लेख – संगणकीय अंतरिक्षात ड्रगनचे फूत्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> कर्नल अभय बा. पटवर्धन (निवृत्त)

हिंदुस्थानकडे असलेली संगणकीय बुद्धिमत्ता आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षमता पाहता संगणकीय युद्धात आपण आणखी खूप प्रगत होणे खरे तर अपेक्षित आहे. निदान आता तरी वेळीच पावले उचलण्याची वेळ आहे. देशात संगणकीय घुसखोरी तर होणारच. कारण ते टळू न शकणारे वास्तव आहे. मात्र अशी घुसखोरी झाल्यावर आपण काय, कधी, कोणती ऍक्शन घेतो हा खरा मुद्दा आहे. हॅकर्सना हॅक करण्याची क्षमता निर्माण करून चीनविरुद्ध प्रतिबंधित उपाययोजना आखून ती अमलात आणणे ही काळाची गरज आहे.

अमेरिकेच्या ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने 28 फेब्रुवारी 2021 ला ‘चायनीज हॅकर एंटायटी (संगणकीय घुसखोर जमात) हॅज पेनिट्रेटेड इंडियन पावर ग्रीड ऍट मल्टिपल लोड डिस्पॅच पॉइंट्स. द मालवेअर (संगणकीय विषाणू) हॅज गॉन इनटू कंट्रोल सिस्टम्स दॅट मॅनेज इलेक्टिक सप्लाय ऍक्रॉस इंडिया अलाँग विथ ए हाय व्होल्टेज ट्रान्समिशन सबस्टेशन ऍण्ड ए कोल फायर्ड पॉवर प्लॅन्ट’ या ‘रेकॉर्डेड फ्युचर’ नामक प्रायव्हेट इंटलिजन्स एजन्सीच्या हवाल्याने दिलेल्या सनसनाटी व धक्कादायक बातमीमुळे देशात प्रचंड खळबळ माजली. देशातील पाचपैकी चार रिजनल लोड डिस्पॅच सेंटर्स आणि दोन स्टेट लोड डिस्पॅच सेंटर्समध्ये चिनी रेड एको हॅकर ग्रुपने ही संगणकीय घुसखोरी केली. मे 2020 मध्ये लडाखमधे घुसखोरी केलेल्या ड्रगनने 2021 मध्ये हिंदुस्थानच्या संगणकीय अंतरिक्षात विषारी फूत्कार मारणे सुरू केले आहे.

रेकॉर्डेड फ्युचर कंपनीला इंडियन पॉवर सिस्टममध्ये जाण्याची परवानगी न मिळाल्यामुळे घुसखोरांच्या सांकेतिक लिपीचे (चायनीज हॅकर कोड) परीक्षण करता आले नाही. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीअंतर्गत कार्यरत असलेल्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमला (सर्टइन) पाठवलेल्या रेकॉर्डेड फ्युचरच्या अहवालानुसार या कारवाईत चीनने हिंदुस्थानी स्ट्रटेजिक पॉवर डिस्ट्रिब्युशन सिस्टीममधे घुसवलेल्या एकूण मालवेअरपैकी (संगणकीय विषाणू) केवळ 20 टक्केच मालवेअर वापरले आहे.

कुठलेही संगणकीय प्रतिबंध धोरण कधीही दोषरहित (फुलप्रूफ) नसते. संगणकीय आक्रमण होईल आणि प्रतिबंध धोरणांना ध्वस्तही करेल हे वास्तव आहे. जर अमेरिका याला तोंड देते आहे तर हिंदुस्थानचीही यातून सुटका नाही, पण ही घुसखोरी केव्हा झाली, त्यामुळे किती नुकसान झालं/व्हायची आशंका आहे, आपली स्थितिव्यापक यंत्रणा त्याला तोंड देऊ शकेल का, हा हल्ला परतवून पूर्वपदावर यायला किती वेळ लागेल याची जाणीव जर वेळेवर झाली तर मात्र कमीत कमी नुकसान झेलावे लागण्याची शक्यता वृद्धिंगत होत जाते/होते. शाश्वत संगणकीय प्रणाल्यांमधला हा प्रच्छन्न संगणकीय विषाणू (कोव्हर्ट बॅकग्राऊंड मालवेअर), संसाधनांच्या कायदेशीर संगणकीय आज्ञावलीमध्ये (लेगीट सॉफ्टवेअर) गुप्त राहून हॅकरच्या आज्ञेनुसार संगणकीय प्रणालीवर आघात/वार किंवा तेथील विदा (डेटा) चोरी किंवा तेथे अन्य प्रकारचे घातक विषाणू घुसवू शकतो. रेकॉर्डेड फ्युचरचा अहवाल प्रसिद्ध झाल्यावर हिंदुस्थानी प्रसारमाध्यमे आणि विपक्षांनी सरकारला धारेवर धरले आहे.

एका बातमीनुसार फेब्रुवारी 21मध्ये संरक्षण आणि विदेश विभागातील कार्यरत आणि निवृत्त वरिष्ठ अधिकाऱयांना संगणकीय घुसखोरीचा (कॉम्प्युटर फिशिंग) सामना करावा लागला होता. त्यातून अनेक गुप्त ई-मेल आयडी चीनच्या हाती लागले होते. हिंदुस्थानातील सायबर पीस फाउंैडेशनचे अध्यक्ष विनीत कुमार यांच्या म्हणण्यानुसार हे फिशिंग हल्ले चीनच्या गुआंगडोंग व हेनान क्षेत्रातील फँग शाओ क्विंग या हॅकर ग्रुपने केले होते.

