लेख : पुस्तक!

>>दिलीप जोशी<<

आयुष्यातलं पहिलंवहिलं हाती आलेलं पुस्तक आठवतं. हाती आलेलं म्हणजे वाचललं. साधारण उत्तर असं येईल की, अंकलिपी. यात गणिताचे आकडे (अंक) आणि भाषेचा ओनामा (ओळख) करून देणारी अक्षरलिपी असायची. आपण बालपणापासून नकळत जे बोलायला लागलो त्याचं ‘नोटेशन’ शिकून त्या ध्वनीचा ‘आकार’ समजून घ्यायचा. कारण पुढच्या जीवनात तो प्रत्यक्ष न भेटताही पत्ररूपाने उपयोगी पडणार.

‘सत्तर’ वर्षांपूर्वी माझं लग्न ठरत असताना भावी सासऱ्यांनी प्रश्न केला होता ‘‘मुलीला लिहिता, वाचता येतं का?’’ आणि माझ्या वडिलांनी अभिमानाने उत्तर दिलं होतं, ‘‘हो, येतं की! अगदी इंग्रजीसुद्धा येतं.’’ त्या काळात स्वयंपाकपाणी, भरतकाम, विणकामाचे प्रश्न विचारले जायचे. तिथे माझ्या सासरच्यांना ‘वाचनाची’ आवड होती हे पाहून मला बरं वाटलं. माझ्या वडिलांचं उत्तर ऐकून सासरेबुवा उद्गारले, ‘‘व्वा! म्हणजे खुशालीचं पत्र तरी पाठवेल… आणि आणखी वाचन करायचं असलं तर आमच्याकडचं कपाट विविध पुस्तकांनी भरलेलं आहे.’’

एक आजी एकदा हा ‘वाचनानुभव’ सांगत होत्या. पुढे त्यांनी ‘त्या’ कपाटातली सगळी पुस्तकं तर वाचलीच, पण आवडीचा विषय घेऊन पदवीसुद्धा मिळवली. ‘‘पुस्तक पाहिलं की, वाचावंसं वाटतंच. अगदी पूर्ण वाचता आलं नाही तरी तिथल्या तिथे ‘चाळून’ ते कशावर आहे याची उत्सुकता वाटते’’ असंही त्या सांगत होत्या. अशी पुस्तकाची ओढ अनेकांना असते. अनेकांच्या घरचं खासगी ग्रंथालय समृद्ध असतं. फारसा डामडोल किंवा महागडं फर्निचर नसेल, पण हॉलच्या सगळय़ा भिंती पुस्तकभरल्या कपाटांनी सजल्याची अनेक घरं पाहिलीयत.

अर्थातच ‘अनेक’ म्हटलं तरी त्यांची संख्या फारच कमी आहे. एरवी पुस्तकांच्या रचलेल्या गठ्ठय़ावर धूळ साचली तरी त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही अशी स्थिती बऱ्याच ठिकाणी दिसते. ‘आमच्याकडे वाचनाची आवड अशी नाहीच’ असं स्पष्टपणे सांगणारेही भेटतात. ‘जरा पुस्तक हाती धरलं की झोप यायला लागते’ असंही कोणी बिनदिक्कतपणे म्हणतं. त्यात प्रामाणिकपणा असेल, पण ‘वाचनाचं’ काय? आपण तर ‘वाचाल तर वाचाल’ वगैरेसारखी सुभाषितं वारंवार ऐकत असतो. मग वाचन संस्कृती वाढतेय की कमी होतेय? प्रत्येक साक्षर पिढी काही ना काही वाचतेच. आमचे एक नातेवाईक फडके, खांडेकरांच्या कादंबऱ्या म्हणजे ‘वाचन’, इतर फारसं वाचायची गरज नाही असं म्हणायचे. हे लेखक मोठेच. त्यांच्या मुलांनी मात्र त्यापलीकडे जाऊनही विविध प्रकारची पुस्तकं वाचली. ‘अमुकच वाचावं’ असं काही ठरवता किंवा लादता येत नाही. वाचनाची जाणीव वाचनातूनच समृद्ध आणि प्रगल्भ होत गेली की, तो आपोआप आपण काय वाचावं ते ठरवतो. त्यावर इतर चोखंदळ वाचकांशी चर्चा करतो. त्यातून नवी पुस्तकं ‘सापडतात’ तेव्हा त्याला सोन्याची खाण सापडल्याचा आनंद होतो.

