
>> दिव्या नेरुरकर–सौदागर
बाल लैंगिक शोषण (Child Sexual Abuse) ही लहान मुलामुलींच्या आयुष्यातली अशी दुर्दैवी घटना असते, ज्याच्यातून मानसिकरीत्या बाहेर पडणं हे त्यांच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक असतं. बालमनावर झालेले हे ओरखडे शारीरिक पातळीवर जितके वेदनादायी असतात, तितकेच (त्याहूनही जास्त) मानसिक पातळीवर असतात. कारण असे आघात हे बऱ्याचदा ओळखीच्या माणसांकडून होतात. त्यामुळे अशी शोषित मुलं ही दुसऱ्या माणसांवर तसंच भविष्यातही नातेसंबंधांवर विश्वास गमावून बसतात.
अंजना (नाव बदलले आहे)…. एक गृहिणी.. स्वतःला आलेल्या ‘नैराश्य’ आणि ‘रागावर अनियंत्रण’ या दोन कारणांमुळे समुपदेशनासाठी नियमितपणे येत होती. तिच्या घरची परिस्थिती सधन म्हणता येईल अशी होती. तिला अडीच वर्षांची मुलगीही होती. अंजनाचे पती एका खासगी कंपनीत वरच्या हुद्दय़ावर कामाला होते. असा त्यांचा कुटुंबाचा त्रिकोण होता.
तरीही अंजनाला तिच्या रागावर काही केल्या नियंत्रण ठेवता येत नव्हते. जरा काही खुट् झालं की, तिची चिडचिड सुरू व्हायची; जी नवऱ्यावर तसंच मुलीवरही निघायची. मुलीच्या बाबतीत तिचं वागणं हे अतिसंरक्षक (Overprotective) होतं. त्यामुळे अंजना मुलीबाबतीत नको तितकी कठोर होती. जसं रागाच्या बाबतीत तसंच नैराश्याच्या बाबतीतही होत होतं. काही महिन्यांपासून हे अति व्हायला लागलं होतं. तिच्या अशा या वागण्यामुळे तिच्या मुलीवरही नकारात्मक परिणाम व्हायला लागला. अंजना हे सर्व सांगत होती तेव्हा तिच्यासमोर मुलीला तिच्या आजी-आजोबांकडे काही दिवस राहू देण्याचा पर्याय ठेवण्यात आला.
हा पर्याय ठेवला मात्र… अचानक तिने जोरात ‘‘नाही, मी कधीही माझ्या मुलीला माझ्या बाबांजवळ ठेवणार नाही’’ म्हणून रडायलाच सुरुवात केली. अंजनाचे हे वाक्य बरंच काही सांगून जाणारे होते. तिला आलेले नैराश्य आणि राग यांचे परस्परावलंबन तसेच तिला लागलेली ड्रिंक्सची सवय या सगळ्याचा उगमस्रोतही लक्षात यायला लागला. थोडक्यात सांगायचं झालं तर अंजना बाल लैंगिक शोषणाची बळी ठरलेली होती आणि हे शोषण तिच्या वडिलांकडून होत आलेले होते. तिने जेव्हा हा त्रास तिच्या आईच्या कानावर घातला होता तेव्हा आईने ‘समाज समजून घेणार नाही’ या गैरसमजापोटी तिला सहन करण्याचा आणि शक्यतो बाबांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला होता.
साहजिकच, यातून सुटका व्हावी या हेतूने अंजनाला उशिरापर्यंत घराबाहेर राहावं लागत होतं. मित्रमंडळींबरोबर ती बाहेर भटकत राहायची. घरी जाणं हे तिच्यासाठी शिक्षेसारखं असायचं. कारण तिचे वडील वासनेच्या आहारी इतके गेले होते की, एक-दोनवेळा ती झोपेत असतानाही तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता.
कुमारवयीन अंजनाला हे सहन होत नव्हतं. तिला बाबांवर पराकोटीचा राग होताच. मात्र आई हे सगळं बघून न कळल्यासारखी वागते याची तिला जास्त चीड होती. या सर्वांचा परिणाम असा झाला की, तिने या सगळ्यावर उपाय म्हणून ड्रिंक्सचा मार्ग अवलंबला. अंजनाने योग्य वेळी आणि योग्य वयात एका समजूतदार मुलासोबत संसार थाटला, पण चांगली नोकरी ती अजूनही करत नव्हती. तिच्यातला आत्मविश्वास हा हरवला होता. मूल झाल्यानंतरही ती तिच्या आईकडे राहिली नव्हती. आता असं झालं होतं की, तिला एक चांगली आई बनायचं होतं… तिच्या मुलीसाठी, पण भूतकाळ तिला त्रास देत होता.
