
>> मच्छिंद्र ऐनापुरे
विकास हवाच आहे, पण तो निसर्गाशी समरस होणारा, पर्यावरणाशी सुसंगत असावा लागतो. आपण जर या विनाशाकडे झुकणाऱ्या विकासाला वेळीच थांबवलं नाही, तर आपण आपलं भविष्य गमावू. आपण निवडायचं आहे शाश्वत विकासाचा मार्ग की अंदाधुंद विनाशाचा? निर्णय आजच घ्यावा लागेल, कारण उद्या उशीर होईल. विकास ही मानवी प्रगतीची गाथा असते, पण जेव्हा हा विकास अंदाधुंद, निसर्गविरोधी आणि निसर्गाच्या नियमांशी विसंगत असतो, तेव्हा तो विनाशाच्या दिशेने झुकतो.
विकास ही मानवी प्रगतीची गाथा असते, पण जेव्हा हा विकास अंदाधुंद, निसर्गविरोधी आणि निसर्गाच्या नियमांशी विसंगत असतो, तेव्हा तो विनाशाच्या दिशेने झुकतो. आज आपल्याला अशाच एका टोकावर उभं राहिल्यासारखं वाटत आहे, जिथे एकीकडे आधुनिक औद्योगिकीकरणाचा अभिमान आहे आणि दुसरीकडे त्याच्यामुळे उद्ध्वस्त होत चाललेलं पर्यावरण, धोक्यात आलेलं मानवी अस्तित्व.
जगभरातील शास्त्रज्ञ आता स्पष्टपणे सांगू लागले आहेत की, आपण ज्या औद्योगिक विकासाच्या मार्गावर धावत आहोत, तो केवळ समृद्धी नव्हे, तर पर्यावरणाचा ऱ्हास, जीवसृष्टीचा ऱ्हास आणि हवामानाच्या असंतुलनाकडे नेणारा मार्ग आहे. भारतातील अनेक मोठी शहरे आणि लहान गावंही वाहतुकीच्या ताणामुळे, धुराच्या जाळ्यात अडकलेली आहेत. रस्त्यांवर धूळ आणि धुराची चादर असते. अनेक ठिकाणी स्वच्छ हवा श्वास घेण्यासाठी मिळत नाही आणि पिण्याचं पाणीही दूषित आहे. शहरी जीवनाचा प्रचंड विस्तार, औद्योगिक कचरा, आणि रसायनयुक्त कीटकनाशकांनी शेतीसुद्धा धोक्यात आली आहे. त्यात भर म्हणून, जगभरात सुरू असलेल्या युद्धांनीही पर्यावरणावर दुष्परिणाम केला आहे. युद्ध केवळ मानवी जीव घेऊन जात नाही, तर पर्यावरणालाही अनंतकाळासाठी जखम करते. बॉम्बस्फोटांमुळे होणारं रासायनिक प्रदूषण, उद्ध्वस्त झालेल्या इमारतींमधून उत्सर्जित होणारे हरितगृह वायू हे सर्व मिळून पृथ्वीला श्वास घेणं अशक्य करून टाकत आहेत. आपण उभे आहोत एका अशा टप्प्यावर जिथे केवळ पर्यावरणच नव्हे, तर मानवी सभ्यतादेखील धोक्यात आली आहे.
आपल्यापैकी अनेकांना अजूनही वाटतं की, हवामान बदल म्हणजे भविष्यातली गोष्ट आहे. एक अशी गोष्ट जी आपल्याला केवळ पुस्तकांत किंवा दूरचित्रवाणीवर पाहायला मिळते. पण वास्तव याच्या अगदी उलट आहे. हवामान बदल हा आधीच सुरू झालेला आहे आणि आपलं आयुष्य, पर्यावरण आणि आरोग्य यावर तो आता परिणाम करत आहे. जगभरातील परिसंस्था याच कारणामुळे कोसळू लागल्या आहेत. सतत वाढत चाललेलं तापमान, समुद्राच्या पातळीत होणारी वाढ, पूर, दुष्काळ, गारपीट, उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढणं या सगळ्याच गोष्टी आपल्या दैनंदिन जगण्यावर थेट परिणाम करत आहेत. आपलं अन्न, पाणी, ऊर्जा, वाहतूक व्यवस्था, वन्यजीव, शेती यावर या हवामान बदलाचा खोलवर परिणाम होतो आहे.
हॅम्बुर्ग विद्यापीठातील ध्रुवीय संशोधनाचे प्रा. डर्क नाट्ज सांगतात की, आर्क्टिक प्रदेश जगभरातील सरासरीपेक्षा चारपट वेगाने गरम होत आहे. जेव्हा पृथ्वीचं तापमान सतत वाढतं, तेव्हा महासागर वितळायला लागतात. आर्क्टिक महासागरातील बर्फाचं आवरण आता वर्षानुवर्षे टिकत नाही. ग्रीनलँडमधील बर्फ झपाटय़ाने वितळतो आहे. पर्माफ्रॉस्ट म्हणजे ज्यामध्ये जमिनीखाली सतत गोठलेली माती असते ती आता निम्म्याने कमी होण्याच्या मार्गावर आहे. हे फक्त बर्फ वितळणं नाही, तर यामुळे संपूर्ण परिसंस्थेवर परिणाम होतो. यामुळे अनेक जिवांच्या निवासस्थानांवर परिणाम होतो, जैवविविधतेवर गदा येते. समुद्राची पातळी वाढते, किनारी भाग जलमय होतात. या वाढत्या पाण्यामुळे शहरं, बंदरे, रस्ते, घरे हे सर्व धोक्यात येतात.