एकेकाळी माझी आई पुस्तकं-मासिकांची ‘होम सर्क्युलेटिंग लायब्ररी’ दोन मैत्रिणींसह चालवायची. काही सभासदांच्या घरी ते गठ्ठे घेऊन जाणं आणि पुस्तक, मासिक बदलून आणणं हे काम आम्हा मुलांवर यायचं. आई-वडिलांनी सांगितलेलं काम ‘काय कटकट आहे!’ अशा आविर्भावात न स्वीकारता ‘आपल्यावर मोठय़ा माणसांसारखी काहीतरी जबाबदारी सोपवलीय’ असं समजून ते उत्साहाने करण्याचा तो काळ होता. माझे काही मित्रही त्यात मदत करायचे. बक्षीस म्हणून आम्हाला वर्षाकाठी एक छानसं पुस्तक मिळायचं. त्याचंही अप्रूप वाटायचं. वाचलेल्या पुस्तकावर आई प्रश्नं विचारायची. ते सगळं गप्पांच्या ओघात. ती नकळत शिकवणी व्हायची. आज लेख लिहिताना शब्द अडत नाहीत किंवा भाषण करताना अचूक शब्द लगेच आठवतात ही सगळी त्या ‘वाचना’ची किमया.

अगदी सुरुवातीला ‘‘आम्हा मुलांच्या हाती काही ‘बोधप्रद’ पुस्तकं आली होती. त्यातल्या एकात नक्षत्र ओळख होती. अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी… अशी नक्षत्रं पाठ करून घेतली जायची. पुढे अनेक वर्षांनी खगोल अभ्यास संस्थेत आकाशाखाली उभं राहून ही नक्षत्रं न्याहाळता ती त्याच क्रमाने उगवतात हे लक्षात आलं. त्यासाठी कुठलं ‘ऍप’ वापरावं लागलं नाही. काळाच्या ओघात मराठीबरोबर इंग्लिश वाचनही वाढलं. ‘मार्क ट्वेन’ आवडता लेखक झाला. अर्थशास्त्र्ा, राज्यशास्त्र्ा, खगोलशास्त्र्ा, जागतिक इतिहास आणि ललित साहित्य यावरची दोन्ही भाषांमधली अनेक पुस्तकं विकत घेतली. एवढंच नव्हे तर गुजराती शिकून अनेक कथा, कादंबऱ्यांचे अनुवाद करता आले. ‘मानव जीवननी भवाई’ या पन्नालाल पटेलांच्या पुस्तकावर विस्तृत लिहिलं. थोडं फ्रेंच, जर्मन आणि बंगालीही शिकण्याचा प्रयत्न केला. हिंदी सिने संगीताने उर्दू ‘शिकवलं’ तर संस्कृत आवडीने शिकलो. एक आत्मपुराण नव्हे, ललित साहित्य ते वैज्ञानिक पुस्तकं असा प्रवास ‘आर्टस्’चा विद्यार्थी असूनही थोडाफार करता आला एवढंच. यापेक्षा प्रचंड वाचन, लेखन करणारी, आत्यंतिक ओढीने स्वतःकडचं किडुकमिडुक विकूनही पुस्तकं विकत घेऊन ग्रंथालय उभारून ते निष्ठsने जतन करणारी माणसं ठाऊक आहेत. मला कागदी पुस्तकेच वाचायला आवडतात, पण ‘किंडल’वर ई-बुक वाचलं तरी चालेल, पण ‘प्रसंगी अखंडी वाचित जावे’ हा समर्थ संदेश आजच्या पुस्तक दिनीही महत्त्वाचा आहे.