लेख – बालक, पालक आणि बालदिन

>> प्रसाद सदाशिव कुळकर्णी

आजची पिढी निश्चितच हुशार आहे, त्यांची आकलनशक्ती अफाट आहे. मात्र त्यांनी कोणत्या गोष्टींचे आकलन करावे आणि कोणत्या गोष्टी सोडून द्याव्यात, याचे तारतम्य त्यांना येण्यासाठी योग्य ती समज त्यांच्यात निर्माण व्हायला हवी. ती जबाबदारी पालकांची आहे. आजच्या बालदिनी पालकांनी त्या गोष्टीचा विचार करायला हवा. काwतुक करताना, मुलांचे हट्ट पुरवताना त्यांच्यावर आपल्या सुसंस्कारीत वागणुकीमधून संस्कार करत त्यांच्या आयुष्याची घडण सुंदर करणं गरजेचं आहे.   आपल्या कर्तृत्वाने आपल्या राष्ट्राला प्रगतीपथावर नेणारी पिढी घडवायची असेल तर त्याची सुरुवात करायला हवी. आजच्या बालदिनी याचा विचार करण्याची गरज आह़े

बालदिन हा एक खास बालकांसाठी विशेष दिवस म्हणून जगभर वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिफारशीवरून 20 नोव्हेंबर हा ‘जागतिक बालदिन’ अनेक देशांत साजरा होतो. भारतात भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन (14 नोव्हेंबर) हा बालदिन म्हणून साजरा केला जातो.

बालदिनानिमित्त बालकांच्या गरजा व हक्क यांबाबत देशातील पालकांमध्ये जाणीव जागृती निर्माण केली जाते. कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटल्याप्रमाणे ‘जवाहरलाल म्हणजे ऋतुराज’. हा ‘ऋतुराज’ मुलामुलींमध्ये खुलवून त्यांचे जीवन आनंदी बनविण्याचा प्रयत्न केला जातो. मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होण्यासाठी अशा दीपस्तंभाची गरज असते.

आज नको त्या वयात नको ते गुन्हे बालकांकडून घडत आहेत. त्यांची मने ‘कोडगी’ बनल्यामुळे भावनिक बुद्धिमत्ता कमी झाली आहे, याची पालकांना जाणीव राहिलेली नाही. बाल गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. याचे कारण आपणच त्यांच्यावर संस्कार करायला कमी पडत आहोत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढते प्रमाण, प्रादेशिक भाषेतील शाळांमधील घटती विद्यार्थी संख्या आणि शाळा चालवण्यामागचा व्यापारी दृष्टिकोन या गोष्टीही मुलांच्या अयोग्य जडणघडणीला कारणीभूत आहेत.

आज मुलाचं वाचन कमी झालंय किंवा मुलं वाचतच नाहीत. ‘वाचाल तर वाचाल’ याचा अर्थ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. मोबाईलच्या अधीन ही पिढी होत चाललीय अशी हाकाटी सर्वत्र सुरू असते, परंतु याला सर्वस्वी फक्त ही पिढीच जबाबदार आहे का? तर माझ्या मते नाही. आज मुलांच्याही आणि बऱयाचशा त्यांच्या पालकांच्याही आवडी, अग्रक्रम बदलले आहेत. आपल्या मुलांना वाचन संस्पृतीचे धडे देण्यात पालक आणि काही प्रमाणात शाळाही कमी पडतायत. मुलांचा अभ्यासक्रमच इतक्या गोष्टींनी भरलेला असतो की, त्यामधून डोके वर काढून अवांतर वाचनासाठी त्यांना वेळच मिळत नाही आणि मिळालाच तर त्यासाठी त्यांना कुणी प्रोत्साहितही करत नाही.

लहानपणापासूनच मुलांना भेटीदाखल काय दिलं जातं? तर बॅटरीवर चालणारी महागडी खेळणी, व्हिडीओ गेम, धडधडणाऱ्या खेळातल्या बंदुका, पिस्तूल. या व्हिडीओ गेममध्ये तर बुद्धीला चालना मिळण्यासारखा भाग तर अजिबात नसतो. हातात बंदूक घेऊन स्क्रीनवर दिसणाऱ्या प्रतिमांना धाड धाड उडवत पुढच्या स्टेजला जात राहायचं आणि मी चौथ्या किंवा दहाव्या स्टेजला पोहोचलो हे कौतुक एकमेकांना सांगायचं. सर्जनशील, बुद्धीची गरज लागणारे खेळ म्हणा, गेम म्हणा आपल्याकडे बनवले जात नाहीत आणि असलेच तर फार थोडे पालक याचा शोध घेऊन ते आपल्या मुलांना आणून देतात, त्यांच्या बरोबर बसून त्यांचं कुतूहल वाढवतात, रस वाढवतात.

