परीक्षण – मौलिक कार्याचा मागोवा

>> राहुल गोखले [email protected]

नवस्वतंत्र भारताने विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात अग्रेसर व्हावे असा ध्यास घेऊन त्यासाठीचे पायाभूत कार्य ज्यांनी केले त्यांत डॉ. शांतिस्वरूप भटनागर हे अग्रणी होते. तरुण, आश्वासक संशोधकांना त्यांच्या नावाने पुरस्कारदेखील दिला जात असे (आता त्याचे नाव बदलले आहे). तथापि तरीही या द्रष्टय़ा शास्त्रज्ञाच्या योगदानाची, त्याच्या जीवनाची कहाणी फारशी परिचित नाही. मराठी भाषेत तर अशी तपशीलवार माहिती अजिबात उपलब्ध नव्हती. ती उणीव सुधीर फाकटकर यांनी प्रस्तुत पुस्तकातून (प्रकाशकः मनोविकास प्रकाशन) भरून काढली आहे. हे पुस्तक लिहिण्यासाठी संदर्भ जमविणे किती क्लिष्ट होते याचा उल्लेख लेखकाने प्रस्तावनेत केला आहे. त्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक लेखकाने घेतलेल्या मेहनतीचा प्रत्यय देते.

लेखकाने भटनागर यांच्या जीवनकहाणीचे कथन करताना एक निराळी शैली अवलंबली आहे. देशात त्या वेळी घडत असणाऱया राजकीय-सामाजिक स्थित्यंतराच्या कॅनव्हासवर लेखक भटनागर यांचे जीवन उलगडून दाखवितो. त्यामुळे तो काळ वाचकाच्या समोर उभा राहतो आणि भटनागर यांनी कोणत्या परिस्थितीत आपली कारकीर्द घडविली याची वाचकाला प्रकर्षाने कल्पना येते. आताच्या पाकिस्तानात असणाऱया भेरा गावात त्यांचा झालेला जन्म, लहानपणीच त्यांचे हरपलेले पितृछत्र, त्यांना घेऊन त्यांच्या आईने दिल्लीपासून जवळ असलेल्या सिकंदराबाद येथे आपल्या माहेरी जाण्याचा घेतलेला निर्णय, भटनागर यांच्या वडिलांचे मित्र रघुनाथ सहाय यांनी भटनागर यांना शिक्षणासाठी लाहोरला घेऊन जाण्याचा घेतलेला निर्णय अशा चढ-उतारांवर लेखक प्रकाशझोत टाकतो. भटनागर यांच्या विचारांचा पाया कसा रचला गेला, विज्ञानात त्यांना रुची कशी उत्पन्न झाली याकडे लेखक ओघात लक्ष वेधतो.

फोरमन ख्रिश्चन कॉलेजमध्ये झालेले शिक्षण, नंतर अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी त्यांनी केलेले प्रयाण, मात्र काही अडचणींमुळे ब्रिटनमध्येच करावे लागलेले वास्तव्य, तेथे इंपिरियल कॉलेजमध्ये घेतलेले शिक्षण, उन्हाळ्याच्या सुट्टीत फ्रान्सचा केलेला प्रवास व त्यादरम्यान मारी क्युरी यांची झालेली भेट, जर्मनीत प्रा. नेर्नस्ट यांच्या प्रयोगशाळेला दिलेली भेट अशा ठळक घटनांचा उल्लेख लेखक करतो. प्रा. नेर्नस्ट यांच्या प्रयोगशाळेला भेट दिल्यांनतर भारतात अशा प्रयोगशाळा का नाहीत असा त्यांना पडलेला प्रश्न लेखक अधोरेखित करतो. एका अर्थाने भारताच्या भवितव्याविषयीचे बीज त्याच वेळी त्यांच्या मनात कसे रुजले होते याची कल्पना वाचकाला येते. परदेशात शिकत असताना व डॉक्टरेट करत असताना कोणत्या प्राध्यापकांचा प्रभाव त्यांच्यावर पडला याचा उल्लेख लेखक करतो. डॉक्टरेटनंतर औद्योगिक संशोधन परिषदेची मिळाली शिष्यवृत्ती, मात्र बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक मदनमोहन मालवीय यांच्या आवाहनावरून भारतात येण्याचा घेतलेला निर्णय, तेथे काही काळ अध्यापन केल्यानंतर लाहोर विद्यापीठात रासायनिक प्रयोगशाळेच्या संचालकपदी झालेली नियुक्ती, तेथे हाती घेतलेले प्रामुख्याने औद्योगिक रसायनशास्त्राच्या क्षेत्रातील संशोधन प्रकल्प अशांचा उल्लेख करून लेखकाने विज्ञानाकडे पाहण्याच्या भटनागर यांच्या धारणेकडे लक्ष वेधले आहे. उसाच्या चिपाडापासून, पाचटाचा वापर करून इंधन, खत, पशुखाद्य इत्यादी उपपदार्थ त्यांनी कसे विकसित केले हे वाचून थक्क व्हायला होते.

भटनागर यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांनी विज्ञान व औद्योगिक परिषदेच्या (सीएसआयआर) संचालकपदाची स्वीकारलेली धुरा. तेथून त्यांच्या कार्याला कसे धुमारे फुटत गेले याचा आलेख लेखकाने रेखाटला आहे. आज ज्या राष्ट्रीय प्रयोगशाळा दिमाखाने उभ्या आहेत अशा रासायनिक संशोधनापासून भौतिकशास्त्र शाखेतील संशोधनपर्यंत प्रयोगशाळा 1950 च्या दशकात भटनागर यांच्या प्रभावी नेतृत्वात उभ्या राहिल्या. पाश्चात्य शास्त्रज्ञांशी संवाद साधत त्यांनी भारतातील वैज्ञानिक प्रयोगशाळांच्या उभारणीत दिलेले योगदान नमूद करतानाच तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे त्यांना कसे पाठबळ लाभले होते यावर लेखक दृष्टीक्षेप टाकतो. मोहम्मद अली जिना यांनी भटनागर यांना पाकिस्तानात येण्याचे दिलेले निमंत्रण भटनागर यांनी धुडकावून लावले हे लेखक आवर्जून सांगतो. या यशस्वी वाटचालीदरम्यान भटनागर यांच्यावर त्यांच्या पत्नीच्या निधनाचा झालेला आघात खोलवरचा होता हे लेखक नमूद करतो.

एका द्रष्टय़ा, पण काहीशा उपेक्षित राहिलेल्या शास्त्रज्ञाची ही प्रेरक अशीच कहाणी आहे. गिरीश सहस्रबुद्धे यांनी केलेले मुखपृष्ठ वेधक.

युगकर्ता शास्त्रज्ञ

डॉ. शांतिस्वरूप भटनागर

लेखक ः सुधीर फाकटकर

प्रकाशक ः मनोविकास प्रकाशन

पृष्ठे ः 180, ह मूल्य ः 225 रुपये