वातावरणातील बदल आणि शेखचिल्लीची कुऱ्हाड

>> डॉ. प्रदीप आवटे, dr.pradip.awate@gmail.com

मनुष्यबळाची कमतरता, अपुरा आर्थिक पाठिंबा आणि व्यवस्थापकीय कमतरता यामुळे त्रस्त सार्वजनिक आरोग्यासाठी वातावरणातील बदलाचे शिवधनुष्य मोठे आव्हानात्मक आहे. आपण त्या हिरव्यागर्द फांदीवर बसलेल्या शेखचिल्लीच्या हातातील ती धारदार कुऱहाड लवकरात लवकर काढून घेतली पाहिजे, तरच ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे’ हे आपण पुन्हा एकदा मोकळ्या मनाने आणि खुल्या आवाजात गाऊ शकू!

‘झाडं आपली फुप्फुसं आहेत आणि नद्या आपलं रक्ताभिसरण. अवतीभवती पसरलेली हवा श्वास आहे आपली आणि ही पृथ्वीच आहे आपलं शरीर’ हे सारंच किती काव्यात्म वाटतं ना, पण ही कविता असली तरी ती रोमॅण्टिक नव्हे तर वास्तववादी कविता आहे. ती आपल्याला कळत नाही ही गोष्ट वेगळी आणि म्हणूनच आपण या पृथ्वीवर असे काही राहतो आहोत की, जणू काही हा ग्रह उरलाच नाही, तर जाण्यासाठी, जीव तगून धरण्यासाठी आपल्याकडे जणू दुसरं प्लॅनेट तयारच आहे.

वातावरणात वेगाने होत असलेले बदल आणि आपले मतिमंदत्व पाहिले तर झाडाच्या ज्या फांदीवर आपण बसलो आहोत त्याच फांदीवर कुऱहाडीचे घाव घालणाऱया वेडय़ा शेखचिल्लीची आठवण आल्याशिवाय राहत नाहीत. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे, नुकतीच इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च या संस्थेत वातावरणातील बदलाच्या पार्श्वभूमीवर सक्षम आरोग्य व्यवस्था कशी निर्माण करावी यासंदर्भात एक कार्यशाळा पार पडली. वातावरणात होणाऱया बदलांकडे आपण समाज म्हणून आणि नियोजक म्हणूनही अधिक गांभीर्याने पाहण्याची निकड या कार्यशाळेने स्पष्ट केली.
आपल्याकडे वातावरणासंदर्भातील अगदी शंभर वर्षांहूनही अधिक काळाची माहिती उपलब्ध आहे. या माहितीचे विश्लेषण केले असता अलीकडील काळात वातावरणात जे ठळक बदल होत आहेत, त्याची आपल्याला कल्पना येते. अगदी हिंदुस्थानपुरते बोलायचे झाले तर काही ठळक बदल असे सांगता येतील.

मागील काही काळापासून हिवाळा सौम्य होत चालला आहे, मात्र उष्णतेचा प्रभाव वाढत चालला आहे. मान्सूननंतरचा उष्णतेचा काळदेखील वाढताना दिसतो आहे. वाढ तसेच 45 डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक तापमान असणारे वर्षातील एकूण दिवसही वाढत आहेत आणि उष्णतेच्या लाटेत येणारा भौगोलिक प्रदेशही वाढत चालला आहे. एकूण पाऊसकाळ कमी होत चालला आहे, पण एकाच दिवशी अतिवृष्टी होण्याचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे ध्रुव प्रदेशातील बर्फ वितळते आहे आणि सागराची पातळी वाढते आहे. महत्त्वाचे म्हणजे जमिनीतील आर्द्रता कमी होत आहे. वातावरणासंबंधातील या बदलाचा परिणाम अपरिहार्यपणे मानवी आरोग्यावर होणार आहे, नव्हे होतोच आहे.

आरोग्यावर होणारा परिणाम
सौम्य हिवाळा आणि वाढते तापमान यांचा परिणाम सूक्ष्म जीवांच्या वाढीवर होतो. या बदलामुळे काही सूक्ष्म जीवांसाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. उष्णतेच्या लाटेमुळे हृदयरोग आणि श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ होऊन त्यामुळे होणाऱया मृत्यूंमध्ये वाढ होते आहे.

वातावरणातील बदलामुळे नैसर्गिक आपत्तीच्या संख्येमध्ये वाढ होते आहे. अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, उष्णतेची लाट अशा आपत्तींमुळे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात हे सांगायला कोणा तज्ञाची आवश्यकता नाही. मुळात वातावरणातील बदलाला कारणीभूत आहे पेट्रोलियम पदार्थांचा इंधन म्हणून अतिवापर आणि त्यातून उत्पन्न होणाऱया हरित वायूंनी उष्णता ट्रप केल्याने पृथ्वीचे वाढणारे तापमान. या वाढत्या तापमानासोबतच वाढते वायुप्रदूषण आणि त्यामुळे उद्भवणारे आरोग्याचे प्रश्न हाही मोठय़ा चिंतेचा विषय आहे. पहिल्या जगातील मंडळी या सगळ्याकडे किती गांभीर्याने पाहतात हे समजून घ्यायला एक उदाहरण पुरेसे आहे. काही वर्षांपूर्वी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा हे हिंदुस्थान भेटीवर आले होते. तेव्हा ते दोन- तीन दिवस दिल्लीत राहिले. त्यानंतर दिल्लीसारख्या अत्यंत प्रदूषित शहरात एवढा काळ वास्तव्य केल्याने ओबामा यांचे आयुष्य किती तासांनी कमी झाले याचा शास्त्रशुद्ध अभ्यास तिकडच्या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता. दिल्लीत येणाऱया पाहुण्याचे हे हाल असतील तर जे दिल्लीतच राहतात त्यांच्या आरोग्याचे काय होत असेल याचा विचार केलेलाच बरा. हवेसोबत पाणीही प्रदूषित होते आहे. ‘राम तेरी गंगा मैली हो गयी’ हे तर राज कपूरसारखा सिनेमावाला माणूसही सांगून गेला. त्यामुळे जलजन्य आजारांच्या संख्येत वाढ होत आहे. पाऊस, तापमान आणि आर्द्रता यांच्यातील बदल डासांच्या वाढीसाठी पोषक ठरल्याने मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारात वाढ होत आहे. हे आजार पूर्वी समस्या नसलेल्या प्रदेशात प्रवेश करत आहेत. पावसाची कमतरता/ अतिवृष्टी तसेच जमिनीची हरवलेली ओल याचा विपरीत परिणाम झाल्याने शेतीचे उत्पादन घटले आहे. त्याचा परिणाम पोषणावर होऊन कुपोषण आणि इतर आजार पुन्हा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. नैसर्गिक आपत्ती आणि इतर कारणांमुळे मोठय़ा लोकसंख्येचे होणारे स्थलांतर आरोग्य व्यवस्थेसमोर नवी आव्हाने निर्माण करणारे आहे.

