गाणारा पक्षी

247

>> विद्या कुलकर्णी

हिमालयातला एक चिमुकला पक्षी.. रुपाबरोबर गोड आवाजाचीही देणगी मिळालेली….

थोडं संवेदनशील मन, चौकस नजर व छोटय़ा-छोटय़ा गोष्टीत आनंद अनुभवण्याची वृत्ती असली, तर मग पक्षी जगतातले इतर अनेक कलाकार व त्यांची अदाकारी आपल्याला खुणावू लागते. हातात कॅमेरा घेतल्यापासून तर कधी हिमालयात तर कधी सह्याद्रीच्या कडेकपारीत पक्षी शोधत मी फिरू लागले व छंद जोपासणे हा एक छंदच जडला.

मी 2018 साली सर्व ‘महिला पक्षी फोटोग्राफर’च्या सत्काराप्रीत्यर्थ नैनिताल पक्षी उत्सवाला गेले होते. परंतु तेव्हा रुफस सिबिया या पक्ष्याचे मनासारखे दर्शन झाले नव्हते. थोडी रुखरुख मनाला होतीच. त्यामुळे या वर्षीच्या ट्रिपमध्ये या सुंदर पक्ष्याचे चांगले दर्शन घडावे, अशी मनापासून इच्छा होती. सत्तालमध्ये पहिल्याच दिवशी ती पूर्ण झाली. खरंच रॅम्पवरील आकर्षक, गोंडस, कमनीय सुपर मॉडेलची छाप या पक्ष्यामध्ये होती. त्याच्या डोक्यावरील तुऱयामुळे, त्याच्या सौंदर्यात अधिकच भर पडत होती. इकडे तिकडे स्वच्छंदपणे उडणाऱया या पक्ष्याला आम्ही सर्व जण अवाक होऊन बघत होतो, नजरेत सामावून घेत होतो! या पक्ष्याचा प्रामुख्याने लालसर तपकिरी रंग व काळ्या रंगाचे डोके मनात भरत होते.

रुफस सिबिया आणि रुफस बॅक्ड सिबिया हे पक्षी हिंदुस्थानी उपमहाद्वीपच्या उत्तरेकडील भागांमध्ये, भारत, नेपाळ, भुतान आणि व्हिएतनाममध्ये आढळतात. या पक्ष्यांचे नैसर्गिक निवासस्थान हिमालयाच्या पायथ्यापासून मध्यापर्यंत समशीतोष्ण जंगलात असते. हिवाळ्यात काही पक्षी हिमालयातील कमी उंचीच्या ठिकाणी स्थलांतर करतात. ऋतुमानाप्रमाणे व हिमालयातील उंचीप्रमाणे या पक्ष्यांच्या रंगाच्या छटांमध्ये थोडाफार फरक असतो.

रुफस सिबिया
हे पक्षी 21-24 से.मी. लांबीचे असून त्यांचे वजन 28-48 ग्रॅम्स असते. हे पक्षी अतिशय नाजूक व मोहक आहेत. त्यांची पाठ, पंख, शेपटी व खालील भाग लालसर तपकिरी रंगाचा असतो. त्यांचे डोके काळे असून त्यांच्या पंखात आणि शेपटीत निळ्या, काळ्या राखाडी रंगांच्या छटा असतात. त्यांची चोच नाजूक असून बाकदार असते. त्यांच्या डोक्यावरील तुरा थोडा पसरलेला असतो. नर व मादी सारखेच दिसतात. हे पक्षी वर्षभर अतिशय मधुर आवाजात गात असतात. प्रजननाच्या काळात ते उंच स्वरात गाताना आढळतात.

या पक्ष्यांचा प्रजननाचा काळ एप्रिल-ऑगस्टमध्ये असतो. नर व मादी मिळून घरटे बांधतात. घरटे कपाच्या आकाराचे असून ते पालापाचोळा, सुके गवत व शेवाळे वापरून घट्ट विणेचे बनवलेले असते. मादी एका वेळी 2-3 अंडी घालते.
या पक्ष्यांचे खाद्य मुख्यत्वे कीटक, किडे, बेरी व तत्सम फळे असतात. त्यांना रोडोडेंड्रॉन फुलांमधील रस आवडतो.

रुफस बॅक्ड सिबिया
हे पक्षी 18 से.मी. लांबीचे असून शेपटी फारशी लांब नसते. डोक्यावर काळी टोपी असून पाठीचा थोडा भाग काळा असतो. मानेच्या मागे पांढऱया रंगाच्या रेघा असतात. पाठ, पंख व खालील बाजू लालसर तपकिरी असून गळा-छाती-पोट पांढऱया रंगाचे असते. या पक्ष्याचे हुबेहूब वर्णन करणे अतिशय कठीण आहे. त्यांच्या पंखांवर राखाडी रंगाची छटा असल्यामुळे सूर्यप्रकाशात ते चमकतात. पाय व चोचीची खालील बाजू पिवळ्या रंगाची असते.
हे पक्षी सहसा झाडांच्या फांद्यांवर, शेवाळ्यावरती छोटय़ामोठय़ा संख्येत आढळतात.
मी पक्ष्यांची फोटोग्राफी करू लागले व माझी सौंदर्याची, कलाकुसरीची व्याख्या, मानक बदलले. एवढय़ाशा जिवामध्ये निसर्गाने किती रंग भरलेत, एकेका रंगाच्या किती विविध छटा आहेत, किती बारीक गुंतागुंतीची रचना केलेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या