पक्ष्यांना वाचवा

मकर संक्रांतीत अनेक जण पतंग उडवण्याचा आनंद घेतात. पण पक्ष्यांना मोकळय़ा आकाशाचा आनंद लुटू द्या, असे आवाहन प्राणीमित्र संस्थांनी केले आहे. दरवर्षी मकर संक्रांतीच्या वेळी पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा मांजा (काचेचा लेप असलेला धागा) वापरल्याने शेकडो पक्षी मृत्युमुखी पडतात किंवा गंभीर जखमी होतात. तसेच सणानंतर धागे सहसा चुकीच्या पद्धतीने टाकून दिले जातात, जे नंतर पक्षी घरटे बांधण्यासाठी घेऊन जातात. या प्रक्रियेत पक्षी किंवा त्यांची पिल्ले त्यांच्यात अडकतात आणि जखमी होतात, असे आंतरराष्ट्रीय प्राणी संरक्षण संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी निशा पुंजु यांनी सांगितले.

मकर संक्रांतीच्या वेळी आणि नंतरही नागरिकांनी नेहमी सावध असले पाहिजे. कारण काही वेळा पक्षी मांजात अडकतात. आमच्या हेल्पलाइन 9833480388 वर संपर्क साधून नागरिक पक्षी संकटात सापडल्यास मदतीसाठी कॉल करू शकतात आणि एकतर जखमी पक्षी आणण्यासाठी किंवा ते स्वतः पोहोचवण्यासाठी त्यांच्याशी समन्वय साधू शकतात. ते पुढे म्हणाले की, जर तो वन्य पक्षी असेल तर तुम्ही आमच्या वन विभागाच्या हेल्पलाइन 1926 वरदेखील त्याची तक्रार करू शकता.

काय कराल

– कापडाचा तुकडा घ्या, जखमी पक्ष्यावर ठेवा आणि पक्ष्याला सुरक्षितपणे पकडा.
– धागा ओढू नका किंवा झटका देऊ नका. पक्ष्यांची कोणतीही पिसे कापू नका. कारण त्यामुळे पुढील गुंतागुंत होऊ शकते.
– धागा काढल्यानंतर पक्षी पुठ्ठय़ाच्या पेटीत किंवा टोपलीमध्ये ठेवा. पेटीवर वायुवीजनासाठी छिद्र करा आणि पेटी किंवा टोपली बंद करा जेणेकरून पक्षी बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नये आणि स्वतःला इजा करू नये. भक्षकांपासून मुक्त, शांत जागेत ठेवा.
– जर तुम्ही पक्षी हाताळू शकत नसाल किंवा धागा कापू शकत नसाल तर ते फक्त एका पेटीत किंवा टोपलीत ठेवा आणि ते करण्यासाठी जवळच्या प्राणी बचाव गटाला कॉल करा.

या गोष्टी टाळा…

– विशेषतः पक्ष्यांचे खाद्य आणि घरटे बांधण्याच्या जागेजवळ पतंग उडवू नका.
– जर तुम्हाला मांजात अडकलेला पक्षी दिसला तर कृपया जवळच्या प्राणी कल्याण गटाला लवकरात लवकर कळवा.
– काच असलेला धागा किंवा चायनीज मांजा वापरू नये. जे पक्षी तसेच मानव दोघांनाही धोकादायक आहे.
– उंचावरून पक्ष्यांना वाचवण्यासाठी तुम्ही 101 डायल करून अग्निशमन दलाला कॉल करू शकता.
– सुनिष सुब्रमण्यन, संस्थापक, पॉज-मुंबई