
>> स्पायडरमॅन
जगात अनेक लोकप्रिय खेळ आहेत. क्रिकेट, फुटबॉल यांच्या जोडीला आता लोक इतरही अनेक खेळांचा आनंद टीव्हीच्या माध्यमातून घेत असतात. बुद्धिबळ हा त्यापैकी एक लोकप्रिय खेळ. बुद्धिबळाचेदेखील अनेक चाहते आहेत आणि प्रत्यक्ष तो खेळणारेदेखील करोडो लोक आहेत. हा खेळ किती अवघड आणि विविध चालींनी भरलेला आहे हे त्यांना चांगलेच माहीत आहे. मात्र आपण जो बुद्धिबळ खेळ खेळतो किंवा बघतो, तो चौकोनी पटावर आखलेल्या 64 चौकोनांत आणि लाकडी किंवा प्लॅस्टिकच्या हत्ती, उंट आणि प्याद्यांनी खेळला जातो. मात्र इटलीच्या Parita a Scacchi या उत्सवात या खेळाला चक्क जिवंत माणसे आणि प्राणी यांच्या मदतीने खेळले जाते.
दर दोन वर्षांनी सप्टेंबरच्या दुसऱया आठवडय़ात हा खेळ साजरा केला जातो. या उत्सवाला खूप जुनी परंपरा आहे. असे सांगतात की, व्हेनिस शहराच्या मोरोस्टिका भागात Renaldo d Anganaro आणि Vieri da Vallanora नावाचे दोन लेखक राहत होते. गंमत म्हणजे दोघांचे तिथल्या स्थानिक गव्हर्नरच्या लिओनारा या मुलीवर प्रेम बसले. आता हा तिढा सोडवायचा कसा? त्या काळी दोन लोकांमधील कोणताही वाद सोडवण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा आयोजित केली जात असे. त्यानुसार मग गव्हर्नरने दोघांमध्ये बुद्धिबळाची स्पर्धा आयोजित केली. विशेष म्हणजे जो या स्पर्धेत हरेल, त्याला गव्हर्नरची दुसरी मुलगी ऑर्लेंडो हिच्याशी लग्न करावे लागेल अशी अटदेखील घालण्यात आली होती.
लोक मोठय़ा संख्येने ही स्पर्धा बघण्यासाठी उपस्थित झाले होते. या प्रतिस्पर्धेत रंगत यावी यासाठी गव्हर्नरने खास पायदळ सैन्य, हत्ती, घोडे आणि उंट यांची नेमणूक खेळासाठी केली. जोडीला नृत्य, संगीत आणि आतषबाजीदेखील आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नक्की कोण जिंकले हे मात्र अजून अज्ञात आहे. कारण लोकांची यावर मतभिन्नता आहे. मात्र ही स्पर्धा पुढे उत्सव बनली आणि त्या दिवसापासून दर दोन वर्षांनी हा उत्सव जुन्या काळाप्रमाणेच साजरा केला जाऊ लागला.





























