आज त्यांचे आई-वडील दोघंही दिवसभर घराबाहेर असतात आणि आपल्या पाल्याशी संपर्क साधायला (वेळ मिळालाच तर) मोबाईलशिवाय पर्याय नसतो. बरं तो फक्त संपर्क साधण्यापुरता नसतो, तर अत्यंत आधुनिक दर्जाचा मोबाईल त्याच्या हातात दिलेला असतो. आजची पिढी निश्चितच हुशार आहे, त्यांची आकलनशक्ती अफाट आहे. मात्र त्यांनी कोणत्या गोष्टींचे आकलन करावे आणि कोणत्या गोष्टी सोडून द्याव्यात, याचे तारतम्य त्यांना येण्यासाठी योग्य ती समज त्यांच्यात निर्माण व्हायला हवी. ती जबाबदारी पालकांची आहे. आजच्या बालदिनी पालकांनी त्या गोष्टीचा विचार करायला हवा.

आज अक्षरशः प्रत्येक क्षेत्र आपल्या हुशारीने, बुद्धिमत्तेने काबीज करणाऱया स्त्रियांनी, मग ते शिक्षण, क्रीडा, कला, संशोधन, साहस, संरक्षण किंवा आणखी कोणतेही असो, प्रत्येक क्षेत्रात आपला ठसठशीत ठसा उमटवला आहे याचीही जाणीव मुलांना लहानपणापासून पालकांनी करून द्यायला हवी. कोणतंही कामं लहान नसतं. घरातलं प्रत्येक काम हे मुलगा, मुलगी या दोघांनाही यायला हवं हे त्यांच्या मनावर बिंबवणं गरजेचं आहे. तरच पुढे जाऊन पुरुषप्रधान संस्पृती, स्त्री स्वातंत्र्य या गोष्टी संपुष्टात येतील. कारण त्या वेळी स्त्री-पुरुष दोघंही समान पातळीवर राहून एकमेकांना समजून घेत असतील.

आपल्या मुलांच्या जन्मदिनी एखाद्या मोठय़ा हॉटेलमध्ये किंवा वातानुपूलित हॉलमध्ये भरपूर पैसा खर्च करून, महागडा केक कापून, त्यांना महागडय़ा भेटी देऊन आणि आपल्या आप्तमित्रांसह पार्टीच्या नावाखाली प्रचंड उधळपट्टी करण्यापेक्षा आपल्या पाल्याला या भेटींसोबत काही पुस्तकंही द्या. येणाऱ्या त्याच्या मित्रांना रिटर्न गिफ्ट म्हणूनही एखादं पुस्तक द्या. यासाठी त्यांच्या आई-वडिलांनाही यामध्ये सामील करून घ्या. सुरुवातीला मुलं नापं मुरडतील, पण पुढे कदाचित काही चांगलं, सकारात्मक हाती लागू शकेल. हे सगळं आज आम्हाला पटत नाही, रुचत नाही आणि पुढे मुलं मोठी झाल्यावर आपण त्यांच्याच नावाने शंख करत सुटतो. त्या वेळी हा विचारही मनात येत नाही की, कुठेतरी या सगळ्याला आपणही जबाबदार आहोत. काwतुक करताना, मुलांचे हट्ट पुरवताना त्यांच्यावर आपल्या सुसंस्कारीत वागणुकीमधून संस्कार करत त्यांच्या आयुष्याची घडण सुंदर करणं गरजेचं आहे.

शाळा म्हणजे मुलांना अभ्यासामध्ये गुंतवून ठेवणारे आणि गुणांच्या चढाओढीत पुरघोडी करायला लावून शाळेचा टीआरपी वाढवणारे कारखाने झाले आहेत. 90 टक्के, 95 टक्के, 98 टक्के, 99 टक्के गुण मिळवणारी मशीन आम्ही तयार करतोय. मुले-मुली मानेवर जू ठेवून अभ्यास करत आपलं शिक्षण पूर्ण करतात. पुढे मोठ्या पॅकेजच्या नोकऱया मिळवून एखाद्या यंत्रमानवासारखी कामे करीत राहतात. आत्मकेंद्रित होऊन आपल्यापुरताच विचार करतात. शिक्षणासोबत सामाजिक भान ठेवणारी, समाजात घडणाऱया चांगल्या व वाईट गोष्टींवर प्रतिक्रिया देणारी आणि आपल्या कर्तृत्वाने आपल्या राष्ट्राला प्रगतीपथावर नेणारी पिढी घडवायची असेल तर त्याची सुरुवात करायला हवी. आजच्या बालदिनी याचा विचार करण्याची गरज आह़े