
>>दिलीप जोशी<<
आज कोजागरी पौर्णिमा. कृषी संस्कृतीच्या आपल्या देशात आश्विन पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. कोजागरी, नवान्न पौर्णिमा यातून उदंड पीकपाणी असल्याचा उत्साह व्यक्त केला जातो. गेल्या काही वर्षांत बदलत्या जागतिक हवामानाने हे पारंपरिक ठोकताळे कोलमडायला लागलेत. या वर्षीही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अनेक भागांत दुष्काळाची समस्या भेडसावत आहे. पाणीप्रश्न योग्य रीतीने सोडवता आला तर एखाद्या वर्षी पाऊस कमी झाला तरी दुष्काळ पडणार नाही याची तजवीज करता येईल, परंतु वर्षानुवर्षे चर्चा करूनही त्यावर ठोस उपाय सापडलेला नाही. भविष्यात तो सापडेल आणि खऱ्या अर्थाने नवान्न पौर्णिमा साजरी करता येईल अशी अपेक्षा ठेवूया.
कोजागरीच्या पारंपरिक कथेत देवता विचारतात, ‘‘को जागर्ति?’’ (म्हणजे कोण जागं आहे?). या रात्री जागृत असणाऱ्याची भरभराट होते असं कथांमधून सांगितलं जातं. त्यातला काव्यात्मक भाव लक्षात घेतला तर पावसाळय़ानंतरचा पहिलाच पूर्णचंद्र न्याहाळायला मिळणार याचं अप्रूप असतं. आधीच्या चार महिन्यांतल्या पौर्णिमा ढगाआड दडलेल्या असतात. म्हणून त्या काळात दिव्यांची किंवा पिठोरी अशा अमावस्यांचे सण होतात. जनजीवनाशी निगडित अशाच या कालसुसंगत गोष्टी. आजच्या जगात ‘‘को जागर्ति?’’ हा प्रश्न केव्हाही विचारला तर अर्धेअधिक जग कायम जागेच असते. म्हणजे पृथ्वीच्या ज्या भागात रात्र असते तिथेही नाईट लाइफ किंवा आऊटसोर्सिंगची कामं अथवा फेसबुक, ऍपवरून तासन्तास चॅटिंग या कारणांनी बरीचशी तरुणाई जागत असते आणि वृद्धांची झोप मुळातच कमी झालेली असते. गेल्या दीडदोनशे वर्षांत यंत्रयुग अवतरल्यापासून ‘लवकर निजे, लवकर जागे होई’ या संकल्पना मोडीत निघतायत. कामाच्या वेळा रात्रीचा दिवस करीत असल्याने काळ-वेळेचे तंत्रच बदललंय.
विजेच्या दिव्यांनी अवघी पृथ्वी व्यापली आहे. हिमाच्छादित भाग किंवा महासागरांचा मध्यभाग सोडला तर गुडूप अंधाराची रात्र आता जगात क्वचितच कुठे अनुभवाला येईल किंवा त्यासाठी दूर डोंगरात जंगल भागात जावं लागेल. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी आम्ही रात्री तारे पाहायला आकाशदर्शनासाठी ज्या गावात जायचो तिथल्या दाट अंधारामुळे आपली आकाशगंगा अवकाशात स्पष्ट दिसायची. आता ती प्रकाश प्रदूषणात हरवली आहे. त्यातच आता चिनी संशोधकांनी चीनमधल्या दोनतीन शहरांच्या डोक्यावर रात्रभर प्रकाशत राहतील असे कृत्रिम चंद्र निर्माण करण्याची तयारी चालवली आहे. त्यामुळे त्या शहरात रोज रात्रीच पौर्णिमा होत असणार की काय? असा प्रश्न पडतो. हे कृत्रिम चंद्र म्हणते तीन कृत्रिम उपग्रहांना बसवलेले प्रचंड परावर्तक (रिफ्लेक्टर) असतील. पृथ्वीपासून 500 किलोमीटर अंतरावरून फिरणाऱ्या या कृत्रिम चंद्राचा प्रकाश ठराविक शहरांत रात्रीचा प्रकाश पाडेल आणि विजेची प्रचंड बचत होईल. या कृत्रिम चंद्राचा प्रकाश पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशाच्या चारपट दिसेल असंही सांगितलं जातं.