अंजनाला आता भूतकाळासकट स्वतःला सावरायला शिकवणं हे समुपदेशनातील आव्हान होतं. तिलाही पुढे जायचं होतं; पण काही गोष्टी तिचं मन स्वीकारत नव्हतं. बरोबरच होतं तिचं! खूपच दुखावली गेली होती ती आणि तिच्यापुढे आव्हान असं होतं की, वार्धक्याकडे झुकलेल्या तिच्या आईवडिलांची जबाबदारीही तिला घरातली मोठी मुलगी म्हणून पार पाडायची होती. त्यासाठी तिला आईवडिलांना माफ करायचं होतं.
तिच्या समुपदेशनाच्या सत्रांमध्ये या सर्व गोष्टींवर भर दिला गेला. अंजनाने स्वतःला असलेली ‘मला माझी लाज वाटते’ ही भावना आणि सारखा येणारा ‘मला मरावंसं वाटतंय’ हा विचार जाण्यासाठी भरपूर प्रामाणिक प्रयत्न केले. आईवडिलांना माफ करण्याआधी स्वतःला माफ केलं, स्वतःला स्वीकारलं – स्वतःच्या भूतकाळासकट! मग पुढच्या गोष्टी सहज होत गेल्या. आज अंजना तिच्या आईवडिलांची व्यवस्थित काळजी घेतेय. नवीन व्यवसाय तिने सुरू केलाय, ज्यात ती बिझी झालीय. या सगळ्यात तिला तिच्या नवऱ्याची अबोल साथ आणि संमती आहे.
बाल लैंगिक शोषण (Child Sexual Abuse) ही लहान मुलामुलींच्या आयुष्यातली अशी दुर्दैवी घटना असते, ज्याच्यातून मानसिकरीत्या बाहेर पडणं हे त्यांच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक असतं. बालमनावर झालेले हे ओरखडे शारीरिक पातळीवर जितके वेदनादायी असतात, तितकेच (त्याहूनही जास्त) मानसिक पातळीवर असतात. कारण असे आघात हे बऱ्याचदा ओळखीच्या माणसांकडून होतात. त्यामुळे अशी शोषित मुलं ही दुसऱ्या माणसांवर तसंच भविष्यातही नातेसंबंधांवर विश्वास गमावून बसतात.
मुलांचं शोषण होत असेल किंवा हा आघात होऊन गेला असेल तर मुलं ही अशाब्दिक (Non-verbal) असे संकेत देतात. जसे की;
- माणसांना घाबरणे आणि टाळणे
- चिडचिडेपणा किंवा गंभीर होणे
- अभ्यासात दुर्लक्ष
- एकटे राहणे
- सारखे झोपून राहणे
- कधी कधी रात्री अचानक वाईट स्वप्नातून जागे होणे
- अन्नावरची वासना उडणे
- अमली पदार्थांच्या आहारी जाणे
- आत्महत्येसारखा विचार येणे किंवा प्रयत्न
यापैकी कुठलेही संकेत हे मुलांमध्ये दिसत असतील तर पहिल्याप्रथम त्यांना विश्वासात घेतले पाहिजे. तसेच त्यांची भीती घालवली पाहिजे. त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करून मोकळं होऊ दिलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना धीर देत ‘ही तुझी चुकी नाही किंवा तू चुकीचा /चुकीची नाहीस. मी तुझ्यासोबत कायम आहे’ हे ठसवलं पाहिजे. तरच मुलांना आपण हा आघात पचवायला खंबीर करू शकतो. महत्त्वाचे हे की बऱ्याचदा अशा प्रकारच्या केसेसमध्ये मानसोपचारांबरोबरच कायदेशीर मार्गांचासुद्धा आधार घ्यावा लागतो.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)


























































