लेख : मराठी माणसाचा जागतिक सांस्कृतिक सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>शिल्पा शहा<<

[email protected]

1984 मध्ये जेव्हा बृहन्महाराष्ट्र मंडळाचे पहिलेवहिले अधिवेशन झाले तेव्हा त्याला जेमतेम अडीचशे लोकांची उपस्थिती होती. मराठी साहित्य आणि सांस्कृतिक सोहळ्याचे अमेरिकेत लावलेले हे रोपटे आता चांगलेच रुजले आहे. त्याचा वेलू गगनाच्या पार झेपावत आहे. चार ते साडेचार हजार मराठी रसिक मंडळी मराठी  या अधिवेशनाला हजेरी लावतात. बृहन्महाराष्ट्र मंडळाचे एकोणीसावे अधिवेशन यंदा टेक्सास या राज्यातील डल्लास-फोर्टवर्थ येथे 11 ते 14 जुलै 2019 दरम्यान होत आहे. त्यासंबंधी डल्लास-फोर्टवर्थ

महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकारी शिल्पा शहा यांचा लेख…

‘इवलेसे रोप लावियले द्वारी,

तयाचा वेलू गेला गगनावरी!’

बृहन्महाराष्ट्र मंडळाची अमेरिकेतील अधिवेशने आणि अमेरिकेत वास्तव्यास असलेला मराठी बांधव हे गेल्या काही वर्षांत एक वेगळेच भावनिक नाते झाले आहे. 1984 मध्ये जेव्हा बृहन्महाराष्ट्र मंडळाचे पहिलेवहिले अधिवेशन झाले तेव्हा त्याला जेमतेम अडीचशे लोकांची उपस्थिती होती. अमेरिकेच्या मराठी माणसाच्या कर्मभूमीत मराठी साहित्य आणि सांस्कृतिक सोहळ्याचे लावलेले हे रोपटे नंतरच्या तीन-साडेतीन दशकांत चांगलेच रुजले आहे.  जवळजवळ चार ते साडेचार हजार मराठी रसिक मंडळी या अधिवेशनाला न चुकता हजेरी लावतात. मराठीपणाची ही ओढच सातासमुद्रापार असलेल्या मराठी माणसाला एकत्र यायला बळ देते. बृहन्महाराष्ट्र मंडळाचे यंदाचे एकोणीसावे अधिवेशन होत आहे आणि त्याच्या यजमानपदाचा मान टेक्सास राज्यातील डल्लास-फोर्टवर्थ येथील महाराष्ट्र मंडळाला  मिळाला आहे. येथील सर्व पदाधिकारी आणि 350 कार्यकर्ते अधिवेशन यशस्वी होण्यासाठी जोमात कामाला लागले आहेत, असे या अधिवेशनाचे संयोजक दिलीप राणे आणि हर्षद खाडिलकर अभिमानाने सांगतात. यंदाच्या अधिवेशनाचे एक आगळेवेगळे वैशिष्टय़ आहे. या अधिवेशनासाठी ‘सूर गुंजती अभिनवतेचे, फुलवित नाते परंपरेचे’ हे घोषवाक्य निवडण्यात आले आहे. त्यामागेही एक विशिष्ट विचार आणि धारणा आहे. मराठी परंपरेचा अभिमानही राखायचा आणि त्याचवेळी अमेरिकेत वाढणाऱ्या नव्या मराठी पिढीचे नवे विचार आणि नव्या पद्धती यांनाही योग्य वाव द्यायचा असा हा मध्यवर्ती विचार या घोषवाक्यामागे आहे. या घोषवाक्याला प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी सहजसुंदर चाल दिली आहे.

उत्तर अमेरिकेतील चार हजारांहून अधिक मराठीप्रेमी रसिक या अधिवेशनाला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. जगभरातील अन्य देशांतूनही मराठी लोक मोठय़ा उत्साहाने दर दोन वर्षांनी होणाऱ्या या अधिवेशनात सहभागी होत असतात. हिंदुस्थानातील व उत्तर अमेरिकेतील दिग्गज मराठी कलाकारांनी सादर केलेले दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम हे तर या अधिवेशनाचे वैशिष्टय़ असेलच, पण त्याचबरोबर उद्योजक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, कीर्तनकार, चित्रकार आणि छायाचित्रकार यांचेही या अधिवेशनामध्ये मोलाचे योगदान असेल. उत्तमोत्तम कलाप्रदर्शनाशिवाय मित्रमंडळींच्या आणि उद्योजकांच्या भेटीगाठी, त्यांच्या उत्पादनाचे प्रदर्शन व विक्री, विचारवंतांचे मार्गदर्शन, तरुणांसाठी स्वतंत्र व्यासपीठ, वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांचे वार्षिक प्रशिक्षण, ज्येष्ठ नागरिक मेळावा व त्यांना उपयुक्त अशा माहितीची देवाणघेवाण, ढोलताशा व लेझीमच्या तालावर शोभायात्रा असे या चार दिवसांच्या अधिवेशनाचे स्वरूप आहे.

या अधिवेशनांतर्गत प्रथमच हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाची स्पर्धा ठेवण्यात आली आहे. अमेरिकेत कित्येक विद्यार्थी शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी ही स्पर्धा म्हणजे एक पर्वणीच असेल. आपले अभिजात संगीत जपण्यासाठी अशा प्रकारचे व्यासपीठ हिंदुस्थानबाहेर उपलब्ध व्हावे या हेतूनेच आयोजकांनी ही अभिनव कल्पना राबविण्याचा निर्धार केला आहे. याव्यतिरिक्त छायाचित्र स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, ढोलताशा स्पर्धा, समूहनृत्य स्पर्धा, सारेगम, ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘वय मोठं गंमतीचं’ ही लघुलेख स्पर्धा अशा विविध स्पर्धांचेही आयोजन  करण्यात आले आहे. मराठी माणूस म्हटला की अस्सल मराठमोळे खाद्यपदार्थ असायलाच हवे. तीदेखील व्यवस्था अधिवेशनात असणार आहे. त्यामुळे डल्लास-फोर्टवर्थ येथील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन हा आकर्षक, लक्षात राहील असा सांस्कृतिक सोहळा ठरावा यासाठी आयोजक प्रयत्न करीत आहेत. अन्य काही चांगली कार्ये घडावीत या हेतूने अधिवेशनामध्ये ‘एनजीओ परिषद’ भरवण्याचाही प्रयत्न आहे. याकामी उत्तर अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेचे सहकार्य मिळत आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय उद्योगांना जाहिरातीद्वारे अमेरिकेमध्ये स्थायिक झालेल्या मराठी लोकांपर्यंत पोहोचण्याची एक उत्तम संधी आहे. प्रायोजक होऊन तसेच देणगीद्वारे उद्योजक या संमेलनात सहभागी होऊ शकतील. दर दोन वर्षांनी अमेरिकेत होणारा हा मराठी माणसाचा जागतिक सांस्कृतिक सोहळा अनुभवण्यासाठी मराठी रसिक वाट पाहत आहेत. अधिक माहितीसाठी www.bmm2019.org वर संपर्क साधावा किंवा www.facebook.com/bmm2019 किंवा [email protected] वर पाठवावी.