हे नेमके कसं साध्य केलं जाणार आहे त्याची साद्यंत माहिती मिळाली नाही, पण ठराविक अंतरावरून पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहालासुद्धा दिवसाबरोबर रात्र अनुभवावी लागतेच. अर्थात याची दिवस-रात्र नव्वद किंवा काही मिनिटांची असते. ठराविक शहरावरच उजेड पाडायचा तर ते रिफ्लेक्टर क्षितिजाआड गेलेल्या सूर्याचा प्रकाश ग्रहण करण्याच्या उंचीवर असले पाहिजेत आणि तरीही केव्हातरी सूर्य पृथ्वीच्या पूर्णपणे दुसऱ्या बाजूला जाईल (म्हणजे पृथ्वी फिरेल) तेव्हा काय करणार? शिवाय 500 किलोमीटर अंतरावरून प्रकाशाचे परावर्तन करून पौर्णिमा निर्माण करायला केवढे मोठे परावर्तक लागतील? खरा पूर्णचंद्र सूर्याचा परावर्तित प्रकाश चांदण्याच्या रूपाने आपल्यापर्यंत पोहोचवतो. कारण तो पृथ्वीपासून 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतरावर आहे आणि त्याचा व्यास सुमारे साडेतीन हजार किलोमीटर एवढा प्रचंड आहे. त्यामुळे त्यावरील परावर्तित सूर्यप्रकाश (आबिडो) तेजस्वी दिसतो. नेहमीच्या वावरण्यासाठी पृथ्वीवर तो नक्कीच रात्रीच्या वेळी उपयुक्त ठरतो. शिवाय परावर्तित प्रकाश असल्याने तो सौम्यही असतो. म्हणून तर पौर्णिमेच्या चांदण्याचा आनंद रात्रभर अनुभवता येतो.
कृत्रिम चंद्राची रोजची पौर्णिमा यशस्वी झाली तर काही शहरं रात्री उजळतील. मात्र रशियाने पूर्वी केलेला असाच प्रयोग फसल्याचं म्हटलं जातं. उद्या असे प्रयोग यशस्वी होऊन जगभरची प्रत्येक रात्र कृत्रिम चांदण्यांची झाली तर खऱ्या पौर्णिमेची मजाच हरवून जाईल. त्याचबरोबर नैसर्गिक नाईट व्हिजन असलेले वाघासारखे अनेक वन्य जीव आणि रातकिडे, काजवे अशा कीटकांना चकवा देणारी ही गोष्ट असेल. आजच समुद्राकाठच्या खाजणात थव्याने दिसणारे काजवे कांदळवनं सोडून गेलेत याला कारण शहरांच्या उजळलेल्या रात्री. सतत प्रकाशात वावरण्याचे अनेक तोटे पुढे जाणवू लागतील.
प्रगतीसाठी माणसाला विजेची, कमी खर्चाच्या रात्रीच्या प्रकाशाची गरज आहे हे मान्य, पण नैसर्गिक जैविक चक्राचा विचारही केला गेला पाहिजे. निसर्गावर मात करणे हे माणसाचं उद्दिष्ट नसावं. निसर्गाची साथ देऊन साधता येईल ती खरी सर्वांगीण प्रगती. चिनी संशोधकांनी याचाही विचार केला असेलच. मात्र उद्या जगभरच्या आकाशात कृत्रिम चंद्राचं ‘पूर्णबिंब’ रोज चमकायला लागलं तरी दर्याला उधाण आणणाऱ्या खऱ्या चंद्राच्या अष्टमी, पौर्णिमेचं महत्त्व कमी होणार नाही. 20 ऑक्टोबरला जागतिक चंद्र निरीक्षण दिवस साजरा झाला तो खऱ्या चंद्रासाठीच आणि आजची कोजागरी साजरी करायची तीही कलेकलेने कमी-अधिक होणाऱ्या मनोहारी चंद्राचीच!























































