मुद्दा – अपहरणकर्त्यांची दहशत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मोक्षदा घाणेकर

गेल्या काही महिन्यांत मुंबईतून मुले-मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. मुला-मुलींचे बेपत्ता होण्यामागे प्रामुख्याने दोन कारणे सांगितली जातात. यापैकी एक म्हणजे मुला-मुलींचे अपहरण होणे आणि दुसरे म्हणजे कौटुंबिक कारणामुळे किंवा निराशेमुळे मुलांनी घर सोडून निघून जाणे. जून 2025 पासून मुलांच्या अपहरणाच्या प्रकरणांची मुंबई पोलिसांत नोंद होण्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. अपहरण झालेल्या किंवा घर सोडून निघून गेलेल्या प्रकरणांत मुलांना शोधण्यात पोलिसांना 98 टक्के यश आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असले तरी पालकांमध्ये मागील 6 महिन्यात अपहरणकर्त्यांविषयी मोठया प्रमाणात दहशत पसरली आहे. ही दहशत दूर करण्याचे आव्हान आज मुंबई पोलिसांपुढे आहे. दोन दिवसांत मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत 12 मुलांचे अपहरण झाल्याची तकार नोंदवण्यात आली आहे. या 12 मुलांमध्ये 8 अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. मुंबईतील शिवाजी नगरमधून 4, ओशिवरा भागातून 1, साकीनाका परिसरातून 2, मानखुर्द, बांगूर नगर आणि घाटकोपर येथून प्रत्येकी एक मूल बेपत्ता झाले आहे. जून ते 6 डिसेंबर 2025 या कालावधीत मुंबईतून एकूण 145 मुले बेपत्ता झाली आहेत, ज्यामध्ये 93 मुलींचा समावेश आहे. डिसेंबर 2025 प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार जानेवारी ते ऑक्टोबर 2025 या दहा महिन्यांच्या कालावधीत मुंबईतून 1187 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलीसदरबारी करण्यात आली आहे. याचाच अर्थ मुंबईतून दिवसाला 4 ते 5 अल्पवयीन मुली गायब होत आहेत. मुंबईतील गर्द वस्तीच्या झोपडपट्टय़ा, बाजार, रेल्वे स्थानक, बस डेपो, रहदारीचे रस्ते, शाळा परिसर अपहरणकर्त्यांच्या टार्गेटवर असून अशा ठिकाणी लहान मुलांना सावज केले जाते. मुलांचे अपहरण करून खंडणीसाठी त्यांच्या पालकांना फोन केल्याची नोंद नसल्याने या सर्वांमागे मानवी तस्करी हे एक कारण असू शकते असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. बेपत्ता होणाऱयांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहे. लहान मुलांचे अपहरण करून त्यांच्यासोबत काय काय केले जाते याबाबतची सविस्तर माहिती ‘स्लमडॉग मिलिनिअर’सारखे चित्रपट किंवा ‘क्राईम पेट्रोल’सारख्या मालिकांमधून पालकांना अवगत असल्याने सध्या पालकांमध्ये कमालीची दहशत आहे. अपहरणाच्या वाढत्या प्रकरणामुळे अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना स्कूल बसमधून शाळेत पाठवणे बंद केले असून मुलांना शाळेत सोडायला आणि आणायला स्वतः जायला सुरुवात केली आहे. काहींनी त्यासाठी परिचयातील माणसे नेमली आहेत. मुलांना खेळायला बाहेर जायला मनाई केली जात आहे. बाहेर एकटे दुकटे फिरण्यासही मुलांना मज्जाव करण्यात येत आहे. मुलांना खेळायला बाहेर सोडताना पालकही त्यांच्यासोबत जाऊ लागले आहेत. शालेय सहलींना अनेक पालकांनी आपल्या मुलांना यंदा पाठवलेले नाही. अन्य मित्रमंडळींसोबत मुलांना बाहेर सोडल्यावरही आपले बाळ केव्हा परतते याकडे पालक डोळे लावून बसलेले असतात. अपहरण केलेल्या बहुतांश मुला-मुलींना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले असले तरी अपहरणाची प्रकरणे कमी न होता उलट वाढलेली आहेत. त्यामुळे बालकांमधील भीतीही तितकीच वाढलेली आहे. आजतागायत अपहरण झालेल्या आणि सापडलेल्या मुलांच्या प्रकरणांत मुलांनी अटक केलेले अपहरणकर्ते, मुंबई पोलिसांचे शहरभर पसरलेले खबऱयांचे जाळे, गुप्तहेर तसेच अन्य सोर्स यांच्या मदतीने अपहरणकर्त्यांचे नेटवर्क एव्हाना उद्ध्वस्त व्हायला हवे होते; मात्र तसे झालेले नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये, विशेषतः लहान मुलांच्या पालकांमध्ये अपहरणकर्त्यांविषयीचे भय दिवसागणिक वाढत आहे. अल्पवयीन मुलामुलींच्या अपहरणाची प्रकरणे आता नवी मुंबई, ठाणे, भिवंडी परिसरातही घडू लागली आहेत. लहान मुलांच्या अपहरणाचे हे भय वेळीच दूर केले नाही तर अपहरणकर्त्यांचे धाडस आणखी वाढून ते अन्य जिह्यांतही आपले सावज शोधू लागतील. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मुंबईसह आजूबाजूच्या शहरांत कार्यरत झालेल्या अपहरणकर्त्यांच्या टोळय़ा गजाआड कराव्यात.