30 राष्ट्रांच्या नॅशनल सायबर पॉवर इंडेक्समधे अमेरिका पहिला, चीन दुसरा आणि हिंदुस्थान एकविसावा आहे. संगणकीय घुसखोरीत चीन सर्वांचा बाप आहे. राष्ट्रीय संगणकीय हेरगिरीबरोबरच चिनी हॅकर्सनी प्रत्येक फॉर्च्यून 500 कंपनी, अमेरिकन- युरोपियन रिसर्च लॅबोरेटरी आणि त्यांच्या थिंक टँक्समधून एफ35/ग्रिपेन जेट डिझाईन, गुगल कोड, अमेरिकन- युरोपियन स्मार्ट ग्रीड प्लॅन्स, कोकाकोलाचे फॉर्म्युले आणि बेंजामिन मूर पेन्ट्ससारख्यांच्या फॉर्म्युल्यांची अनेक अब्जावधी डॉलर्सची विदा चोरी (पिल्फरिंग इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी) केली आहे. जर चिनी हॅकर्स अतिशय कठीण अंतरिक्ष संगणकीय सुरक्षा प्रणाली असलेल्या अमेरिकेच्या पेंटागॉनमध्ये घुसू शकतात तर ते प्रत्येक हिंदुस्थानी संगणकीय संसाधनाच्या आत घुसून तेथे घातक संगणकीय विषाणू टाकू शकतात असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही. ही अनाठायी अतिशयोक्ती नसून वास्तव आहे.

सप्टेंबर 2019 मध्ये उत्तर कोरियाच्या हॅकर्सनी तामीळनाडूमधील कुंडनकुलम आण्विक प्रकल्पावर केलेला संगणकीय हल्ला पुढे येणाऱया धोक्याची चुणूक होती. हा हल्ला विफल केला गेला असला तरी त्याची पूर्वसूचना हिंदुस्थानी एजन्सींच्या शोध उपक्रमातून मिळाली की रेकॉर्डेड फ्युचरकडून मिळालेल्या माहितीमुळे हे त्यांना कळले हे आजही स्पष्ट झालेले नाही. उत्तर कोरियाचे हॅकर्स आपल्या सर्वात मोठय़ा आण्विक प्रकल्पावर सफल संगणकीय हल्ला करू शकतात, तर असे हल्ले करणे हे राष्ट्रीय धोरण असणारी चीनची ‘मिनिस्ट्री ऑफ सिक्युरिटी’ किती मोठी संगणकीय हानी करू शकते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. रेकॉर्डेड फ्युचर या एजन्सीनुसार रेड एको चक्र ग्रुप आणि पीपल्स लिबरेशन आर्मी यांच्यातील अभद्र सांगडीमुळे हिंदुस्थानची झोप उडायला हवी. जर रेड एको हॅकर ग्रुपने हिंदुस्थानी संगणक क्षेत्रात सफल घुसखोरी करून संगणकीय विषाणू पेरणी केली आहे तर भविष्यात पीपल्स लिबरेशन आर्मी त्या विषाणूंच्या माध्यमातून योग्य वेळकाळ पाहून आपल्या संरक्षण संगणकीय प्रणालीवर असे हल्ले करून ऐनवेळी ती ध्वस्त करेल यात शंकाच नाही. हिंदुस्थान सरकारने अशा घटनांची त्वरित चौकशी करून जनतेला सद्यस्थिती अवगत करणे अपेक्षित आहे. अन्यथा सूत्रांचा हवाला देऊन पराचा कावळा बनवणारी प्रसारमाध्यमे आणि तथाकथित संरक्षण तज्ञांना सनसनाटी बातम्या देण्याची मुभा मिळते. ऑक्टोबरमध्ये मुंबईत झालेल्या पॉवर फेल्युअरचा हाच मुद्दा झाला आहे.

हिंदुस्थानकडे असलेली संगणकीय बुद्धिमत्ता आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षमता पाहता संगणकीय युद्धात आपण आणखी खूप प्रगत होणे खरे तर अपेक्षित आहे. निदान आता तरी वेळीच पावले उचलण्याची वेळ आहे. सरकारने डिफेन्स सायबर एजन्सी आणि डिफेन्स स्पेस एजन्सी स्थापन करण्यासंबंधी पहिले पाऊल उचलले आहे खरे, पण ते प्रत्यक्षात येऊन सायबर ऍण्ड स्पेस कमांड केव्हा उभी राहील, याबद्दल संरक्षण तज्ञ साशंक आहेत. वेगाने पुढे झेपावणाऱया संगणकीय क्षेत्रातील उणिवा लवकरात लवकर भरून काढल्या पाहिजेत. प्रत्येक संगणकीय घुसखोरीची चिरफाड करून त्यावर प्रतिबंधित उपाय शोधलेच पाहिजेत. हिंदुस्थानी संगणक क्षेत्र सुरक्षित हाती आहे याची जनतेला जाणीव करून देणे हे सरकारचेच कर्तव्य आहे. देशात संगणकीय घुसखोरी तर होणारच. कारण ते टळू न शकणारे वास्तव आहे. मात्र अशी घुसखोरी झाल्यावर आपण काय, कधी, कोणती ऍक्शन घेतो हा खरा मुद्दा आहे. हॅकर्सना हॅक करण्याची क्षमता निर्माण करून चीनविरुद्ध प्रतिबंधित उपाययोजना आखून ती अमलात आणणे ही काळाची गरज आहे.