मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार

आपल्या डोळय़ासमोर आपली पिल्ले बघता बघता मोठी होतात हे कळतच नाही. कालपर्यंत रांगणारी आपली मुले आपल्या खांद्याला येतात आणि तेव्हा आपल्यातला पालकाला कळतं की आपली बाळं आता मोठी झाली आहेत. आणि ही मोठी झालेली मुले आता प्राथमिक शिक्षणातून आता उच्च शिक्षणाच्या अंगणात प्रवेश करणार आहेत.

 खरं सांगा, जेव्हा आपली मुले आपल्याकडे येतील व उच्च शिक्षण घेण्यासाठी आपली इच्छा प्रदर्शित करतील तेव्हा त्यांना तुम्हाला काय सांगायला आवडेल? बेटा, तू लहानाचा मोठा कधी झालास हे मला कळलंच नाही. त्यामुळे तुझ्या उच्च शिक्षणासाठी माझी बचत करायची राहून गेली. त्यामुळे तू आता जे रुटीन शिक्षण आहे तेच कर. की तुम्हाला असं सांगायला आवडेल, बेटा, तुझ्या शिक्षणासाठी येणाऱ्या खर्चाचा अंदाज मला होताच. त्यामुळे मी दरमहिना बचत करत होतो. त्यामुळे तुला आवडेल ते शिक्षण तू नक्की घेऊ शकतोस. काय सांगायला आवडेल?

शिक्षणाच्या महागाईचा आपल्याला अंदाजच येत नाही. इतक्या झपाटय़ानं शिक्षणातली महागाई वाढलीय.   इंजिनीअरिंगचं शिक्षण गेल्या पंधरा वर्षांपूर्वी चार वर्षांच्या कोर्ससाठी 2 लाखांत व्हायचं, आता त्याच शिक्षणासाठी 20 लाख मोजायला लागतात. मेडिकल 10 लाखांत व्हायचं तेच आता 40 ते 50 लाखांपर्यंत पोहचलंय.

विदेशातल्या उच्च शिक्षणाची गोष्टच वेगळी आहे. अगदी 5 ते 10 लाखांतला विषय आता कोटीच्या घरात पोहोचलाय. एका वर्षाच्या विदेशातील कोर्स फी साधारण 30 लाख. महिन्याचा राहण्याचा व खाण्यापिण्याचा खर्च पकडला तरीही 1 लाख होतो. म्हणजेच एका वर्षाचा कोर्स जातो 42 लाखांवर. हाच जर दोन वर्षांचा कोर्स असेल तर सरळ 84 लाख आणि काही कोर्सची फी 50 लाखांच्यावरदेखील असतो.

ही उच्च शिक्षणाची इंगळी अति दारुण. चावण्याआधीच उपाय ठेवा करून, पण चावली तर उतारा तो काय?

  • एज्युकेशनल लोन? म्हणजे ईएमआयचे चक्र पुन्हा चालू. आईबाबांना रिटायरमेंटचे वेध लागलेले असताना त्यांनी पुन्हा या कर्जाच्या चक्रात पडावं किंवा मुलांनी ते कर्जाचं ओझं स्वतःवर घेऊन आयुष्याची सुरुवात कर्जावर करावी?
  • याबाबत मुले पाळण्यात असताना जे पालक जागरुक होतील,  ते मात्र या शैक्षणिक कर्जाच्या दृष्टचक्रातून वाचू शकतात किंवा मुलाला जन्म द्यायच्या अगोदर ज्या भावी पालकांनी पुढची शिक्षणाची गरज ओळखून बचतीला सुरुवात केली असेल ते मुलांच्या उच्च शिक्षणाच्या वेळी एकदम निश्चिंत असतील.
  • वेळीच मुलांच्या शिक्षणासाठी जर बचतीला सुरुवात केली तर त्यांच्या उच्च आणि अति शिक्षणासाठी आपली स्वतःची पुंजी तयार असेल. त्यामुळे एक तर कर्जाची गरज लागणार नाही किंवा कमी प्रमाणात कर्ज लागेल. कधी तर मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या रिटायरमेंटसाठी बाजूला काढलेले पैसे खर्च करायला लागतात व स्वतःचं पुढील आयुष्य अधांतरी राहतं.
  • त्यामुळे एकच सांगणं, जागे व्हा व उच्च शिक्षणाच्या उपाययोजना चालू करा. विमा पॉलिसी, म्युच्युअल फंड, शेअर्स, पीपीएफ, जीवन सुकन्या योजना, प्रॉपर्टी या सर्वांचं सुरेख मिश्रण करून आपल्या मुलांचे स्वप्न आपण नक्कीच पूर्ण करू शकता.