्षणीय बदल घडून आला आहे, तो म्हणजे पक्षाची बदललेली रणनीती. गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी काँगेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपले कौल दत्तात्रय गोत्र सांगत जानवे धारण करून ‘सौम्य हिंदुत्वा’चे कार्ड खेळल्यामुळे भाजपच्या चांगलेच नाकीनऊ आले होते. मध्य प्रदेशात कमलनाथांचे सरकार असताना त्यांनी हिंदूधर्मीयांसाठी अनेक चांगले निर्णय घेतले. काँगेसच्या कार्यालयात त्यांच्या कार्यकाळात जय श्रीरामचे नारे आणि हनुमान चालिसाचे पठणही झाले. मंदिरांच्या विकासासाठी कमलनाथांनी मोठे काम केले. छत्तीसगढचे काँगेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या सरकारने नुकताच दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळाने ‘जय श्रीराम’चा नारा दिला. मध्य प्रदेशात काँगेसचे नेते व माजी मंत्री पी. सी. शर्मा यांनी राममंदिर उभारणीसाठी निधीसंकलनात पुढाकार घेतला आहे. आपला निधी राममंदिर ट्रस्टच्या खात्यात जमा करा, असे आवाहन ते करत आहेत. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. काँगेसचे हे ‘जय श्रीराम’चा नारा देणे आणि सौम्य हिंदुत्वाचे कार्ड यामुळे भाजपच्या पोटात मात्र भीतीचा गोळा आला आहे. राममंदिराचा वादाचा मार्ग राजीव गांधींच्या कार्यकाळात मोकळा झाला, शिलान्यासही झाला. आता काँगेसने सौम्य हिंदुत्वाचा पंजा खांद्यावर टाकला तर भाजपची कोंडी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या