
>> डॉ. पुष्कर शिकारखाने
सिगारेटचं व्यसन. न कळत्या वयात उगाच एखाद्या थ्रिलच्या अवास्तव कल्पनेतून… चुकीच्या संगतीतून जडते… ते खुपदा आयुष्यभर पुरते. पण योग्य दिशेने प्रयत्न केले तर हे घातक व्यसन सुटू शकते…
सिगारेट ओढल्यानंतर ती ओढणाऱ्या माणसाला एक किक लागते. त्याला अचानक अतिशय आनंदाची भावना निर्माण होते. शांती मिळते आणि त्यांची एकाग्रता काही काळापुरती वाढते, पण ही काही अवस्था काळापुरतीच आहे. त्यानंतर त्याचे रूपांतर अस्वस्थतेमध्ये होते. ही स्थिती घालवण्यासाठी ती व्यक्ती परत सिगारेट ओढते. याच रीतीने माणूस व्यसनाधीन होतो. व्यक्तीला त्याच्या पहिल्या 100 सिगारेट ओढण्यातच त्याचं त्यावर अवलंबून राहणं ठरतं.
या व्यसनाचा सर्वात मोठा दुष्परिणाम होतो तो रक्तवाहिन्यांचा आजार… तंबाखूच्या जोडीला सिगारेटच्या धुरामध्ये इतरही अनेक घटक असतात. तेही माणसाच्या शरीराला हानीकारक असतात. म्हणजेच त्यात टार हे द्रव्य असते. म्हणजे डांबर. त्याने शरीराला नुकसान होते. सिगारेटमुळे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज. स्वरयंत्राचा, तोंडाचा, अन्ननलिकेचा, किडणीचा कर्करोग सिगारेट ओढल्यानेच होत असतो, हे लक्षात घ्यायला हवे.
जीवनशैली सुधारा…
समतोल आहार घ्या. हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध आणि प्रथिनेयुक्त आहाराचा समावेश जेवणात असू द्या. वेळेवर झोपणे आणि वेळेवर उठणे फार महत्त्वाचे आहे. व्यायामाची सवयच लावून घ्या. नेहमी मनात सकारात्मक विचार ठेवा. नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका. ते विचार कटाक्षाने दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. मन सिगारेटकडे ओढले जात असेल तर मधूर संगीत ऐका. आपल्यावर प्रेम करणाऱ्या, आपल्याला समजून घेणाऱ्या व्यक्तीसोबत राहा. अशी जीवनशैली ठेवाल तर आपोआपच सिगारेटसारख्या जीवघेण्या सवयीपासून दूर राहाता येईल. प्राण्यांचे निरपेक्ष प्रेम आपल्यातील सकारात्मकता वाढवते.
अचानक सोडल्यास…
सिगारेट अचानक सोडली तर त्रास होऊ शकतो. त्याला निकोटीन किड्रॉकल सिंड्रोम म्हणतात. यात प्रचंड भूक लागणं, खूप गोंधळल्यासारखी स्थिती निर्माण होणं, अस्वस्थता वाटणं असे प्रकार होतात. ही लक्षणं तिसऱ्या दिवसानंतर वाढते. पण दोन ते तीन आठवडय़ांत सिगारेटची सवय पूर्णपणे सुटते. अशावेळी मनाची ताकद बळकट ठेवणं आवश्यक असतं. हृदयविकाराचा किंवा अर्धांगवायूसारखा मोठा आजार झाला असेल तर डॉक्टर सिगारेट सोडायला सांगतात. अशावेळी जगण्याच्या इच्छेमुळे माणूस मनावर ताबा ठेवतो. सवय सोडताना कमी त्रास व्हावा यासाठी डॉक्टर औषधेही देतात.
अशी लागते सवय…
- सिगारेटची सवय बहुधा शाळा वा कॉलेजमध्ये लागते. कुणीतरी मित्र सिगारेट ओढणारा असतो. तो मित्र आपल्यासोबत इतर मुलांनाही खेचण्याचा प्रयत्न करतो.
- आपल्याला थ्रिल मिळते ते मित्रानेही अनुभवावे असं त्याला वाटतं. मुलांमध्येही मग आपण काहीतरी पराक्रम करतोय अशी भावना होते.
- सिगारेट बनवणाऱ्या कंपन्यांवर कितीही बंदी घातली तरी ते वेगवेगळ्या प्रकारे आपल्या सिगारेटची जाहिरात करतच असतात.
- सिनेमात नायक सिगारेट ओढणारा दिसतो. त्याचे चाहते त्याची स्टाईल मारण्यासाठी सिगारेट ओढतात.
- स्टेटस सिम्बॉल म्हणूनही तरुण सिगारेट ओढू लागतात. मुलीही आपण किती मॉडर्न आहोत हे भासवण्यासाठी सिगारेट ओढतात. विशेषतः कॉर्पेरेट क्षेत्रातल्या तरुणी मुद्दाम ही सवय जवळ करतात.
हे व्यसन सोडवण्यासाठी…
- अलीकडे सिनेमा, मालिकांमध्ये एक तर सिगारेट ओढताना दाखवत नाहीत किंवा दाखवावेच लागले, तर हे धोकादायक असल्याचा इशारा ठळकपणे दिला जातो.
- समाजसुधारक आणि समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या लोकांनी तरुणांना या घातक सवयीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
- डॉक्टरांनीही जेथे जेथे त्यांच्या संपर्कात कोणतेही रुग्ण येतील त्यांना सिगारेटच्या सवयीपासून परावृत्त करण्याचाच प्रयत्न करायला हवा. मशेरी वापरणाऱ्या स्त्रियांनाही त्याचे धोके समजावून दिले पाहिजेत.
- तरुणांनी आठवडय़ातील काही दिवस निवडायचे. त्या दिवशी कितीही वाटलं तरी सिगारेट ओढायची नाही हा निश्चयच करायचा.
- सिगारेट ओढणे जीवघेणे ठरते, हे शाळेतील शिक्षकांनी मुलांच्या मनावर ठसवायला हवे. डॉक्टरांना शाळेत बोलावून मुलांना मार्गदर्शन करावे.
- आईवडिलांनी स्वतःच या सवयीपासून दूर राहून मुलांसमोर आदर्श घालून द्यायला पाहिजे. मुलांना आनंद मिळवण्याचे दुसरे चांगले मार्ग आईबाबांनी दाखवावेत.
लेखक जनरल फिजिशियन आहेत.





























