वातावरणातील बदलांना तोंड देणारी आरोग्य व्यवस्था
या सगळ्याचा फटका कोणाला बसणार आहे? अर्थातच गोरगरीब लोक आणि विकसनशील देश याच्या कचाटय़ात सापडणार आहेत. लहान मुले, वृद्ध माणसे, समुद्रकिनारी राहणारे लोक हे जरी अति जोखमीचे असले तरी एकूण या बदलाचा फटका सर्वांनाच बसणार आहे. विकसनशील देशांत बळकट सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नसल्याने गोरगरीब लोक अधिकच भरडले जाणार आहेत. त्याकरिता वातावरणातील हे बदल लक्षात घेऊन आपल्याला आपली आरोग्य व्यवस्था वातावरण बदलासंदर्भात बळकट आणि सक्षम करावयाची गरज आहे.

सध्या राष्ट्रीय स्तरावर वातावरणातील बदलासंदर्भात पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एका परिषदेची स्थापना जानेवारी 2015मध्ये करण्यात आली असून राष्ट्रीय रोगनियंत्रण केंद्रात (एनसीडीसी ) क्लायमेट चेंज आणि मानवी आरोग्यासंदर्भातील हा महत्त्वाचा अजेंडा पुढे रेटण्यासाठी एक वेगळा विभाग सुरू करण्यात आला आहे. एनसीडीसीच्या मदतीने सर्व राज्यांमध्ये वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्य यासंदर्भात राज्य कृती योजना आखण्याचे काम येत्या काळात करण्यात येईल.

मनुष्यबळाची कमतरता, अपुरा आर्थिक पाठिंबा आणि व्यवस्थापकीय कमतरता यामुळे त्रस्त सार्वजनिक आरोग्यासाठी वातावरणातील बदलाचे शिवधनुष्य मोठे आव्हानात्मक आहे. आपण त्या हिरव्यागर्द फांदीवर बसलेल्या शेखचिल्लीच्या हातातील ती धारदार कुऱहाड लवकरात लवकर काढून घेतली पाहिजे, तरच ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे’ हे आपण पुन्हा एकदा मोकळ्या मनाने आणि खुल्या आवाजात गाऊ शकू!

क्लीन एनर्जी हाच उपाय
वातावरणातील बदलाचा फटका सर्वाधिक कोणत्या आरोग्यविषयक बाबींना बसू शकतो हे लक्षात घेऊन आपण त्यानुसार कृती योजना आखली पाहिजे. पाणीपुरवठा, कृषी, ग्रामविकास, हवामान खाते, परिवहन अशा अनेक खात्यांशी समन्वय साधून तयार केलेली एकात्मिक योजना ही काळाची गरज आहे. वातावरणातील बदलाला तोंड देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सिद्ध ठेवण्यासाठी प्रशिक्षण आणि नवनवी कौशल्ये संपादन महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी सक्षम मॉनिटरिंग व्यवस्थाही उभारावी लागेल. एकूणच आपल्याला ‘क्लीन एनर्जी’ ही घोषणा प्रत्यक्षात आणावी लागेल. तसे केले तर क्लायमेट चेंजचा वेग नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला यश येईल. आपल्याकडे अनेक आदिवासी आरोग्य केंद्रांमध्ये सौर ऊर्जेचा वापर ही म्हणूनच स्वागतार्ह बाब आहे. ‘पंतप्रधान उज्ज्वला योजना’ ही अशीच एक महत्त्वाची योजना. पाणी, हवा आणि अन्न यांच्या शुद्धतेची मानके निर्धारित करून त्यानुसार जगण्यासाठी अत्यावश्यक अशा या घटकांची गुणवत्ता राखण्यासाठी परिणामकारक आणि प्रभावी यंत्रणा आता हवी आहे. मुळात त्याकरिता सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसोबतच आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्थादेखील चांगली बळकट करावी लागेल. तरच आपला पेट्रोल, डिझेल अशा जीवाश्मजन्य इंधनाचा वापर कमी होऊन ग्लोबल वार्ंमगला खीळ बसेल. त्याकरिता आपल्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसंदर्भातील धोरणात महत्त्वपूर्ण बदल करावे लागतील.

(लेखक महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवेत राज्य सर्वेक्षण अधिकारी म्हणून कार्यरत असून प्रथितयश कवी व लेखक आहेत.)