जगातील सर्व देशांनी एकत्र येऊन पॅरिस करार केला, ज्यामध्ये ठरवलं गेलं की, पृथ्वीचं तापमान 1.5 अंश सेल्सियसच्या आत ठेवायचं. पण संशोधन सांगतंय की, जर आपण सर्व नियम पाळले, उत्सर्जन थांबवलं, तरीसुद्धा समुद्राची पातळी थांबणार नाही. ती नवनव्या टप्प्यात वाढत राहील. डरहम विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, 2100 पर्यंत मुंबईसारख्या शहरांमध्ये समुद्राची पातळी 76 सें.मी. वाढू शकते. चेन्नई, कोची, पोरबंदर, विशाखापट्टणम ही तटीय शहरे 5 ते 10 टक्के भाग जलमय होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणजे आपण केवळ हवामान बदल पाहत नाही, तर भविष्यातील स्थलांतर, बेरोजगारी, गरिबी आणि आरोग्य संकटाची सुरुवातही पाहतो आहोत.
अंटार्क्टिकामध्ये सध्या 100 पेक्षा जास्त ज्वालामुखी आहेत. त्यातील काही पृष्ठभागावर आहेत, काही बर्फाच्या थराखाली. संगणक सिम्युलेशनमधून समोर आलंय की, जर बर्फाचं आवरण आणखी वितळलं तर या दडलेल्या ज्वालामुखींना जाग येऊ शकते. त्यांच्या स्फोटांचा परिणाम केवळ अंटार्क्टिकापुरता मर्यादित नसेल, तर तो जागतिक पातळीवर होऊ शकतो. यामुळे वातावरणात अधिक प्रदूषण, अधिक ग्रीनहाऊस वायू आणि निसर्गाचा अजून मोठा ऱ्हास होईल. इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ प्लायमथच्या संशोधनानुसार, पृथ्वीवरील सागरी क्षेत्रांपैकी 21 टक्के भाग पूर्ण अंधारात गेला आहे. समुद्राचा एक भाग असा असतो जिथपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचतो. हा प्रकाश म्हणजे समुद्री वनस्पतींचं अन्न, सृष्टीचं संतुलन आणि ऑक्सिजन निर्माणाचं स्रोत. पण गेल्या दोन दशकांत नऊ टक्के समुद्री क्षेत्राने 50 मीटरपेक्षा जास्त खोलीत प्रकाश गमावला आहे. आणि 2.6 टक्के क्षेत्राने 100 मीटरच्या आत अंधार स्वीकारला आहे. हे अंधाराचे सावट आर्क्टिक, उत्तरी समुद्र आणि हवामान-संवेदनशील क्षेत्रांमध्ये अधिक गंभीर आहे. जैवविविधतेचा असमतोल हे मानवाच्या अन्नसाखळीवर आणि उपजीविकेवर थेट परिणाम करणारे संकट आहे. या साऱ्या काळ्याकुट्ट चित्रामध्ये एक आशेचा किरणही आहे. तज्ञांचं मत आहे की, जर आपण आता गंभीर होऊन कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचा प्रयत्न केला, तर सर्वात वाईट परिणाम टाळता येतील. यासाठी केवळ नियम नव्हे, तर आचरणात बदल आवश्यक आहे. अक्षय ऊर्जा – जसे सौर, पवन आणि जैविक ऊर्जा यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. या क्षेत्रात गुंतवणूक केल्यास रोजगार वाढतील, नव्या तंत्रज्ञानाचा विकास होईल आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. उत्सर्जन कमी झाल्यास केवळ पर्यावरण नव्हे, तर मानवी आरोग्यालाही फायदा होतो. जगभरात अस्थमा, फुप्फुसांचे विकार, हृदयरोग यांसारख्या आजारांचं प्रमाण कमी होईल. आरोग्याच्या खर्चात अब्जावधी डॉलर्सची बचत होईल आणि अनगिनत लोकांचे प्राण वाचतील. विकास हवाच आहे, पण तो निसर्गाशी समरस होणारा, पर्यावरणाशी सुसंगत असावा लागतो. आपण जर या विनाशाकडे झुकणाऱ्या विकासाला वेळीच थांबवलं नाही, तर आपण आपलं भविष्य गमावू. आपण निवडायचं आहे शाश्वत विकासाचा मार्ग की अंदाधुंद विनाशाचा? निर्णय आजच घ्यावा लागेल, कारण उद्या उशीर होईल.